Tuesday, 7 October 2025

देशातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्थाच्या ‘ब’ श्रेणीत ‘नागपूर फ्लाईंग क्लब टॉप टेन’ मध्ये

 

 

डिजीसिएचे नामांकन जाहीर 

 

नागपूर, दि.७ :- केंद्र शासनाच्या नागरी विमान महासंचालनालयाच्या (डिजीसिए) तर्फे भारतातील ब श्रेणीतील उत्कृष्ट विमान चालक प्रशिक्षण संस्थांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहे. यात राज्य शासनाच्या नागपूर फ्लाईंग क्लबला ब श्रेणीमध्ये टॉप टेन नामांकन जाहीर करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाईंग क्लबच्या अध्यक्ष श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली. 

नागपूर फ्लाईंग क्लबचे महाराष्ट्र शासनातर्फे संचलन करण्यात येत असून या क्लबकडे चार प्रशिक्षणार्थी विमान आहेत. केंद्र शासनाच्या भारतीय नागरी विमान महासंचालनालयातर्फे उड्डान प्रशिक्षणाकरिता मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नागपूर येथे प्रशिक्षणासाठी पुरेशा वेळ उपलब्ध होत नसल्याने चंद्रपूर येथील मोरवा विमानतळावर दुसरा बेस तयार करण्यात आला आहे. मोरवा विमानतळावरील प्रशिक्षणालाही डिजीसिएची उड्डाण प्रशिक्षणाकरिता मान्यता मिळाली आहे. फ्लाईंग क्लबच्या व्यवस्थापनाची जबाबदारी अपर आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक तेजुसिंग पवार यांच्याकडे आहे. 

भारतातील मान्यता प्राप्त विमान प्रशिक्षण संस्थांमध्ये असलेल्या सुविधा संदर्भात नागरी विमान महासंचालनालयातर्फे नामांकन यादी जाहीर करण्यात येते. दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर  करण्यात आलेल्या नामांकनातील प्रत्यक्ष विमान प्रशिक्षणासंदर्भातील वर्गवारीनुसार ब श्रेणीमध्ये एकूण १३ संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर फ्लाईंग क्लब दहाव्या क्रमांकावर आहे. 

मोरवा विमानतळावर प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व सूविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ पासून ८३५ पेक्षा जास्त तास उड्डाण प्रशिक्षण पूर्ण केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी सेसना-१५२ या श्रेणीतील तीन विमाने तर सेसना-१७२ या श्रेणीतील एक विमान आहे. प्रत्येक प्रशिक्षण तुकडीत ४२ प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा समावेश असून यापैकी वाणिज्य विमान प्रशिक्षणासाठी ३७ तर वैयक्तिक प्रशिक्षणासाठी ५ प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. अल्पावधितच नागपूर उड्डाण क्लबने प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्था पूर्ण केल्यामुळे भारत सरकारच्या नागरी विमान महासंचालनालयातर्फे ब श्रेणीमध्ये समावेश होऊन पहिल्या दहा मध्ये रँकिग मिळविली असल्याचे श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले.

    

००००००

 


महर्षी वाल्मिकी यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 

 

        नागपूर, दि.07 :  आदिकवी व रामायण महाकाव्याचे रचेते महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. 

आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार  यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

00000

 

 

 

‘नागपूर ग्रोथ हब किक कार्यशाळा’ आयोजनाबाबत बैठक - विविध पाच गटांमध्ये होणार विचारमंथन ; मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन

 


 

 

नागपूर, दि.७ :- विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये नागपूर व परिसराच्या आर्थिक विकासासाठी  कार्यपद्धती आखण्याच्या दृष्टीने येत्या १२ ऑक्टोबर रोजी नागपूर स्थित भारतीय व्यवस्थापन संस्थेमध्ये (आयआयएम) ‘नागपूर ग्रोथ हब किक कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत  नागरी क्षेत्र विकास, उद्योग, कृषी, वने, खाण या पाच गटांमध्ये तज्ज्ञ मंडळी विचार मांडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समारोप सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. 

राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) चे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे नागपूर ग्रोथ हब किकच्या आयोजनाबाबत आज बैठक झाली. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आमदार परिणय फुके आणि सुमित वानखेडे, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मीणा, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आदी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. 

नागपूर व परिसरातील उपलब्ध स्त्रोतांचा प्रभावी उपयोग करुन विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक थिंक टँक निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. वाढते नागरीकरण व भविष्यातील उद्दिष्टे यांची सांगड घालणे, मिहान परिसरात सुरु असलेले विविध उद्योग तसेच नागपूर व परिसरात विविध उद्योगांची श्रृंखला व त्याची वाढ करणे, या भागातील कृषी व कृषी आधारित उद्योगांच्या विकासासाठी कार्यपद्धती तयार करणे, वने व वन्यजीव क्षेत्रामध्ये रचनात्मक कार्य करुन विकास साधणे, कोळसा व खनिजांनी समृद्ध असलेल्या या भागाचा विकास साधण्यासाठी महत्वाची पावले उचलण्यासंदर्भात तज्ज्ञ मंडळीचे गट स्थापन करण्याबाबत यावेळी सूचना करण्यात आल्या. या कार्यशाळेच्या अनुषंगाने विविध बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. श्रीमती बिदरी, डॉ. विपिन इटनकर आणि डॉ. अभिजित चौधरी यांनी यावेळी विचार मांडले.

  

००००००

 


Monday, 6 October 2025

अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत घडलेल्या गुन्ह्यांचा तपासाला प्राधान्य द्या - विजयलक्ष्मी बिदरी

 

Ø  विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक

Ø  निवृत्तीवेतनासह आर्थिक लाभासाठी 2कोटी 50 लक्ष

Ø  पिडीतांच्या वारसाच्या नोकरीचे प्रस्ताव सादर करा

Ø  विभागात 154 गुन्ह्यांची नोंद 

           नागपूर, दि. 06 : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंद झालेल्या प्रत्येक प्रकरणांचा सखोल तपास करून न्यायालयात अशी प्रकरणे प्रलंबित राहणार नाही. याची दक्षता घेतांनाच लाभार्थ्यांना समितीमार्फत आर्थिक लाभाची प्रकरणे तात्काळ निकाली काढा असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिले. 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत घडलेल्या प्रकरणांचा आढावा विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्रीमती बिदरी बोलत होत्या. 

         यावेळी विभागतील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक दृकश्राव्य पद्धतीने तसेच नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक संदिप पाटील, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त प्रसाद कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. अभिजित पाटील, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त एन. के. कुकडे आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

           नागपूर विभागात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत 1 एप्रिल पासून 154 गुन्ह्यांची नोंद झाली असून यामध्ये अनुसूचित जातीचे 110 तर अनुसूचित जमातींच्या 44 प्रकरणांचा समावेश आहे.  पोलीस तपासा अभावी तसेच न्याय प्रविष्ठ असलेल्या प्रकरणांसदर्भात तात्काळ चौकशी करून न्यायालयासमोर परिपूर्ण प्रकरणे सादर करण्याला प्राधान्य  देण्याच्या सूचना करतांना श्रीमती बिदरी म्हणाल्या की, ऑगस्ट महिन्यापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणात अर्थसहाय्य करण्यासाठी 2कोटी 50 लक्ष रूपयांचा निधीचे वाटप तात्काळ पूर्ण करावे. याअंतर्गत 1 कोटी रूपये निवृत्ती वेतनाकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. 

            दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकी उपविभागीय स्तरावर वर्धा, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात नियमित बैठकी घेण्याच्या सूचना करतांना विभागीय आयुक्तांनी मृत झालेल्या कुटुंबांना शासकीय नोकरी संदर्भात प्रलंबित असेलेल्या प्रस्तावांना मंजूरी मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासोबत पेंशन संदर्भातही प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

प्रारंभी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी नागपूर विभागात घडलेल्या गुन्ह्यांचा तपशील, दाखल झालेले गुन्हे यांतर्गत ॲक्ट्रॉसिटी अंतर्गत न्यायप्रविष्ठ व शिक्षा झालेल्या गुन्ह्यासंदर्भात माहिती दिली. पोलीस तपासांतर्गत 1 वर्षावरील 14 प्रकरणे तर 6 महिन्यापर्यंतच्या 2 प्रकरणासंदर्भात तपास सुरू असल्याचे यावेळी सांगितले. विभागात 78 प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

जादूटोणा विरोधी कायद्याच्या आढावा 

          विभागीयस्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा व कायद्यासंदर्भात जनजागृती करण्यासंदर्भात प्राधान्य देण्यात येत असून गडचिरोली, गोंदिया, भंडारा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहूल भागात ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत प्रत्येक नागरिकांपर्यंत या कायद्याची माहिती समितीमार्फत पोहचविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या. 

                जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत आतापर्यंत नागपूर शहरात 16 तर ग्रामीण भागात 17 अशा 33 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. वर्धा 10, भंडारा 15, गोंदिया 11, चंद्रपूर 36 तर गडचिरोली जिल्ह्यात 11 अशा नागपूर विभागात 116 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. प्रत्येक गुन्ह्यासंदर्भात पोलीस विभागातर्फे चौकशी करण्यात येवून न्यायालयात प्रकरणे दाखल करण्यात आली आहे. प्रचार व प्रसिद्धीच्या दृष्टीने विभागात 108 कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले. 

तृतीयपंथी यांच्या हक्काचे संरक्षण 

          तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचा आढावा विभागीय आयुक्त यांनी घेतला. तृतीय पंथीयांना आधारकार्ड सह आयुष्यमान कार्ड तसेच संजय गांधी निराधार योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष शिबीर आयोजित करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी दिल्या.  

                तृतीयपंथी यांच्या हक्काचे संरक्षण करतांना त्यांना आवश्यक सुविधा व सोयी प्राधान्याने पूर्ण करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले. नागपूर जिल्ह्यात 251 तृतीयपंथीय असून 204 तृतीय पंथीयांना पोर्टलद्वारे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. वर्धा 21, भंडारा 6, गोंदिया 15, चंद्रपूर 35 तर गडचिरोली जिल्ह्यात 5 तृतीयपंथीय असून त्यांना आधारकार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, घरकुल तसेच आरोग्य सेवेचा लाभ देण्यात येत आहे. तृतीयपंथीया संदर्भात समाजामध्ये जागृती करतांनाच आवश्यक सुविधा पुरविण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त प्रसाद कुलकर्णी  यांनी सांगितले.

0000