Thursday, 25 January 2024

 अंबाझरी धरण बळकटीकरणाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

 

Ø  न्यायालयात पूरक प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना

 

Ø  पाण्याच्या विसर्गासाठी चार दरवाजे

 

नागपूर दि. 24 : अंबाझरी  धरणाच्या बळकटीकरणासाठी विविध यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या  उपाययोजनांची अद्यावत माहिती पूरक प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

 

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासंबंधात उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापित उच्च स्तरीय समितीद्वारे कोर्टाचे नवीन निर्देशावर चर्चा करून झालेल्या कामांचा आढावा आज विभागीय आयुक्त बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

 

   मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, मेट्रोचे व्यवस्थपकीय संचालक श्रवण हर्डिकर, संचालक अनिल कोकाटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता पी.के.पवार, नाशिक येथील आभियांत्रिकी संशोधन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद मांदाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्धन भानुसे, मनपाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, महसूल उपायुक्त दीपाली मोतीयेळे, नागपूर सुधार प्रन्यासचे अधिक्षक अभियंता प्र.म. भांडारकर आदी यावेळी उपस्थित होते.

            अंबाझरी  धरणातील अतिरिक्त पाणीसाठ्याच्या विसर्गासाठी सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व नाशिक येथील आभियांत्रिकी संस्थेतील तज्ज्ञानी संयुक्त पाहणी करून धरणाला चार दरवाजे बसविण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार सिंचन विभागाने पूर्वी ठरलेल्या दोन दरवाज्या ऐवजी आता चार दरवाजे बसविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी दिल्या.

धरणातील वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी नदीपात्र आणि नदी काठावरील अतिक्रमणाची यादी निश्चित करून अतिक्रमण काढण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. तसेच नदी स्वच्छता व खोलीकरणाची कामेही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नासुप्रच्या स्केटिंग रिंग पार्किंग स्लॅब काढून टाकण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सुधार प्रन्यासद्वारे देण्यात आली.

पाण्याचा प्रवाह विनाअडथळा जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या पूल व रस्त्याची कामे तसेच दुसऱ्या टप्प्यातील इतर कामांसाठीची निविदा प्रक्रीया १० दिवसात सुरू होणार आहे. या कामांना फेब्रुवारी व मार्चपर्यंत प्रत्यक्ष सुरूवात करून जून अखेरपर्यंत पूर्ण करून घेण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभाग व सिंचन विभाग व महामेट्रोकडून देण्यात आली. 

महानगरपालिका, सिंचन विभाग, नागपूर सुधार प्रन्यास  तसेच  महामेट्रो  यांनी केलेल्या उपाय योजनांचा नियमीत अहवाल सादर करण्याच्या सूचना  विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज केल्या.

0000

 

 


ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर - विजयलक्ष्मी बिदरी



Ø व्याघ्र प्रकल्प स्थानिक सल्लागार समितीची बैठक

Ø इलेक्ट्रिक वाहनांचा देशात पहिल्यांदा वापर

Ø विदेशी पर्यटकांसाठी गाईडला इंग्रजी भाषा प्रशिक्षण

Ø बफरमधील गावांना कौशल्य विकास प्रशिक्षण

Ø हॉटेल व रिसॉर्टमध्ये स्थानिकांना 50 टक्के नोकऱ्या

 

नागपूर, दि. 23: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटनासाठी इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्यात येणार असून प्रत्येक गेटवर या वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. देशात प्रथमच इलेक्ट्रिक वाहनांचा पर्यटनासाठी उपयोग करण्यात येत आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकासाचे विशेष प्रशिक्षण सुरु करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत निसर्ग पर्यटनासंबंधी नियमन करणे तसेच व्याघ्र प्रकल्प व सभोवतालच्या क्षेत्राच्या सोयी सुविधांच्यादृष्टिने वाढ करण्यासाठी विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या स्थानिक सल्लागार समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

   यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक, ताडोबा कोअरचे उपसंचालक नंदकिशोर काळे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबळेकर, उपविभागीय अधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापूरे, मोहर्लीच्या सरपंच श्रीमती सुनिता कातकर, कोलाऱ्याच्या श्रीमती शोभाताई कोइचाळे, निसर्ग पर्यटन मंडळाचे धनंजय बापट, ट्रॅक्स संस्थेच्या श्रीमती पुनम धनवटे, इको-प्रो संस्थेचे बंडू धोतरे, मुकेश भांदककर, किरण मनुरे, योगेश दुधपचारे, अनिल तिवाडे, संजय मानकर, प्रफुल्ल सावरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ताडोबा-अंधारी या  प्रकल्पामध्ये वाघाचे सर्वाधिक वास्तव्य असल्यामुळे देश व विदेशातील पर्यटकांची  संख्या सातत्याने वाढत आहे. पर्यटकांना आवश्यक सुविधा निर्माण करतांनाच वन्यजीव तसेच जंगलाचे संरक्षण महत्वाचे आहे. कोअर तसेच बफर क्षेत्रात पर्यटकांसाठी निर्धारित क्षेत्रात सुमारे दीडशे पेक्षा जास्त वाघांचे वास्तव्य आहे. पर्यटकांना या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी गाईड, वाहन चालक तसेच हॉस्पीटॅलीटी उद्योगामध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. या परिसरात सुमारे 82 गावे असून त्यापैकी 62 गांवातील कुटुंबांना विविध रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उर्वरित गावांसाठी कौशल्य विकास विभागातर्फे विशेष प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्यात.

ताडोबा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एनआयसी तर्फे विकसीत केलेल्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध असून पर्यटकांच्या सुविधेसाठी हेल्प लाईन क्रमांक,स्वतंत्र मदत केंद्र उपलब्ध आहे. पर्यटन वाढीला प्रोत्साहन देतांनाच पर्यटकांच्या प्रतिक्रिया नोंदवून त्यानुसार आवश्यक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या दृष्टिने विविध उपक्रम राबवितांना पर्यटकांचा सहभाग कसा वाढेल यावर विशेष भर देऊन पर्यटन विकासाचा आराखडा तयार करा, या सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.

 

रिसॉर्टमधील ध्वनी प्रदूषण प्रतिबंधासाठी  समिती

ताडोबा-अंधारी प्रकल्पाच्या बफर क्षेत्राबाहेर हॉटेल्स, रिसॉर्ट्स संदर्भात आवश्यक परवानगी तसेच बांधकाम नियमानुसार असल्याबाबतची तपासणी करतांनाच येथे ध्वनीप्रदुषण तसेच मोठ्या प्रमाणात विद्युत दिव्यांची प्रखर रेाषणाई संदर्भात वन, महसूल तसेच स्थानिक पदाधिकारी यांची समिती गठित करुन येत्या तीन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्यात.

आदरातिथ्य उद्योगामध्ये स्थानिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान 50 टक्के रोजगार बफर क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने द्यावा अशा सूचना करतांना श्रीमती बिदरी यांनी बफर क्षेत्रात होम स्टे करिता स्थानिक कुटुंबांनाच प्राधान्य आहे. बफर क्षेत्रातील सर्व रिसॉर्ट्स , होमस्टे नियमितीकरणासाठी  तपासणी करावी व नियमबाह्य असलेल्यांवर त्वरीत कार्यवाही करावी. या क्षेत्रातील सर्व जीप्सीधारक हे स्थानिक असावे व मंजुर पर्यटन आराखड्यानुसार त्यांची नोंदणी करावी. गाईड यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी तसेच विदेशी पर्यटकांच्या दृष्टिने इंग्रजी व हिंदी भाषेचे प्रशिक्षण, व्याघ्र प्रकल्पात असलेले वन्यजीव, पक्षी तसेच वृक्षांबद्दलची संपूर्ण माहितीबाबत विशेष प्रशिक्षण आयोजित करावे अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

इरई सिंचन प्रकल्पाच्या बॅक वॉटर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा वावर आहे. परंतु या क्षेत्रात तारेचे कुंपण टाकून शेती करण्यात येत आहे. त्यामुळे वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यापर्यंत पोहचणे शक्य होत नाही. त्यामुळे महाजनकोच्या माध्यमातून सर्व अतिक्रमण काढुन तेथे वृक्षारोपणासारखा उपक्रम राबविण्याला प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना करतांना श्रीमती बिदरी यांनी पर्यटकांसाठी उपलब्ध जीप्सी तसेच पर्यटक शुल्कामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिने प्रस्ताव तयार करावा, तसेच बफर क्षेत्रात पर्यटकांसाठी आवश्यक नियम तयार करुन त्यानुसार पर्यटनाचा मार्ग निश्चित करावा असेही श्रीमती बिदरी यांनी सांगितले.

प्रारंभी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी स्थानिक सल्लागर समितीच्या मागील बैठकीचे इतिवृत्त सादर करुन त्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. यावेळी श्रीमती पूनम धनवटे, बंडू धोतरे, धनंजय बापट, योगेश दुधपजारे तसचे सरपंच श्रीमती शोभाताई कोचाडे व सुनिता कातकर यांनी विविध सूचना मांडल्या. त्याअनुषंगाने अहवाल सादर करावा असे यावेळी विभागीय आयुक्तांनी सांगितले.

00000

Tuesday, 23 January 2024

डागा शासकीय रुग्णालयात थैलेसिमिया रुग्णांकरिता ‘मनोधैर्य’ उपक्रम


नागपूर, दि. 21 : डागा शासकीय रुग्णालय येथे सिकलसेल, हिमोफिलिया तसेच थैलेसिमिया रुग्णांकरिता वैद्यकीय अधीक्षिक डॉ. सीमा पारवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोधैर्य उपक्रमास 19 जानेवारी रोजी सुरुवात करण्यात आली.  

रुग्णालयाच्या हिमोफिलिया डे केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या सामाजिक, मानसिक तसेच आर्थिक समस्या समजून घेण्याकरिता मनसोपचार तज्ज्ञ  डॉ. प्रवीण नवखरे यांच्याद्वारे  रुग्ण, डॉक्टर यांच्यामध्ये  समूह चर्चेद्वारे  रुग्णांच्या मनात उद्भवणाऱ्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. तसेच रुग्ण व त्यांच्या पाल्यांकरिता विपश्यना, ध्यान साधनेचे सत्र आयोजित करण्यात आले.

बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सिकलसेल समन्वयक प्राजक्ता चौधरी. समुपदेशक संजीवनी सातपुते. प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रचिती वाळके व हिमाटोलोजी समन्व्यक संदीप पोरटकर, समुपदेशक लीना गजभिये व इतर कर्मचाऱ्यांद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

                                                            ******

सिंधुरागिरी महानाट्यातील रामटेकच्या ऐतिहासिक महत्म्याला रसिकांची पसंती




·         महासंस्कृती महोत्सवात लेझर शो, मशाल यात्रा,गीत गायन व आतीषबाजीने वेधले लक्ष

·         आज विख्यात गायक कैलास खेर यांचे सादरीकरण

नागपूर दि. 22 : रामटेक येथे प्रभू श्रीराम यांच्या वास्तव्याचे महात्म्य व रामटेकची ऐतिहासिक व पौराणिक महती, सिंधुरागिरी महानाट्यातून महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी आज सादर करण्यात आली. रामटेकचा इतिहास सांगणाऱ्या या महानाट्याचा हजारो लोकांनी आनंद घेतला. 

            रामटेक येथील नेहरू मैदानावर सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी लेझर शो, रंगबिरंगी आतीषबाजी, मशाल यात्रा, स्थानिक कलावंताद्वारे गीत गायन व आजचे विशेष आकर्षण असलेले  सिंधुरागिरी महानाट्य सादर करण्यात आले.

आमदार चंद्रशेखर बावनकुळे,आमदार ॲड.आशिष जयस्वाल, रामटेकच्या उप विभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी आदी उपस्थित होते.

रामटेकच्या पौराणिक इतिहासाची महिमा सांगणाऱ्या या महानाट्याची संकल्पना आ. ॲड.आशिष जयस्वाल यांची असून लेखन अमन कबीर यांचे तर रवींद्र दुरुगकर यांचे दिग्दर्शन, ध्वनी व्यवस्था चारू जिचकार व पुष्कर देशमुख यांचे संगीत आहे. नेपथ्य नाना मिसाळ व सतिश काळबांडे यांचे होते.

            पद्मपुराणापासून तर भोसलेकालीन लढाया, नृसिंह अवतार, रामाच्या वनवासाचा कालखंड आदी प्रसंग यात उभे करण्यात आले आहेत. सिंधुरागिरी पर्वताचे महात्म्य यात वर्णन करण्यात आले.

रामटेकचा परिसरातील मौर्य शासकांचा कार्यकाल, सातवाहनांच्या काळ,  वाकाटकांनी केलेली सत्ता काबीज, महाकवी कालिदासांचे ‘मेघदूत’, वाकाटककालिन नगरधनचा किल्ला आदी रामटेकशी संबंधित ऐतिहासिक प्रसंग  या महानाट्यातून सादर करण्यात आले.

हे नाट्य  नागपूर व रामटेकच्या सुमारे 70 कलाकारांनी सादर केले. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या महानाट्याला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने राज्यातील सुरू असलेल्या 19 ते 23 जानेवारी या काळातील महासंस्कृती महोत्सवाचा उद्या समारोप होणार आहे. उद्या शेवटच्या दिवशी सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांचे सादरीकरण होणार असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रवेश मोफत असून प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार असून बरोबर सात वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

*****