गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानांतर्गत पोलीस दलाच्या वापरासाठी आणिहवाई वैद्यकीय ॲम्ब्युलन्स म्हणून उपयोगासाठी नवे हेलिकॉप्टर विकत घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. यापूर्वी या भागासाठी सरकारकडून भाड्याने हेलिकॉप्टर वापरण्यात येत असल्याने त्याचा मोठा वित्तीय भार सहन करावा लागत होता. यासोबतच शासनाच्या वापरासाठीही दुसरे नवीन हेलिकॉप्टर घेण्यात येणार आहे.
राज्य शासनाने एप्रिल 2001 मध्ये डॉफिन एएस 365 एन 3 व्हीटी-एमजीके हे हेलिकॉप्टर फ्रान्समधील युरोकॉप्टर कंपनीकडून 23 कोटी रुपयांना खरेदी केले होते. 6 + 2 अशी आसनक्षमता असलेल्या या हेलिकॉप्टरचा वापर राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींनी दहा वर्ष केला. युरोकॉप्टर उत्पादक कंपनीच्या सेवा नियमावलीनुसार प्रत्येक हेलिकॉप्टरने पाच हजार उड्डाण तास अथवा दहा वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याची पूर्णत: तपासणी करावी लागते. 2010 नंतर केंद्र शासनाच्या नागरी उड्डाण संचालनालयाने देशातील सर्व राज्यांमध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वापरात येणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये अत्याधुनिक व सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन यंत्रणा बसविणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या या हेलिकॉप्टरने 2201 उड्डाण तास पूर्ण केल्यानंतर ते पाच वर्षे भूमिस्थ (Landed) आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने जानेवारी 2016 मध्ये या हेलिकॉप्टरची देखभाल-दुरूस्ती करुन त्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी हेलिकॉप्टरच्या पूर्ण तांत्रिक तपासणीसाठी 18 कोटी रुपये, त्याशिवाय इतर अनुषंगिक खर्चासाठी पाच कोटी 96 लाख रुपये इतका खर्च गृहित धरण्यात आला होता. या निर्णयानुसार ई-निविदा जारी केल्यानंतर निविदाकारांनी या हेलिकॉप्टरच्या देखभाल-दुरूस्तीसाठी 28 ते 33 कोटी खर्च येईल असे नमूद केले होते आणि हा खर्च यापेक्षा वाढू शकत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. या हेलिकॉप्टरचे आयुष्य 30 वर्ष असून त्यातील 10 वर्षे संपली आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा दोन वर्षाचा कालावधी गृहित धरल्यास संपूर्ण कार्यवाही करुनही त्याचा आणखी अठरा वर्ष इतकाच वापर होऊ शकणार आहे. तसेच त्याची विक्री करूनही फार मोठी किंमत येणार नसल्याने ते राज्यातील शैक्षणिक संस्थेला अभ्यास वा त्या स्वरुपाच्या प्रयोजनासाठी विनामुल्य देण्यात येणार आहे.
या प्रस्तावासोबतच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानांतर्गत पोलीस दलाच्या वापरासह हवाई वैद्यकीय ॲम्ब्युलन्स म्हणून उपयोगासाठी नवीन हेलिकॉप्टर घेण्यास मंजुरी देण्यात आली. सध्या या प्रयोजनासाठी भाड्याने हेलिकॉप्टर वापरण्यात येते. त्याचा शासकीय तिजोरीवर पडणारा भार लक्षात घेता नवीन हेलिकॉप्टरची खरेदी फायदेशीर ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय राज्य शासनाच्या मालकीचे हेलिकॉप्टर सिर्कोस्की एस 76 सी ++ व्हीटी-सीएमएम याचा अलिकडेच अपघात झाला. त्याचा पुनर्वापर शक्य नसल्याने त्याच्याऐवजी नवीन हेलिकॉप्टरची खरेदी करण्यात येणार आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरच्या अपघात विम्याची रक्कम मिळाल्यानंतर त्यातून हे नवीन हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येणार आहे.
-----०-----
ऊ
No comments:
Post a Comment