Friday, 17 March 2017

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार जाहीर

नागपूर दि. 16 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांचे मार्फत राज्याचे युवा धोरणानुसार, 2012 च्या शासन निर्णयानुसार राज्य व जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा स्तरावर युवा पुरस्कार दरवर्षी शासनाकडून देण्यात येत आहे.
पुरस्काराचे स्वरुप :
जिल्हा युवा पुरस्कार जिल्हास्तरावर एक युवक व एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. गौरवपत्र, सन्मानचिन्ह रोख रक्कम 10,000 रु. देण्यात येईल. संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह रोख रक्कम 50,000 रु. अशा स्वरुपाचा असेल.
युवक युवतींसाठी पात्रतेचे निकष :
अर्जदाराचे वय 1 एप्रिल रोजी 13 वर्ष पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्ष पूर्ण झालेले असावे. अर्जदार राज्याचा, जिल्ह्याचा सज्ज नागरिक असावा. पुरस्कार, व्यक्ती व संस्थेस विभागून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. ( उदा, वुत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इ. )अर्जदार व्यक्तीने कार्य हे स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी पात्र राहणार नाही.
संस्थांसाठी पात्रता निकष :
पुरस्कार संस्थेस विभागून दिला जाणार नाही. कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार पंजीबद्ध असावे. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर पाच वर्ष कार्य करणे आवश्यक राहील. एका जिल्ह्यात अर्ज केल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज सादर करता येणार नाही. सोबतच पोलीस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला आवश्यक राहील.
युवा कार्यकर्त्यांनी 31 मार्च 2017 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मानकापूर कोराडी रोड, नागपूर येथे दोन प्रतीत सिलबंद लिफाफ्यात अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी व अर्ज प्राप्तीकरीता www.nagpursports.com या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी एका परिपत्रकानुसार केले आहे.  

****

No comments:

Post a Comment