जागतिक महिला दिनानिमित्त कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण
अधिनियम 2005 या विषयावर कार्यशाळा संपन्न
नागपूर, दि. 8 : स्त्रियांच्या समाजातील दर्जाला संरक्षण देण्याच्या हेतूने राज्यघटनेमध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे स्त्रियादेखील आपले हक्क आणि अधिकारांबाबत जागृत झाल्या आहेत. परंतु अजूनही समाजात स्त्री-पुरुष समानता हव्या त्या प्रमाणात रुजलेली आढळून येत नाही. महिला दिनासारख्या महत्त्वाच्या दिनाचे औचित्य साधून महिला चळवळ अधिक व्यापक होवून ती यशस्वी व्हावी यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी आज केले.
मातृसेवासंघ सभागृह येथे आज जागतिक महिला दिनानिमित्त महिला बाल विकास विभाग व राज्य महिला आयोगामार्फत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005’ या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती सीमा साखरे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती नीता ठाकरे, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त एम. डी. बोरखडे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विजयकुमार परदेशी, मातृसेवा संघाच्या सचिव श्रीमती लता देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी,भरोसासेलचे प्रतिनिधी, महिला समुपदेशन केंद्रातील कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रामीण महिलांच्या परिस्थितीबाबत बोलतांना विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले की, आजही ग्रामीण भागातील स्त्रियांच्या मेहनतीला पुरुषांच्या समकक्ष मेहनताना मिळत नाही. महिला राबराब राबून देखील त्यांच्या मेहनतीला मोल नाही. परंपरेने काही कामे स्त्रियांनीच करावी, असा जणू समाजात अलिखित नियमच आहे. धान पिकाची रोवणी, पिकांची निंदणी स्त्रियाच करतात. आसामसारख्या राज्यात चहाची पाने खुडण्याचे कार्य परंपरागतपणे स्त्रियाच पार पाडीत आल्या आहेत. म्हणून स्त्रियांची परिस्थिती पालटण्यासाठी समाजाची विचारधारा बदलणे गरजेचे आहे. स्त्रीलाही पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळायला हवे. ‘मुलागा’च पाहिजे ही मानसिकता बदलायला हवी. या मानसिकतेतूनच मिरज-सागंली सारखे भ्रूणहत्याकांड घडून येते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘बेटी बचाओ’ ‘बेटी पढ़ाओ’ या योजनेचे लोण तळागाळातील लोकांपर्यंत पोहचायला हवे. स्त्रियांच्या अत्याचाराविरुद्ध ‘भरोसासेल’ शहरात उत्तम कामगिरी बजावत असल्याचेही विभागीय आयुक्त अनूप कुमार यावेळी म्हणाले.
ज्येष्ठ समाजसेविका सीमा साखरे स्त्रियांच्या प्रश्नांबाबत बोलतांना म्हणाल्या की, ‘महिला’ ही एक स्वतंत्र व्यक्ती असून ती कोणा पुरुषावर अवलंबून नाही. आपल्या संविधानाने दिलेली ‘स्त्री-पुरुष समानता’ ही महत्त्वपूर्ण बाब आहे. जाचक रुढी परंपरेला छेद देवून समाजात परिवर्तन होणे गरजेचे आहे. महिला दिन ही केवळ एक औपचारिकता नाही. समाज बदलाची प्रक्रिया देखील एकाच दिवसात होणार नाही. परंतु बदलाची सुरुवात करणारा दिवस म्हणून महिला दिनाकडे पहायला हवे, असे त्या म्हणाल्या.
महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती नीता ठाकरे म्हणाल्या की, स्त्रियांनी संकट काळात दुसऱ्या स्त्रीला मदत करायला हवी. स्त्रिया एकजूट झाल्यास पुरुषसत्ताक समाज स्त्रियांचे काहीही वाईट करु शकणार नाही. महिला आयोग स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. नुकत्याच ॲसिड हल्ल्यातील पीडित महिलांनी मुंबई येथे रॅम्पवॉक केला. ही एक मोठ्या बदलाची नांदी आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
मातृसेवासंघाच्या सचिव श्रीमती लता देशमुख यांनी ‘महिलांना जगात येवू द्या’ हा संदेश यावेळी दिला. त्या म्हणाल्या वृद्ध आईला घरात ठेवायला आज परिवारात जागा अपुरी पडत आहे. लेकी-सुनांचा हुंडाबळी जात आहे. यासाठी परिवाराची आणि समाजाची स्त्रियांप्रती मानसिकता बदलणे अत्यंत गरजेचे आहे.
महिला बाल विकास विभागाचे उपायुक्त एम. डी. बोरखडे म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणाची आज समाजात नितांत गरज आहे. स्त्रियांच्या संरक्षणासाठी शासनाने अनेक कायदे केले आहेत. समाजातील जागृकतेच्या अभावी या कायद्यांची हवी तशी अंमलबजावणी होत नाही. यासाठी समाजात स्त्रियांवर अन्याय होणार नाही तसेच होत असल्यास त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव कुणाल जाधव तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयकुमार परदेशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला व बाल विकासाच्या परिविक्षा अधिकारी श्रीमती सुजाता देशमुख तर आभार शासकीय करुणा वसतिगृहाच्या अधीक्षिका श्रीमती भारती मानकर यांनी मानले.
*****


No comments:
Post a Comment