* जागतिक जलदिन सप्ताहाचे उद्घाटन
* नऊ नद्यांचे पाण्याचे जलपूजन करुन जलदिनाचा शुभारंभ
नागपूर, दि. 16 : पाण्याचे संवर्धन व जतन करण्याची पुरातन काळापासून सुरुवात झाली असून त्यानंतर पाणी साठवण्याच्या संदर्भात होत असलेली अनास्था ही पाणी टंचाईसाठी कारणीभूत ठरत आहे. सर्वांसाठी आवश्यकतेनुसार पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यायचे असेल तर पाण्याचा अपव्यय व गैरवापर टाळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.
सिंचन भवन येथे जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी विभागातील नऊ नद्यांच्या पाण्याचे जलपूजन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता रसिक चव्हाण होते तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जलसंधारण संस्थेचे अध्यक्ष संजय वानखेडे, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता जे. एम. शेख, अधीक्षक अभियंता सर्वश्री ज. द. बोरकर, ज. जी. गवळी, आर. एस. सोनटक्के, आशिष देवगडे, विजय गावंडे, श्री. मडामे, कार्यकारी अभियंता श्री. ढवळे, राजुरकर, भारतीय जलसंधारण संस्थेचे सचिव प्रवीण महाजन आदी उपस्थित होते.
पाण्याचे संवर्धन व जतन करण्याची लोक चळवळ निर्माण होण्याची आवश्यकता व्यक्त करतांना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे म्हणाले की, जागतिक जलदिनानिमित्त पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जतन करणे आवश्यक आहे. पाण्यासंदर्भात पूर्वजांनी केलेल्या कार्यामुळे पाण्याची उपलब्धता महत्त्वाची आहे. हेच कार्य भावी पिढीसाठी करण्याची आवश्यकता जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी व्यक्त केली.
मुख्य अभियंता रसिक चव्हाण यांनी जलदिनानिमित्त पाण्याचे संवर्धन व वापरासंदर्भात असलेला गैरसमज दूर करुन नैसर्गिक प्रवाह जलाशय व कालव्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. नागपूर विभागात विपूल प्रमाणात जलसंचय असला तरी अनियमित पावसामुळे निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी जलजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दीप प्रज्वलित करुन जागतिक जलदिन व जलदिन सप्ताहाचा शुभारंभ केला. तसेच विभागातील नऊ नद्यांचे पाणी जलकुंडात अर्पण करुन जलपूजन केले. यावेळी जलजागृती निमित्त जलसंदेश पत्रकाचे विमोचन केले. तसेच जलसंवर्धनासाठी जलप्रतिज्ञा घेण्यात आली.
प्रारंभी कार्यकारी अभियंता श्री. ढवळे यांनी स्वागत केले. तर प्रास्ताविक सहाय्यक अभियंता संजय जोशी यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन शाखा अभियंता श्रीमती सोनाली नाहार, जलवंदना सौ. पोइली यांनी तर आभार उप अभियंता श्री. सपकाळ यांनी मानले.
*****


No comments:
Post a Comment