Thursday, 27 March 2025

प्रधानमंत्री भेटीसंदर्भातील तयारीचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

 


 

नागपूर, दि. 27 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 30 मार्च 2025 रोजीची नागपूर भेट व दरम्यान आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या तयारी संदर्भात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज आढावा घेतला.

 श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या आढावा बैठकीस महामेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सूधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि आयोजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन, स्मृती मंदीर रेशीमबाग, दिक्षाभूमी येथील भेट आणि माधव नेत्रालय व सोलार एक्सप्लोसिव कंपनी येथील कार्यक्रमाची संपूर्ण तयारी व यासाठी शासकीय यंत्रणा तथा आयोजक संस्था यांच्या तयारीचा आढावा घेवून श्रीमती बिदरी यांनी यावेळी आवश्यक सूचना दिल्या.

 

00000


प्रगती अभियान व स्पर्धेत विभागीय आयुक्त कार्यालयासह नागपूर विभागाला 7 पुरस्कार

 



Ø  विभागीय आयुक्तांकडून पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन


नागपूर, दि. 26:  विभागीय आयुक्त कार्यालयाने नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी राबविलेल्या ‘ई-पंचनामा ॲप’ या अभिनव उपक्रमाची दखल घेत आयुक्त कार्यालयास वर्ष 2023-24 चा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, नागपूर व चंद्रपूर महानगर पालिका, नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर जिल्हा परिषद आणि गडचिरोली जिल्ह्यातील नायब तहसिलदार यांना वर्ष 2023-24 आणि वर्ष 2024-25 चे प्रशासकीय गतिमानता पुरस्कार जाहीर झाले आहेत. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

 प्रशासन लोकाभिमुख करणे, त्यात निर्णयक्षमता आणणे आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करण्यासाठी वर्ष 2023-24 आणि वर्ष 2024-25 या दोन वर्षात राज्यस्तरावर तसेच तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर व महानगरपालिका स्तरावर "राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान" राबविण्यात आले. या स्पर्धेत सहभागी सर्व कार्यालय व अधिकाऱ्यांचे विविध निकषांवर परिक्षक मंडळाकडून परिक्षण करुन निकाल तयार करण्यात आला व 26 मार्च 2025 रोजी शासन निर्णयाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

 वर्ष 2023-24 च्या स्पर्धेत विभागीय आयुक्त आणि नागपूर मनपा प्रथम

चंद्रपूर मनपा आणि भंडारा जिल्हाधिकारी यांनाही पुरस्कार

प्रगती अभियान व स्पर्धा 2023-24 करिता राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयांच्या श्रेणीमध्ये नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 10 लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  विविध प्रकारच्या 12 नैसर्गिक आपत्तीच्या वेळी उद्धवणाऱ्या परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी ई-पंचनामा ॲप तयार करण्यात येऊन डीबीटी द्वारे थेट मदत देण्याचा अभिनव उपक्रम राबविल्या बद्दल विभागीय आयुक्त कार्यालयास हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

 महानगरपालिकांच्या श्रेणीमध्ये नागपूर महानगपालिकेने आर्थिक नियोजनासाठी विकसित केलेल्या ‘फायनान्सीयल अकाऊंटींग सिस्टिम’ करिता प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. 10 लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याच श्रेणीमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 4 लाख रूपये रोख असे या पुरस्कारचे स्परूप असून  महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांना मालमत्ता कराचा भरणा करण्याकरिता अवलंबीलेल्या विशेष पद्धतीची दखल घेण्यात आली आहे. 

 सर्वोकृष्ट कल्पना व उपक्रमांतर्गत शासकीय अधिकाऱ्यांच्या गटात भंडारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.  चॅट बॉट प्रणालीद्वारे प्रशासकीय कार्यालये व नागरिकांना नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना देण्याच्या अभिनव उपक्रमाची दखल घेत पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आदर्श आचारसंहिता अंमलात असल्याने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा 2023-24 चे पुरस्कार जाहिर करण्यात आले नव्हते हे पुरस्कार आज जाहीर झाले आहेत.

 

वर्ष 2024-25 च्या स्पर्धेत गडचिरोली, नागपूर जिल्हाधिकारी आणि

चंद्रपूर मनपा कार्यालयांना पुरस्कार  


प्रगती अभियान व स्पर्धा 2024-25 करिता विभागीय स्तरांवरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या श्रेणीमध्ये गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 4 लाख रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप असून लोकसहभागातून सामुहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांचे सक्षमीकरण करण्याच्या उपक्रमाची दखल घेण्यात आली आहे.  

 महानगरपालिका श्रेणीमध्ये चंद्रपूर महानगपालिकेला तृतीय क्रमांकाचा 4 लाख रूपये रोख रकमेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या महानगरपालिकेने सौंदर्यीकरण अभियान, जलाशय व पाणीसाठ्यांची स्वच्छता, शाळा इमारत नूतनीकरण, सुंदर माझे उद्यान, ओपन स्पेस स्पर्धा, रस्त्यांचे सुशोभिकरण, विविध शिल्प आदी राबविलेल्या अभिनव उपक्रमाची दखल घेण्यात आली आहे.

 सर्वोकृष्ट कल्पना व उपक्रमांतर्गत शासकीय अधिकाऱ्यांच्या गटात गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तहसिल कार्यालयाचे नायाब तहसिलदार निखील पाटील यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून 30 हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नागरिकांना तहसिल कार्यालयाच्या एकाच मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन सेवांची माहिती पुरविण्याच्या अभिनव उपक्रमाची दखल घेण्यात आली आहे. याच श्रेणीमध्ये ‘दवाखाना आपल्या दारी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांना संयुक्तरित्या तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून 20 हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 पुरस्कार विजेत्यांचे विभागीय आयुक्तांकडून अभिनंदन

        राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियान व स्पर्धा 2023-24 व 2024-25 मध्ये पुरस्कार जाहीर झालेल्या नागपूर विभागातील महानगरपालिका, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नायब तहसिलदार या सर्वांचे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी अभिनंदन केले आहे व शुभेच्छाही दिल्या आहेत.   

या सर्व पुरस्कार विजेत्या संस्था व अधिकाऱ्यांना पुरस्कार रकमेचा उपयोग कार्यालयांच्या सुधारणेसाठी तसेच स्पर्धेत पाठविण्यात आलेल्या उपक्रमांच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी करायचा आहे.

 

000000


Wednesday, 26 March 2025

विभागीय वनहक्क समितीने सर्वच 48 अपील काढले निकाली




                 नागपूर, दि. 25: जिल्हास्तरीय वनहक्क समितीने नामंजूर केलेल्या अनुसूचित क्षेत्रातील वनहक्क दाव्यांचे ठेवण्यात आलेले सर्वच 48 अपील विभागीय आयुक्त तथा विभागीय वन हक्क समितीच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज निकाली काढण्यात आले.

                 श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय वनहक्क समितीच्या बैठकीत तीन पिढी पुरावा आणि वन विभागाच्या जमिनीवरील 2005 पूर्वीच्या अतिक्रमण पुरावा व इतर पुरावे जिल्हास्तरीय वनहक्क समितीने नामंजूर केलेले गडचिरोली जिल्ह्यातील 45 तर चंद्रपूर जिल्ह्यातील 3 अपील ठेवण्यात आले. हे सर्व अपील निकाली काढण्यात आले. 

                 अपर आयुक्त आदिवासी विकास नागपूर तथा समितीचे सदस्य सचिव रविंद्र ठाकरे, समितीचे सदस्य मुख्य वनसंरक्षक गडचिरोली एस. रमेश कुमार, अपर आयुक्त आदिवासी कार्यालय नागपूरचे वरिष्ठ निरीक्षक मिलींद भगत, सहायक आयुक्त भूसुधार शिल्पा सोनुले आणि समितीचे अशासकीय सदस्य सुधाकर कुळमेथे यावेळी उपस्थित होते. विभागीय वनहक्क समितीस प्राप्त एकूण 56 अपिलांपैकी 48 अपीलकर्ते उपस्थित होते. हे सर्वच अपील निकाली काढण्यात आले असून उर्वरित 8 ही गडचिरोली जिल्ह्यातील अपील पुढील बैठकीत निकाली काढण्यात येणार आहेत.  
          
             अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम 2006 व नियम 2008 आणि सुधारित नियम 2012 अंतर्गत जिल्हास्तरीय वन हक्क समितीने नामंजूर केलेल्या अनुसूचित क्षेत्रातील वन हक्क दाव्यांच्या अपिलावर निर्णय घेण्यासाठी सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयानूसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय वन हक्क समितीची स्थापना करण्यात आली आहे.

 00000

Monday, 24 March 2025

अन्न सुरक्षा आणि हळदीसाठी बाजार संपर्क कार्यक्रम उत्साहात

 



नागपूर,दि. 23 : अन्न सुरक्षा आणि हल्दीसाठी बाजार संपर्क हा एक दिवसीय कार्यक्रम शहरातील सेंटर प्राईट हॉटेल येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी राष्ट्रीय हळद मंडळाचे अध्यक्ष पल्ले गंगाधर रेड्डी होते. स्पाइसेस बोर्ड इंडियाच्या सचिव पी. हेमलताश्रीमती एन भवानी, भारतीय वन सेवेचे अधिकारी किशोर मानकर, कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पंचभाई, डॉ. मनिष मोंघे, वैज्ञानिक-सीस्पाइसेस पार्कचे डॉ. भारत गूडदे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री पल्ले गंगाधर रेड्डी यांनी बाजारविकास व गुणवत्ता वृद्धीमध्ये बोर्डच्या धोरणात्मक भूमिकेवर भाष्य केले.
त्यांच्या भाषणात श्री रेड्डी यांनी नॅशनल टर्मरिक बोर्डच्या वचनबद्धतेवर भर दिला.

या एक दिवसीय कार्यक्रमात पहिल्या सत्रात हळदीच्या ब्रँडींग आणि मार्केटींग विषयावर डॉ. पंचभाई यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात  हळदीच्या व्यवस्थापनाबाबत माहिती डॉ. मनिष मोंघे यांनी दिली. डॉ. ममता धनकुटे यांनी  हळदीचे उत्पादन सुधारणागुणवत्ता वृद्धी आणि निर्यात वाढ यावर स्पाइसेस बोर्डच्या धोरणात्मक हस्तक्षेपांवर एक उपयुक्त सत्र घेतले.

कार्यक्रमाचे उद्घाटन पल्ले गंगाधर रेड्डी व मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास कृषी क्षेत्रातील तज्ञ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000