Monday, 31 March 2025

आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी नियंत्रण समिती - डॉ. अशोक उईके

 


Ø  आदिवासी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात अत्याधुनिक सुविधा

Ø  शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थाचे मार्गदर्शन

Ø  नविन शिक्षण धोरणानूसार उपक्रमांची आखणी

Ø  रविंद्र ठाकरे यांनी सुरू केलेले उपक्रम कायम राहणार

नागपूर, दि. 31 :   अतिदुर्गम भागात राहणारा आदिवासी समाज आपल्या संस्कृतीचे संवर्धन करत असला तरी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. यासाठी शिक्षणाच्या सर्व सुविधा आश्रमशाळांच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. आश्रमशाळा तसेच वस्तीगृहामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये वाढ करतांनाच आश्रमशाळांचा दर्जा वाढविण्यासाठी नियंत्रण समिती तयार करण्यात येणार असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईक यांनी केली.

वनामती येथील सभागृहात आदिवासी विकास विभागातर्फे नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण तसेच यासाठी सहाय्य करणाऱ्या संस्थांचा गौरव समारंभ आदिवासी विकास मंत्री यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री शंकरबाबा पापळकर होते. यावेळी अतिरिक्त आदिवासी उपायुक्त रविंद्र ठाकरे, उपायुक्त दिगंबर चव्हाण, प्रकल्प अधिकारी रंजित यादव (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी), दिपक हेडाऊ (वर्धा), विकास राचेलवार (चंद्रपूर), प्रविण लाटकर (चिमूर), निरज मोरे (भंडारा), उमेश काशीद (देवरी), उपसंचालक डॉ. पुरूषोत्तम मडावी, शिवराम भलावी, दिनेश शेराम, डॉ. गोडवते, अधिक्षक अभियंता उज्वल डाबे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. पद्मश्री मिळाल्यानंतर शंकरबाबा पापळकर व रविंद्र ठाकरे यांचा सेवानिवृत्तीनिमीत्त गौरव करण्यात आला.

आदिवासींच्या जिवनात आर्थिक व सामाजिक परिवर्तना सोबतच संपूर्ण समाज शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होईल यादृष्टीने काम करण्याची आवश्यकता असून आदिवासी विभागाची अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी मागिल चार वर्षात विविध उपक्रमांच्या माध्यमातून या समाजाच्या सर्वांगिन विकासाला प्रोत्साहन दिले आहे. आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी यासाठी बोलका वर्ग, ब्रायटर माईंड आदी शैक्षणिक उपक्रम राबविले. याउपक्रमामुळेच अनेक विद्यार्थी गुणवत्त यादीत येवू शकले. त्यांनी सुरू केलेले सर्व उपक्रम यापुढेही कायम सुरू राहतील असा विश्वास आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी व्यक्त केला.

आदिवासी विभागाच्या अंतर्गत असलेल्या सर्व आश्रमशाळा व वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधांमध्ये आमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. नविन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीचे शैक्षणिक साहित्य पुरविणे आवश्यक आहे. वस्तीगृहामध्ये असलेल्या सोयी व सुविधा कशा वाढविता येईल यासाठी प्रत्येक आश्रमशाळेसाठी नियंत्रण समिती तयार करण्यात यावी व ही समिती नियमीत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधेल तरच प्रत्येक आदिवासी मुलाला शैक्षणिक सुविधा उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आदिवासी आश्रमशाळांच्या शैक्षणिक उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या विविध संस्था व व्यक्तींचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.

पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी आदिवासी समाज हा प्रमाणिक व मेहनती असल्यामूळे जंगलांच्या संवर्धनासाठी महत्वाची भुमिका बजावत आहे. आदिवासी भागात शिक्षणाच्या सुविधा निर्माण करून दर्जेदार शिक्षण मिळेल यासाठी विभागाने पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. आदिवासी भागातील प्रत्येक मुलगा शाळेत येईल. यासाठी  उपाययोजना कराव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले.  

00000


नागपूर येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे; शासन सर्वतोपरी मदत करेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


Ø  वैदिक गणिताच्या खंडांचे प्रकाशन

        नागपूर, दि. 31 : भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. या वैदिक गणिताची महती व उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्याकरिता भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशा अपेक्षा व्यक्त करत यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

            विश्व पुनर्निर्माण संघ संचालित भारती कृष्ण विद्या विहार शाळेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जगदगुरू शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज प्रणित  'वैदिक मॅथेमॅटिक्स बेसिक टु ॲडवान्स' आणि 'वैदिक गणित सूत्र अरिथमॅटिक' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. वैदिक गणिताच्या दोन खंडांचे प्रकाशन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. विश्व पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार काळे, सरचिटणीस शैलेश जोगळेकर, संचालक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.



            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्राचीन भारतीय संस्कृतीत अनेक महत्वाची शास्त्र विकसित झाली आहे. मात्र, प्राप्त परिस्थिती व परकीय आक्रमण आदींमुळे या शास्त्रांतील ज्ञान सर्वांपर्यंत पोहचू शकले नाही.  आद्य शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज यांनी वेद ऋचांचा अभ्यास करून सोप्या पद्धतीने संपूर्ण गणिताची मांडणी वैदिक गणित खंडांमध्ये केली आहे. केंद्रीय माध्यमिक मंडळाच्या इयत्ता पाचवी ते सातवी च्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. या खंडांच्या माध्यमातून वेदांमधील ज्ञानाचा साठा शंकराचार्यांनी शोधला आहे. वैदिक गणित ही भारताची महत्वाची मोठी ज्ञान संपदा आहे. त्याचे संशोधन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने भारती कृष्ण विद्या विहारामध्ये गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच राज्याच्या शिक्षण विभागाद्वारे वैदिक गणित विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सकारात्मक विचार करू असेही त्यांनी सांगितले.  

            सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, मानवी जीवनात अनेक प्रसंगांमध्ये गणना, आकडेवारीचे अनन्य साधारण महत्व आहे. सांख्यदर्शन, वक्ररचना निर्देशांक यांच्यासह नल-दमयंती आख्यान, महाभारत आदींमधील उदाहरणे देवून त्यांनी गणिताचे महत्व विषद केले. प्राचीन भारतीय परंपरेतून आलेल्या वैदिक गणिताचा विचार हा विश्व कल्याणासाठी आहे. जगात अध्यात्मावर आधारित  घडत असलेल्या विविध परिवर्तन आणि पुनर्रचनेमध्ये वैदिक गणितही महत्वाची भूमिका निभावू शकते आणि जगाला सुखी व समृद्ध बनविण्यातही मोलाचे योगदान देवू शकते असे त्यांनी सांगतिले.

              विश्व पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर  सरचिटणीस शैलेश जोगळेकर यांनी आभार मानले.


000000

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


जिल्हा सहकारी बँकेला आता शक्तीशाली जोड

-  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Ø                                                                महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे जिल्हा सहकारी बँकेच्या संस्थात्मक प्रशासकत्वाची जबाबदारी

नागपूर,दि. 30 : ज्या जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकांचे जाळे सक्षमपणे कार्यरत आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी अधिक सुखी असल्याचे आपण पाहतो. याचबरोबर अशा जिल्ह्यांमध्ये शेतीपुरक उद्योगाने चांगला आकार घेतल्याचे आपल्या निर्दशनास येते.  या दृष्टीने विचार करुन नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया बळकट करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या संस्थापक प्रशासकत्वाची जबाबदारी आजपासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे सुपूर्द केल्याने शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग अधिक व्यापक होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला संस्थापक प्रशासक नियुक्ती सोहळ्यात ते बोलत होते. गुडीपाडव्याचे औचित्य साधून नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित या विशेष समारंभास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, वित्त व नियोजन, कृषी व मदत पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जैस्वाल, आमदार आशिष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, सहकार आयुक्त दिपक तावरे, प्रशासक विद्याधर अनास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देणारी हक्काची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेत काही वर्षांपूर्वी आर्थिक घोटाळा झाला. 2015 ते 2019 या कालावधीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बँकेला यातून सावरण्यासाठी खूप प्रयत्न केले. तेव्हा सरकारकडून तीनशे कोटी रुपये एवढा निधी दिला. परंतु बँक यातून सावरली नाही. आमदार आशिष देखमुख यांनी प्रशासक पदाबाबत केलेल्या विनंतीचा विचार करुन आपण हा पहिला प्रयोग करत आहोत. सहकार आयुक्तालयाने यात यथायोग्य भूमिका निभावून येत्या दीड वर्षात नागपुरची जिल्हा सहकारी बँक आर्थिक फायद्यात येईल याची खात्री दिली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

                                                     जिल्हा सहकारी बँकेला आता शक्तीशाली जोड

             केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुडीपाडव्याच्या औचित्याने नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेली ही अपूर्व भेट आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या रुपाने नागपूर जिल्हा सहकारी बँकेला आता एक शक्तीशाली जोड मिळाली. येत्या दोन वर्षात ही बँक फायद्यात येण्यासह जिल्ह्यात सहकाराचे जाळे अधिक भक्कम होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

आमदार आशिष देशमुख यांनी जिल्हा सहकारी बँकेत सर्वांनी मुदत ठेवी दाखल करुन आकर्षक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केले. शिखर बँका, जिल्हा बँका व विविध कार्यकारी संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. यावर्षी राज्य बँकेने 52 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा पार केला असून 650 कोटींपेक्षा अधिक नफा बँकेने प्राप्त केल्याचे अनास्कर यांनी सांगितले.

0000


Sunday, 30 March 2025

पंतप्रधानांच्या हस्ते सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्टे रेंज व रनवे चे उद्घाटन

 



नागपूर, दि. 30 : नागपूर – अमरावती रोडवरील बाजारगाव स्थित सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्ट रेंज आणि रनवे सुविधेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलर कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, कंपनीचे व्यवस्थापकीस संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष नुवाल, सोलर डिफेंस ॲन्ड एरोस्पेस लिमिटेडचे कार्यकारी संचालक वासुदेव आर्या उपस्थित होते.

 



            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोटेरिंग म्युनिशन टेस्ट सुविधेचे तसेच भारतातील पहिली अनमॅन एरियल सिस्टीम (युएसए), 1.27 कि.मी. चे रनवे, हँगर्स आणि रिपेअर लेनचे रिमोटद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सोलर ग्रुप द्वारा निर्मित अत्याधुनिक सुरक्षा यंत्राचे अवलोकन केले. कार्यक्रमाला कंपनीचे उपमहाव्यवस्थापक श्याम मुंदडा व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००००