Friday, 10 January 2025

‘एचएमपीव्ही’ विषाणूबाबत भीती बाळगू नका आवश्यक दक्षता घ्या : विभागीय आयुक्तांचे आवाहन

 


        नागपूर, दि. 7 :  ह्युमन मेटान्यूमोव्हायरस ( एचएमपीव्ही) हा एक सामान्य विषाणू आहे, जो श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास करणीभूत ठरतो. या संसर्गापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. तसेच नागरिकांनी यासंदर्भात नाहक भीती बाळगू नये असे सांगितले आहे. 

हा हंगामी रोग असून हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातील सामन्यत: आरएसव्ही आणि फ्लू प्रमाणे उद्भवतो. सध्या चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या आजाराचे रुग्ण वाढले, अशा बातम्या येत आहेत. हा आजार तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम 2001 मध्ये नेदरलँडमध्ये आढळला.

खबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याबाबत सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने केल्या आहेत. त्याचे नागपूर विभागातील नागरिकांनी पालन करावे, असे आवाहनही त्यांनी  केले आहे.

            खोकला येणे, ताप येणे, घसा खवखवणे, नाक वाहणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.

हे करा :-

Ø  जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यूपेपरने झाका.

Ø  साबण आणि पाणी किंवा सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.

Ø  ताप,खोकला किंवा शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

Ø  भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.

Ø  संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूविजन ( व्हेंटिलेशन) होईल याची दक्षता घ्या.

हे करू नका :-            हस्तांदोलन करु नये.

Ø  टिश्यु पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नका.

Ø  आजारी लोकांशी जवळचा संपर्क ठेवू नका.

Ø  डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका.

Ø  सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

Ø  डॉक्टरांचे सल्ल्याशिवाय उपचार घेऊ नका.

सर्दी-खोकला अर्थात आयएलआय,सारी रुग्णांसंदर्भात आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण करण्यात येत असून अशा रुग्णांनी तत्काळ वैद्यकीस सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. तसेच एचएमपीव्ही  या आजाराबाबत घाबरून न जाता आवश्यक काळजी घेण्याबाबत विभागीय आयुक्तांनी आवाहन  केले आहे.

०००

 

Monday, 6 January 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एनएसएच हॉस्पिटल अँड डायग्नॉस्टिस सेंटरचे उद्घाटन




 

नागपूर दि.6 : येथील भांगडिया फाऊंडेशनच्या एनएसएच क्रिटिकल केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड डायग्नॉस्टिस सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले.

            नागपूर शहरातील गंगाबाई घाट चौक परिसरात भांगडिया फाऊंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यास आमदार कृष्णा खोपडे, कृपाल तुमाने, किर्तीकुमार भांगडिया, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, एनएसएच क्रिटिकल केअर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे अध्यक्ष मितेश भांगडिया, हृदयरोग विशेषज्ञ डॉ. वैभव बियाणी, बालरोग न्यूरोलॉजिस्ट डॉ. उमेश बियाणी, रेडिओलॉजिस्ट डॉ. नेहा बियाणी, स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ.निकिता बियाणी, विनय बियाणी , श्रीकांत भांगडिया आदी उपस्थित होते. हॉस्पिटलच्या पदाधिकाऱ्यांकडून यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.

एनएसएच हे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय असून याच्या उभारणीमुळे अनेक दुर्धर आजाराच्या रुग्णांना निश्चितच योग्य उपचार मिळतील, असा विश्वास व्यक्त करून श्री.फडणवीस यांनी एनएसएचचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाची यावेळी पाहणी केली व तेथील अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांबाबत  तज्ज्ञांकडून माहिती घेतली. तसेच या रुग्णालयातील विविध कक्षांनाही त्यांनी भेट दिली.

00000 

पायाभूत विकास कामांमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




▪मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील सात उड्डाणपूलांचे लोकार्पण

▪केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे योगदान मोलाचे

नागपूर,दि.5: पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र आता भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वाधिक पायाभूत विकासाची कामे आपल्या राज्यात सुरू आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका बाजूला केंद्र शासनाच्या मार्फत हाती घेतलेल विविध प्रकल्प व दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनाने घेतलेले विविध प्रकल्प यातून समृध्द महाराष्ट्र घडत आहे. येत्या काळात महारेल मार्फत 200 रेल्वे उड्डाणपूल व भुयारी मार्गाची कामे पूर्ण केली जात आहेत. मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, विमानतळ विकास, बंदरांचा विकास अशा सर्व क्षेत्रात राज्यात आपण दूरदृष्टी ठेवून विकास कामे हाती घेतल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्यातील विविध ठिकाणी महारेलने उभारलेल्या ७ उड्डाणपुलांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय क्रीडा मैदान येथे आयोजित या समारंभास वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने, आमदार कृष्णा खोपडे, वाशिमचे आमदार श्याम खोडे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याच बरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे धुळे येथून पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, धामनगाव रेल्वे येथून आमदार प्रताप अडसड, आमदार किशोर जोरगेवार, आमदार श्याम खोडे व विविध मान्यवर यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.

राज्याच्या समतोल विकासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर आम्ही सुरवातीपासूनच भर दिला आहे. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असतांना मी तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री या जबाबदारीतून महाराष्ट्रातील रेल्वे उड्डाणपूल व इतर प्रकल्पाबाबत आग्रह धरला होता. राज्यात अत्यावश्यक असलेल्या रेल्वे उड्डाणपूल व भुयारी मार्गांची संख्या लक्षात घेता हे काम वेगाने पूर्ण होण्यासाठी एका कंपणीची नितांत आवश्यकता त्यावेळी भासली होती. वेळेत प्रकल्प  पूर्ण व्हावेत यासाठी भारतीय रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्या सयुक्त सहभागातून महारेल ही स्वतंत्र कंपणी आपण साकारली. एका वर्षात 25 उड्डाणपूल उभारण्याचा आदर्श महारेलने स्थापीत करुन दाखवीला. महारेलने त्यांच्यावर टाकलेला विश्वास हा सार्थ ठरविला असे गवरोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ज्या कामांचे आम्ही भूमिपूजन केले ती सर्व कामे प्रत्यक्षात दिलेल्या मुदतीत साकार करुन दाखवित आहोत. दळणवळण व सुलभ वाहतुकीच्या दृष्टीने राज्यात अनेक ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल व भुयारीमार्ग आवश्यक आहेत. महारेल या कंपनीला दिलेली कामे त्यांनी कमी कालावधीत गुणवत्तापूर्ण ऊभारुन एक नवा मापदंड निर्माण केला असल्याचे ते म्हणाले. महारेलला यापुढे कामाची कमतरता भासनार नाही. आम्हाला वेग आणि गुणवत्ता याचा सुवर्णमध्य साधणारे अधिकारी व संस्था आवश्यक असल्याचे सांगूण त्यांनी गुणवत्तेचा गौरव केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायस्वाल यांनी केले.

00000

 

Sunday, 5 January 2025

आदिवासी समाजातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी शासन प्रयत्नशिल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




              आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाह व्यापण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न

             आदिवासी कल्याणाच्या सर्व उपक्रमांसाठी राज्यशासन भक्कमपणे पाठीशी

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षिस वितरण

नागपूर,दि. 5:  आदिवासींमध्ये उपजतच क्रीडा गुण असतात. त्याला स्पर्धात्मक वातारवण ,तंत्रशुद्धता आणि कौशल्याची जोड देवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यवासायीक खेळाडू घडविण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासी मुला-मुलींमध्ये मुख्य प्रवाह व्यापण्याची शक्ती निर्माण होत आहे यास अधिक वेग देण्यासाठीही राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राबवायच्या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी राज्य शासन भक्कमपणे आदिवासी विभागाच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

            आदिवासी विकास विभागाच्यावतीने येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित तीन दिवसीय राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप व बक्षिस वितरण समारंभा प्रसंगी मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये आदिवासी समाजातील खेळाडुंनी धनुर्विद्या,ॲथलॅटिक्स आणि देशी खेळांमध्ये चमकदार कामगिरी केल्याचे चित्र देशभर दिसून येत आहे. आदिवासींमध्ये उपजतच विविध क्रीडा गुण असतात या गुणांना स्पर्धात्मक वातावरण,तंत्रशुद्धता व कौशल्य आधारीत उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना आखल्या आहेत. याद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम व्यावसायिक खेळाडू येणाऱ्या काळात या समाजातून निर्माण होतील.

            राज्याचा आदिवासी विभाग आणि आश्रमशाळांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न सुरु असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, आदिवासी मुलांसाठी  राज्यशासनाने नामांकित शाळांची योजना विस्तारीत करून त्यांना चांगल्या शाळांमध्ये शिकण्याची सोय करून दिली. स्वयम् योजनेच्या माध्यमातून वसतीगृहात प्रवेश न मिळू शकलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावे लागू नये यासाठी उत्तम कार्य सुरु आहे. निसर्गाचे रक्षक असणाऱ्या आदिवासिंना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य्‍ शासनाने विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आदिवासी मुल-मुलींमध्ये मुख्य प्रवाह व्यापण्याची शक्ती निर्माण होत आहे. ही शक्ती अधिक वेगाने निर्माण होण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. तसेच आदिवासींच्या कल्याणासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याकरिता राजय्‍ शासन भक्कमपणे आदिवासी विभागाच्या पाठिशी उभा असल्याचेही त्यांनी सांगितले.

             नाशिक विभाग राज्यात प्रथम तर नागपूर उपविजेता, मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान 

        राज्यातील ठाणे,नाशिक,अमरावती आणि नागपूर विभागांमध्ये ३ ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकारात विविध स्पर्धा पार पडल्या. यात ४७५ गुणांसह नाशिक विभागाने प्रथम क्रमांक पटकाविला. नागपूर विभाग ४५४ गुणांसह दुसऱ्या तर २८१ गुणांसह ठाणे विभागाने तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस पटकाविले. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते या तिन्ही संघाना यावेळी बक्षिस वितरीत करण्यात आले.         या स्पर्धेत एकूण ९७४ मुल आणि ९०० मुलींनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उर्वरीत बक्षिसे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आणि वित्त व नियोजन राज्य मंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

            तत्पूर्वी, राज्यघटनेची  ७५ कलमे मुखोद्ग असणारा शिवांश असराम, झिरो माईल आयकॉन सुप्रिया कुमार यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी सुरेश पुजारी,स्वप्निल मसराम आदींचा यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  नागपूर विभागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये राबविल्या जात असलेल्या ‘ब्राइटर माइंड’ उपक्रमांतर्गत डोळयाला पट्टी बांधून रंग ओळखणे, पुस्तक वाचने,मोबाईलवरील फोटो ओळखने आदिंचे विद्यार्थ्यांनी  सादरीकरण केले. उर्सुला शाळेच्या विद्यार्थीनींनी आदिवासी नृत्य सादर केले. आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी प्रास्ताविक केले.

00000