Thursday, 5 October 2017

दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी सर्वांनी हातभार लावावा - पालकमंत्री

हातभार प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
                नागपूर दि.05: दिव्यांग मुलांच्या पुनर्वसनासाठी काम करुन सामाजिक बांधिलकी जपत त्यांचे भविष्य स्थिर करण्यासाठी समाजातील सर्वांनी पुढे येऊन हातभार लावावा. त्यामुळे दिव्यांगांच्या जीवनात आशादायी बदल घडून येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. चिटणवीस सेंटर येथे आयोजित तीन दिवशीय हातभार प्रदर्शनाच्या  उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.
 यावेळी आमदार सुधाकर कोहळे, सिस्टर ज्योत्सना मेरी, राम साठवणे, राजेश रोकडे यांची उपस्थिती होती.
 चिटणवीस सेंटर येथे आयोजित प्रदर्शात 52 स्टॉल्स सहभागी असून, या स्टॉल्सच्या माध्यमातून हातमाग, तसेच बांबूवर आधारीत कलाकुसरीच्या वस्तू, कॉस्मेटीक, ज्वेलरी, आर्ट गॅलरी, विविध डिझाईन केलेल्या वस्तूंसह इतर अनेक वस्तू प्रदर्शन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या स्टॉल्सच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याच्या माध्यमातून समाजातील दुर्बल, वंचित अशा दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी मदतनिधी उभा करण्यात येत आहे. हे अतिशय महत्त्वपूर्ण आणि तितकेच सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य आहे. तशीच ती आज काळाची गरज झाली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
अंध, अपंग, निराधार मुलांना आधार देण्याचे मोठे कार्य आहे. मानवसंसाधनाच्या विकासासाठी हे काम सुरु आहे. त्यासाठी वेळ आणि पैसा वाचवून तो त्यांच्या कामी येईल . आता जरी 52 स्टॉल्स असले तरी पुढच्या वेळेस यामध्ये नक्कीच वाढ होईल. तसेच बाहेरुनही मदतीचा ओघ असाच वाढत राहील, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
तसेच दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या उत्थानासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्या योजनांच्या माध्यमातूनही दिव्यांगांना सर्वातोपरी मदत केली जाईल, असेही यावेळी  ते म्हणाले.
हे प्रदर्शन जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठाण, पायोनिअर बहुदेशीय संस्था, व्हिलेज डेव्हलपमेंट प्रोग्राम, जीवोदय विशेष दिव्यांग अनिवासी मुला-मुलींची शाळा, आत्मदीप सोसायटी, रोकडे ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शात हातमाग, रोस्टेड बाजार, कॉस्मेटीक, ‍डिझाईन, आर्ट गॅलरी, हाताने बनविलेली ग्रिटींग्ज, खाद्यपदार्थ, विविध प्रकारच्या चटणी, कपडे, सौंदर्यप्रसाधने, चटई, बांबूच्या कलाकुसरीच्या भेटवस्तू, दिवाळीची गिप्फ्ट, ज्वेलर्स, आणि ड्रायफ्रुट्सचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुनिमा पानसे, संचलन डॉ. संजय धोटे यांनी तर आभार सुनिता वधवा यांनी मानले.

*********

No comments:

Post a Comment