मुंबई, दि. 6 : मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत आतापर्यंत 25 हजाराहून अधिक शेततळी पूर्ण करण्यात आल्याचे रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेततळीची कामे यांसदर्भातला प्रश्न आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानपरिषद सदस्य जयंत पाटील, विक्रम काळे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना श्री. रावल यावेळी म्हणाले की, मागेल त्याला शेततळे योजनेसाठी एकूण 96 हजार 774 इतक्या लोकांनी मागणी केली होती, त्यापैकी 25,903 शेतकऱ्यांच्या शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शेततळे मुख्यत्वे भूजल पुनर्भरणासाठी असून पावसाळ्यात भूपृष्ठावरुन वाहून जाणारे पावसाचे पाणी काही कालावधीसाठी अडविणे व जमिनीत मुरविणे यासाठी घेतली जातात. शेततळे योजनेचा लाभ सर्व इच्छुक व गरजू शेतकऱ्यांना घेता यावा यासाठी 50 पैसे आणेवारीची अट शिथिल करुन ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे.
००००
No comments:
Post a Comment