Friday, 7 April 2017

खरपुडी खुर्दच्या रस्त्याचे काम जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत पूर्ण करण्यात येईल -- सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 6 :  पुणे जिल्ह्यातील खरपुडी खुर्द येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते मुंगी घाटापर्यंतच्या रस्त्याचे काम जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत करण्यात येईल, असे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
पुणे जिल्हयातील खेड येथील श्री क्षेत्र खरपुडी खुर्द येथील क वर्ग तीर्थस्थळांच्या विकास कामास निधी मिळण्याबाबतचा प्रश्न आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानपरिषद सदस्य विजय ऊर्फ भाई गिरकर, भाई जगताप यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना श्री.मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, पुण्याच्या ग्रामीण रस्त्यांसाठी यावर्षी 30 कोटी रुपये जिल्हा परिषदेतून देण्यात आले आहेत. खरपुडी खुर्द विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते मुंगी घाट या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत 17 जानेवारी 2017 रोजी निवेदन प्राप्त झाले आहे. हे निवेदन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही पृष्ठांकित करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम क वर्ग तीर्थक्षेत्र योजनेतून करण्याबाबत पुण्याच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तथापि, सदर रस्त्याचे काम क वर्ग तीर्थक्षेत्र योजनेच्या निकषात बसत नसल्याने रस्त्याचे काम जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण या योजनेतंर्गत करण्यात येणार आहे.

००००

No comments:

Post a Comment