Thursday, 2 November 2017

मुंबईचे नवनिर्माण करण्याची बांधकाम व्यवसायात क्षमता - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 2 :बांधकाम क्षेत्राने मुंबईच्या निर्माणामध्ये खूप मोलाचे योगदान दिले आहे. भविष्यातील मुंबई तयार करण्याची क्षमता या क्षेत्रात आहे. बांधकाम व्यवसाय आणि मुंबई महानगर पालिका प्रशासन हातात हात घालून काम करत असून शासनाचा पाठिंबा या माध्यमातून मुंबईचे नवनिर्माण होऊ शकेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
            इकॉनॉमिक टाइम्स आयोजित एस-टेक 2017 या बांधकाम, वास्तुशास्त्रकला तसेच अभियांत्रिकी क्षेत्राच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, इंटरनॅशनल ट्रेड एक्झीबिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क शास्वत, सॅमसंग कॉर्पोरेशन, लार्सन ॲण्ड टुब्रो आदी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक यावेळी उपस्थित होते.
            हे प्रदर्शन वास्तुशास्त्र, बांधकाम, अभियांत्रिकी, डिझाइन या सर्व दृष्टीकोनातून महत्वपूर्ण ठरले आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, बांधकाम क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर सतत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पुढे येत आहे. ही नाविन्यपूर्णता सर्वत्र पोहोचली पाहिजे. त्यासाठी अशा प्रदर्शनांचा महत्वाचा वाटा रहातो.
श्री.फडणवीस म्हणाले, देशात 100 पेक्षा अधिक स्मार्ट शहरांचे निर्माण होत असताना जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण कल्पनांची आवश्यकता आहे. स्मार्ट शहरे ही सर्व समाजघटकांच्या गरजा पूर्ण करणारी असणार आहेत असे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पैशाचे परिपूर्ण मूल्य उपलब्ध करून देणारे आणि प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान सुधारण्यासाठीचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे अभिप्रेत आहे. राज्य शासन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. त्यासाठी बांधकाम क्षेत्राचा महत्वपूर्ण सहभाग असणार आहे.
            मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले, निती आयोगाच्या अहवालानुसार पायाभूत प्रकल्पांच्या निर्माणामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. 5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचे 1 हजार पेक्षा जास्त मोठे पायाभूत विकास प्रकल्प चे काम राज्यात सुरू आहे. ड्वाईश बँकेच्या अहवालानुसार 30 दशलक्ष डॉलरहून अधिक आणि देशातील 50 टक्के पेक्षा जास्त प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत.
श्री. फडणवीस पुढे म्हणाले, मुंबईमध्ये सध्या 140 किमी चे मेट्रोचे कामे सुरू आहेत. 258 किमी पर्यंत मेट्रो मार्गाचे काम होणार आहे.2022 पर्यंत दळणवळण हे नागरीकरणाच्या वेगापेक्षा अधिक होईल त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान सुसह्य होईल. ट्रान्स हार्बर लिंक चे काम आगामी 2 महिन्यात सुरू होईल. कोस्टल रोड च्या कामाबाबतही कार्यवाही गतीने सुरू आहे. बांद्रा- वर्सोवा सी लिंक च्या कामासाठी लेटर ऑफ अग्रीमेंट आगामी चार महिन्यात काम सुरू करण्याची कार्यवाही होईल. रो-रो सेवा सुरु करण्यासाठी लवकर परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे. पूर्व किनाऱ्यावर जलवाहतूक सुरु करण्यात येणार आहे. अशा प्रकारे मुंबईची कनेक्टिव्हिटी सर्व बाजुने करण्याचे काम सुरू आहे.
            मुंबई शहराचा विकास आराखडा लवकरच पूर्ण केला जाईल. त्यास महापालिकेची परवानगी लवकरात लवकर मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या आराखड्यास नंतर शासनाकडूनही कमीत कमी कालावधीत मंजुरी दिली जाईल. मुंबईमध्ये परवडणारी घरे निर्माण करण्यासाठी प्रकल्प हाती घेण्याचे नियोजन आहे. यासंबंधातील शासनाच्या धोरणनिर्मितीमध्ये, अंमलबजावणीतील त्रुटींबाबत बांधकाम क्षेत्रातील तज्ञांनी सूचना कराव्यात. उद्योग, शासन आणि महानगर पालिका एकत्रितपणे अनेक काम करत आहेतअसे ते म्हणाले.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मुंबई शहरात बांधकामांना परवानगी देण्यासाठी इज ऑफ डुईंग बिझनेसच्या अंतर्गत चांगली यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. केंद्र शासनानेही या यंत्रणेची वाहवा केली असून देशातील इतर राज्यांनीही तिचा अवलंब करावा अशी शिफारस केली आहे. भारताने जागतिक बँकेच्या इज ऑफ डुईंग बिझनेसनिर्देशांकानुसार एकदम 30 गुणांनी वाढ नोंदवली असून यामध्ये आपल्या देशाचा पहिल्या 100 मध्ये समावेश झाला आहे हे आपण अभिमानाने म्हणू शकतो. इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये काम करण्याचा मुंबई आणि महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे.
            कार्यक्रमास बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, संदीप रुणवाल, बाबुलाल वर्मा, आर्कीटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर, आशिष रहेजा, एम. व्ही. सतीश, अनुज पुरी, मिली मजुमदार आदी उपस्थित होते.

००००

No comments:

Post a Comment