मुंबई, दि. 7 : राज्यातील तीन हजारजणांनी अवयवदानाचा संकल्प करुन, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी राबविलेल्या अवयवदान मोहिमेला प्रतिसाद दिला आहे.
अवयवदानाविषयी जनजागृती व्हावी आणि अवयवदान करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने नुकतीच राज्यव्यापी अवयवदान मोहिम राबविण्यात आली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विज्ञापीठ, नाशिक यांनी राबविलेल्या मोहिमेमधून सर्वाधिक म्हणजेच १०२१ लोकांनी अवयवदानसाठी नोंदणी केली आहे. विविध रुग्णालयांबरोबरच जिल्ह्यातील मोठ्या गणपती मंडळांमधून अवयवदान करण्याविषयी आवाहन करण्यात आले होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे ६६० जणांनी नोंदणी केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे ३३७, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जेजे) मुंबई-२६०,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (ससून) पुणे-२३७, मंत्रालय येथे उभारण्यात आलेल्या अवयवदान नोंदणी केंद्रात ४०० जणांनी अवयवदानासाठी नोंदणी केली आहे. याशिवाय काहींनी स्वयंसेवी संस्थांमार्फत तसेच अणि व्यक्तीगत नोंदणी केली आहे.
अवयवदानात महाराष्ट्र राज्य हे देशात दुस-या क्रमांकावर आले आहे. यापूर्वी ते सहाव्या क्रमांकावर होते. अवयवदान संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी राज्यपातळीवर अभियान हाती घेण्यात आले होते. शहरांसोबतच गाव पातळीवर ही मोहीम राबविण्यात आली.
००००
No comments:
Post a Comment