Tuesday, 11 June 2024

क्रेझी कॅसल, अंबाझरी घाट परिसरातील नदी खोलीकरण व रुंदीकरण कामांची विभागीय आयुक्त बिदरी यांनी केली पाहणी

 







नागपूर, दि. ११: अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी गठीत उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्ष विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी धरण परिसरातील क्रेझी कॅसल, अंबाझरी घाट, एनआयटी स्केटिंग रिंग भागातील नाग नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामांची आज पाहणी केली.

 

     समितीचे सदस्य सचिव तथा मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले. क्रेझी कॅसल परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना अंतर्गत महा मेट्रोने पुल तोडणे, नदी खोलीकरण-रुंदीकरण आदी केलेल्या कामांची माहिती महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली. येथे ५०० मीटर परिसरात नाग नदीवर स्थित सात पुल तोडण्यात आले असून आज आठवा पुल तोडण्यात येत आहे, याबाबतची माहितीही देण्यात आली. येथील जुन्या वॉटर पार्क परिसरात नाग नदीच्या किनाऱ्यावर काँक्रीट पिलर वर स्थित असलेली बोट व पिलर येत्या आठवड्याभरात काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सुरक्षेच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात दोन मेट्रो पिलर दरम्यान नाग नदी परिसरात पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. महा मेट्रोचे संचालक (प्रकल्प) राजीव त्यागी आणि संचालक (धोरणात्मक नियोजन) अनिल कोकाटे यावेळी उपस्थित होते.

  श्रीमती बिदरी यांनी अंबाझरी घाट परिसरात मनपाकडून सुरु असलेल्या  नाग नदी रुंदीकरणाच्या कामांची पाहणी केली. या भागात ४७ मिटर अंतरावर नदी किनाऱ्यापासून १७ मिटर पर्यंत नदी रुंदीकरण करण्यात आले आहे. उर्वरित रुंदीकरणाचे कामही प्रगतीपथावर असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. मनपा उपायुक्त प्रकाश वराडे, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, कार्यकारी अभियंता गुरुबक्षानी आदी यावेळी उपस्थित होते. एनआयटीच्या स्केटिंग रिंग परिसरातील नाग नदी खोलीकरण-रुंदीकरणाच्या कामांची पाहणी यावेळी करण्यात आली.

तत्पूर्वी, सोमवार १० जून २०२४ रोजी श्रीमती बिदरी यांनी अंबाझरी धरण परिसरातील धरण बळकटीकरणाच्या कामांची पाहणी केली.      

0000

 

 

 

 

Monday, 10 June 2024

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केली अंबाझरी धरण बळकटीकरण कामाची पाहणी







 

नागपूर, दि. १०: अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी गठीत उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्ष विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी तलाव बळकटी करणाच्या सुरू असलेल्या कामांची आज पाहणी केली.

 

       पाहणी दौऱ्यामध्ये समितीचे सदस्य सचिव तथा मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता पी.के.पवार, मनपाच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गिरी आदी उपस्थित होते.

        उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

 

अंबाझरी  धरणाच्या  बळकटीकरणासाठी  सुरक्षेच्यादृष्टीने अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजने अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी यावेळी करण्यात आली. धरणाच्या माती बांधकामा अंतर्गत सुरु असलेल्या अपस्ट्रिमिंगच्या कामांची  पाहणी करून यातील उर्वरित कामांची  माहिती घेण्यात आली. धरणाचा विसर्ग वाहून जाण्याकरिता मुख्य गेट जवळ दहा मीटर क्षेत्र कापून त्याची एक‍ मिटरने उंची कमी करण्याचे काम लवकरच हाती घेवून या महिन्याअखेर पूर्ण करण्यात येणार आहे, या कामाची प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करण्यात आली.  दीर्घकालीन उपायोजनेंतर्गत या भागात दोन चॅनल गेट उभारण्यात येणार आहेत. त्याबाबतची पाहणीही करण्यात आली.

 

अंबाझरी धरणाच्या सांडव्यावरून  वाहणारा विसर्ग व्यवस्थितरित्या वाहून जाण्यासाठी सुरु असलेल्या नवीन पूल बांधकामाची पाहणी यावेळी करण्यात आली. येथील दुसऱ्या पुलाच्या बांधकामाबाबतही त्यांनी माहिती घेतली. पाहणी दरम्यान श्रीमती बिदरी यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही केल्या. 

००००० 

 

 

 

Monday, 3 June 2024

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती

 

नागपूर, दि. 2 : नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणूकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षकांची ( counting observer)  नियुक्ती करण्यात आली आहे.

 

            फैयाज अहमद मुमताज हे उमरेड, कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक असतील. त्यांचा मोबाईल क्रमांक 8263895421 असा आहे. महेश कुमार दास हे काटोल, सावनेर आणि हिंगणा या विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक असतील. त्यांचा मोबाईल क्रमांक 7782959597 असा आहे.

 

            विपुल बंसल हे नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण व नागपूर पूर्व या विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक असतील. त्यांचा मोबाईल क्रमांक 9356053085 असा आहे. तर राजीव रंजन सिन्हा हे नागपूर मध्य, नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर (अ.जा.) या विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक असतील. त्यांचा दूरध्वनी क्रमांक 9931604077 असा आहे.

 

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी संबंधित बाबींच्या निरीक्षणाकरिता आलेल्या निरीक्षकांची राहण्याची व्यवस्था अनुक्रमे कॉटेज क्रमांक 9,2,6 आणि 8 रवी भवन नागपूर येथे करण्यात आलेली आहे. मतमोजणी बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवाराची, नागरिकांची किंवा मतदारांची तक्रार असल्यास उक्त मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी केले आहे.

 

******

प्रत्येक फेरीची मतमोजणी वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

      


▪ तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे मतमोजणी बाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

 

नागपूर, दि. 2 : कोणत्याही परिस्थितीत मतमोजणीतील अचूकता व वेळेत प्रत्येक फेरींचे मतमोजणी यावर प्रत्येक टेबलच्या नेमलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भर दिला पाहिजे. संबंधित टेबलच्या पर्यवेक्षकाने आलेली आकडेवारी त्वरित निरीक्षकांकडे दिली पाहिजे. स्वतः कोणताही निर्णय न घेता मतमोजणी प्रक्रियेत खंड पडणार याची दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिल्या.

नागपूर आणि रामटेक लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार असून यासाठी नेमलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सत्रात ते बोलत होते. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित प्रशिक्षणासाठी निवडणूक निरीक्षक विपुल बन्सल,निवडणूक निरीक्षक राजीव रंजन सिन्हा, निवडणूक निरीक्षक महेश कुमार दास,  रामटेक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यावेळी उपस्थित होते.

मतमोजणी प्रक्रिया अचूकपणे आणि विहित कालावधीत होण्यासाठी सर्वांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मतमोजणी विषयक निर्देशांचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय स्वतंत्र कक्षात मतमोजणी होणार आहे. प्रत्येकाने सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी, असे डॉ. इटनकर म्हणाले.

मतमोजणी कक्ष, मतमोजणी आकडेवारीचा तक्ता, टपाली मतपत्रिका मोजणी, एनकोर प्रणाली,  मतदान यंत्राद्वारे मतमोजणी आदी विषयाची यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली.

                                                                                                                                    *****