मुंबई, दि. 7 : यावर्षी कापसाच्या उत्पादनात 9 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत कापसाचे भाव न कोसळता स्थिर राहावेत आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमीभावास कुठेही हानी पोहोचू नये यासाठी कापूस महासंघाने उपाययोजनात्मक प्रस्ताव राज्य शासनास सादर करावा, असे निर्देश पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.
आगामी हंगामात किमान आधारभूत किंमतीवर कापूस खरेदीची व्यवस्था करण्या संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री देशमुख बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना ,पणन विभागाचे उपसचिव का. गो. वाळवी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, चालू वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाच्या उत्पादनात सरासरी राज्यात १४ टक्के वाढ अपेक्षित आहे. मागील वर्षाच्या ३८.०६ लाख हेक्टर च्या तुलनेत यावर्षी ४१.४० लाख हेक्टर मध्ये कापूस पेरा झालेला आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत कापसाचे भाव कमी झाल्यास, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य मोबदला मिळावा यासाठी आतापासूनच उपाययोजना करायला हव्या. त्यासाठी राज्यातील कापसाची निर्यात योग्य दरात झाली पाहिजे. देशातील गरजू राज्यांना सूत विक्री करण्यासंदर्भात विचार केला जावा. परिणामी कापसाचे भाव स्थिर राहतील. असा विविध उपाययोजनात्मक आराखडा कापूस पणन महासंघाने सादर करावा.
शेतकऱ्यांचे कापसाचे उत्पादन खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांचे नियोजन देखील झाले पाहिजे. राज्यातील प्रत्येक तालुक्याबरोबरच आवश्यक गावांमध्ये खरेदी केंद्रे उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतमाल तारण योजनेंतर्गत बाजार सामित्यांमार्फत कापसासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतचा मुद्दा देखील विचाराधीन असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी कापूस महासंघ,पणन महासंघांनी शासनाच्या समन्वयाने उपाययोजना करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठीचा आराखडा शासनास सादर करण्याचे निर्देश श्री. देशमुख यांनी यावेळी दिले.

No comments:
Post a Comment