Wednesday, 15 March 2017

संशयास्पद सोनोग्राफी केंद्राची माहिती देणाऱ्यांना बक्षीस -सचिन कुर्वे

  • पीसीएनडीटी कायद्यांची कठोर अंमलबजावणी
  • जिल्हयातील सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी
  • जिल्हयात लिंग गुणोत्तर प्रमाण 946
  • सोनोग्राफी मशीनला युनिक आयडी ओळख क्रमांक

नागपूर, दि. 14 : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान प्रतिबंध कायद्याची जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी सुरु असून प्रशासनाकडे नोंदणी झालेल्या सर्व केंद्राची नियमित तपासणी करण्यात येत आहे. सोनोग्राफी केंद्रासंदर्भात तक्रारी असल्यास अथवा संशयास्पद सोनोग्राफी केंद्रांची माहिती देणाऱ्या व्यक्तिंना बक्षीस देण्याची योजना असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज येथे दिली.
स्त्री जन्माचे स्वागत करतांनाच  गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानानंतर कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी जिल्हयात पीसीएनडीटी सेल जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अंतर्गत निर्माण केला असून जिल्हयात तसेच शहरात नोंदणीकृत झालेल्या सर्व सोनोग्राफी केंद्राची दर तीन महिन्यामध्ये तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
पीसीएनडीटी या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली असून या संदर्भात जनतेच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने तसेच 18202334445 या टोल फ्री क्रमांकावरील हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. संशयास्पद सोनोग्राफी केंद्रांची माहिती देणाऱ्या व्यक्तिकरीता 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच या माहितीच्या आधारे संबंधित केंद्रावर धाड घालून न्यायालयात फौजदारी केस दाखल केल्यानंतर माहिती देणाऱ्यांना बक्षीस देण्याची तरतूद करण्यात आली  आहे. यासाठी www.amchimulgi.gov.in  या संकेत स्थळावर आपण तक्रारसुद्धा नोंदवू शकता असेही, त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत पीसीएनडीटी या कायद्यांच्या अंमलबजावणीअंतर्गत सर्व सोनोग्राफी केंद्रे जनुकीय केंद्रे व समुपदेशन केंद्रे कायद्याच्या कक्षेत आणण्यात आली आहे. त्यासोबतच या सर्व केंद्रावर देखरेख ठेवण्यासाठी तपासणी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारांवर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
जिल्हयात  जन्माच्या वेळेच्या मुलामुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण 946 असून मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे व कायद्याचेही प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी समाजजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे म्हणाले की, शहरात 537  सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी झाली असून जिल्हयात 89 केंद्रे नोंदणीकृत आहेत. ग्रामीण भागात 59 केंद्रे कार्यरत आहेत. जिल्हयात 13 तालुक्याच्या ठिकाणी 11 ठिकाणी सोनोग्राफी केंद्रे असून दर तीन महिन्याअंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली कडक तपासणी करण्यात येते. जिल्हयातील  सर्व सोनोग्राफी केंद्रातील मशिनला युनिक आयडी ओळख क्रमांक देण्यात आला आहे. त्यानुसार सोनोग्राफी केंद्रावरील संपूर्ण माहिती जतन करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यावेळी सांगितले.
                                                                                                   *****

No comments:

Post a Comment