नागपूर, दि. 16 : वेस्टर्न कोल्डफिल्ड अंतर्गत गोंडेगाव-घाटरोहणा ओपनकास्ट प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या 227 प्रकल्पग्रस्तांपैकी नोकरीकरिता विकल्प दिलेल्यांना नोकरी व नोकरीऐवजी एकमुश्त आर्थिक मोबदल्याचे संमती दिलेल्यांना तात्काळ मोबदला देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात वेस्टर्न कोल्डफिल्डसाठी जमीन अधिग्रहणानंतर प्रकल्पग्रस्तांना नोकरी अथवा एकमुश्त आर्थिक मोबदला देण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेड नागपूरच्या क्षेत्रांतर्गत गोंडेगाव-घाटरोहणा ओपनकास्ट प्रकल्पासाठी 169. 88 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली यामध्ये प्रकल्पग्रस्त असलेल्या 227 व्यक्तींना नोकरी अथवा नोकरीऐवजी एकमुश्त आर्थिक मोबदला तसेच इंदर युजी ते ओपनकास्ट प्रकल्पांतर्गत मौदा टेकाडी (पारशिवनी) येथील 12.64 हेक्टर जमीन थेट खरेदी करायच्या संपादनापोटी 15 व्यक्तींना नोकरी अथवा एकमुश्त रक्कम. उमरेड क्षेत्रांतर्गत दिनेश (मकरधोकडा-3) प्रकल्पासाठी मौदा हेवती या गावच्या पुनर्वसनासाठी उदासा व राजुरवाडी येथील 18.66 हेक्टर जमीन थेट खरेदी करण्यात आली आहे. येथील 11 प्रकल्पग्रस्तांनाही नोकरी अथवा एकमुश्त आर्थिक मोबदला देण्यासही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी मंजुरी दिली आहे.
वेस्टर्न कोल्डफिल्डतर्फे नोकरीकरिता विकल्प दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर घेण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. व याकरिता आवश्यक असलेले कागदपत्र देण्यासंदर्भात तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व वेस्टर्न कोल्डफिल्डच्या अधिकाऱ्याने शिबिराचे आयोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिल्या आहेत.
****

No comments:
Post a Comment