Friday, 7 April 2017

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निधी 30 जून 2017 पर्यंत खर्च करण्यास परवानगी – प्रा.राम शिंदे

मुंबई, दि. 6 : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2015-16 मधील शिल्लक निधी खर्च करण्यास 30 जून 2017 पर्यंत खर्च करण्यास परवानगी देण्यात आल्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
राज्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निधी अखर्चित राहिल्याबाबतचा प्रश्न आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानपरिषद सदस्य परिणय फुके, जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, विधान परिषद सदस्या हुस्नबानू खलिफे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
प्रा. शिंदे यावेळी म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मार्च 2017अखेर 21 कोटी 14 लाख रुपये अखर्चित राहिले आहेत. हा अखर्चित निधी खर्च करण्यास 30 जून 2017 पर्यंत परवानगी मिळाली असून यावेळी उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.सन 2016-17 मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गंत दिनांक 24 मार्च 2017 अखेर विशेष निधी 234.53 कोटी रुपये खर्च झाला आहे.  या अभियानातंर्गत आतापर्यंत 13,582 कामे पूर्ण झाली असून 6,433 कामे प्रगतीपथावर आहेत. याशिवाय 4 नद्यांच्या पुनर्विकासासाठी 13 कोटी 91 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत सन 2016-17 मध्ये नाशिक विभागास 260 कोटी 20 लाख रुपये, अमरावती विभागास 205 कोटी 36 लाख रुपये, पुणे विभागास 256 कोटी 98 लाख रुपये, औरंगाबाद विभागास 576 कोटी 61 लाख रुपये, नागपूर विभागास 93 कोटी 36 लाख रुपये आणि कोकण विभागास 35 कोटी 23 लाख रुपये विशेष निधी म्हणून वितरीत करण्यात आले असल्याचेही प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

००००

No comments:

Post a Comment