Friday, 20 March 2020

शासकीय कार्यालयांतील उपस्थिती 25 टक्क्यांवर मुंबई, पुणे, नागपूर मधील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने, कार्यालये आज मध्यरात्रीपासून बंद


कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाची महत्वाची पाऊले

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

मुंबई, दि. 20 : कोरोना साथीचा प्रसार थांबविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे मात्र सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नाही. पुढील 15 ते 20 दिवस अधिक काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील शासकीय कार्यालयांतील उपस्थिती 25 टक्क्यांवर आणणार आहोत तसेच मुंबई महानगर क्षेत्र, पुणे- पिंपरी चिंचवड, नागपूर येथील सर्व दुकाने, आस्थापना व खासगी कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी आज लाईव्ह प्रसारणात केली. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधी, दूध, इत्यादी दुकाने सुरु राहू शकतील. रात्री 12 वाजेपासून हे आदेश अंमलात येतील.  
बंदच्या बाबतीत या शहरांमधील कुणाही नागरिकांना काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या संपर्कात राहावे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ज्या आस्थापना, दुकाने बंद करीत आहेत त्यांना माझे आवाहन आहे की, आपला जो कष्टकरी – कामगार कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका, कारण त्यांचे हातावर पोट आहे.     
जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, 
अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे. दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे. चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वचजण या कामी पुढे आले आहेत त्यांचे मी आभार मानतो.
काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस, रेल्वे बंद करा पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार ?  मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार हे प्रश्न होते आणि म्हणूनच  तूर्त या सेवा बंद न करता सरकारी कार्यालयांत 25 टक्के कर्मचारीच कामावर बोलविण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वीच 50 टक्के कर्मचारी उपस्थिती राहील असा निर्णय घेण्यात आला होता.
आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी
आर्थिक वर्ष २०१८-१९ चे सुधारित व उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती आपण  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. याशिवाय २३४ बी अंतर्गत व्याज वाचविण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच  ३० एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी अशी विनंती केली. फेब्रुवारी २०२०ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख २२ मार्च आहे, ती देखील वाढवावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
००००



पहिली ते आठवींपर्यन्त परीक्षा रद्द - शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड




मुंबई, दि. 20 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीं पर्यन्त परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याची घोषणा शालेय शिक्षाण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. आज या संदर्भात आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
प्रा. गायकवाड पुढे म्हणाल्या, बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या राज्यातील परीक्षा यंदा रद्द केल्या असून वर्षभरातील विद्यार्थ्यांचे मापन संकलित करून विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येईल.  वर्ग 9 वी  आणि 11 वी ची उर्वरित परीक्षा 15 एप्रिल नंतर घेण्यात येईल.  वर्ग दहावीचे दोन पेपर जे येत्या शनिवारी आणि सोमवारी आहेत ते वेळापत्रकाप्रमाणे होतील.
दहावीच्या परीक्षेसंबंधित आवश्यक ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सोडून उर्वरित सर्वांनी घरुन काम करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बालकांनी आणि पालकांनी काळजी घ्यावी. या कालावधीत शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
००००


Thursday, 19 March 2020

वॉर अगेंस्ट व्हायरस’ आपण निश्चित जिंकणार-‘लाईव्ह प्रसारणात’ मुख्यमंत्र्यांनी दिला आश्वासक धीर



डॉक्टर्स, नर्सेस म्हणजे लढणारे जवानच
जनतेने गर्दी करणे बंद करावे, सूचनांचे पालन करा
पंतप्रधान, केंद्राकडून पुरेसे सहकार्य
------------------


मुंबई, दि 19 : कोरोनाचा मुकाबला म्हणजे जागतिक युद्ध असून याचा सामना करण्यासाठी राज्यातील जनता निश्चितपणे शासनाला सहकार्य करीत आहे, त्यामुळे आपण ही साथ अजून तरी नियंत्रणात ठेवली आहे मात्र आणखीही शर्थीचे प्रयत्न केले तर महाराष्ट्र या  संकटावर मात करेल. मी स्वत: आज देखील पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी यासंदर्भात बोललो असून त्यांनी राज्याला पुरेपूर सहकार्य केले जाईल हे सांगितले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियावरून लाईव्ह प्रसारणाद्वारे सांगितले. जनतेने घाबरून जाऊन जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधांचा साठा करू नये, असेही आवाहन त्यांनी केले.
गर्दी पूर्ण बंद करा
मुख्यमंत्री म्हणाले की, नागरिकांनी सरकार ज्या ज्या सुचना देत आहे तेवढ्या काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. आमच्या आवाहनानंतर सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर गर्दी खूप कमी झाली आहे. मात्र तरी देखील आपण गर्दी पूर्ण बंद केली पाहिजे. आपण शासकीय कार्यालय, खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे तरीसुद्धा आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम या पद्धतीने काम करा, सूचनांचे आणखी काटेकोर पालन केले पाहिजे.
आपण ज्या उपाययोजना करीत आहोत त्या समाधानकारक असल्या तरी विषाणू एकेक पाउल पुढे टाकत असल्याने अधिक काळजी घेतली पाहिजे. यंत्रणेमध्ये काम करणारीही माणसेच आहेत. त्यांच्यावरचा भार वाढेल असं कृत्य आपल्याकडून व्हायला नको.
होम क्वारंटाईन व्यक्तींनी फिरू नये
आज सर्वच रुग्ण बाहेरून लागण झालेले आहेत. बाहेरची लोकं देखील आपलीच आहेत, नातेवाईक आहेत. मात्र त्यांनी इथे येतांना सर्व काळजी घेऊन येणे महत्वाचे आहे. होम क्वारंटाईन करणाऱ्यांच्या हातांवर शिक्के मारले आहेत, त्यांनी देखील आसपास वावरू नये. आपल्या परदेश प्रवासाची माहिती लपवून प्रवास करू नका.
हे विषाणुशी युद्ध
युद्ध हे जिद्दीने लढायचे असते आणि जिंकायचे असते, अनेकांनी 1965 आणि 1971 चे युद्ध पाहिले असावे, अनुभवले असावे. युद्धाचा अनुभव वाईट असतो. युद्धानंतरची परिस्थिती वाईट असते. देशासाठी छातीचा कोट करून आपले जवान लढतात, धारातीर्थी पडतात. कोरोनाशी ज्या पद्धतीने लढतो आहोत त्यावरून मला 1971 चे युद्ध् आठवते. आजचे युद्ध हे विषाणुशी युद्ध आहे. “वॉर अगेंस्ट व्हायरस.” युद्ध सुरु झाले आहे.
आपले जवान म्हणजे आपले डॉक्टर, नर्सेस, बसचे चालक, स्वंयसेवी सामाजिक संस्था यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. आपण त्यांना घरी राहून सहकार्य करू शकत नाही का?
संकट हे काही जात, पात,धर्म पाहून येत नाही. आपण एकजुटीने मुकाबला केला तर हे संकट आपलं काहीही वेडवाकडं करू शकत नाही, शकणार नाही. चीनमध्ये या विषाणुचा पहिल्यांदा प्रादुर्भाव आढळला पण आता चीनने  अनेक कडक उपाययोजना केल्यामुळे  यातून ते बाहेर पडत आहेत. आपल्याला ही बाहेर पडायचे आहे. त्याकरिता पुन्हा एकदा सहकार्य करा, आपण नक्की या संकटातून बाहेर पडू असा मला विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.        
00000



जीवनावश्यक वस्तू स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध करुन द्याव्यात - डॉ नीलम गोऱ्हे



      मुंबई, दि. 19 :  राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. याचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिक, व्यापारी, उद्योजक व इतर व्यावसायिकही ह्या संकटाबरोबर लढण्यासाठी सज्ज होऊन आपले योगदान देत आहेत. जीवनावश्यक गोष्टी जरी बंद नाही झाल्या तरीही या आवश्यक वस्तूच्या पुरवठ्यावर नक्कीच परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने पुढील 2 महिन्याच्या जीवनावश्यक वस्तू नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून ह्याच महिन्यात उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश डॉ नीलम गोऱ्हे उपसभापती विधान परिषद यांनी शासनास दिले.  
दोन महिन्यांच्या जीवनावश्यक वस्तू ह्याच महिन्यात उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यानुसार अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने  तत्काळ दखल घेतली असून या बाबत आजच आदेश काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
००००