v हडस हायस्कूलच्या अमृत महोत्सवाचे थाटात उद्घाटन
नागपूर, दि.18 : हडस हायस्कूल हे नागपूरचे वैभव आहे. आधुनिक तंत्रज्ञानानुरुप युवाशक्ती निर्माण करण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे आव्हान स्वीकारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लिबरल एज्यूकेशन सोसायटीच्या हडस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा अमृत महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. तर सुप्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लिबरल एज्यूकेशन संस्थेचे अध्यक्ष पी.व्ही.खांदेकर, सचिव डॉ.ए.पी.जोशी, व्ही.बी.सपळे, के.बी.जोशी, हडस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सविता कुंडले, ज्योती बेंदरे, प्राजक्ता शुक्ला, के.व्ही.जोशी, श्रीमती दिपा फडके व श्रीमती कल्याणी शास्त्री आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिक्षण पद्धतीतील बदलाचा स्वीकार करतांनाच अनेक प्रतिथयश विद्यार्थी या शाळेने घडविले असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तंत्रज्ञान बदलत असतांना त्याला अनुरुप अशा शिक्षण पद्धतीचा स्वीकार करण्याची आवश्यकता आहे. डिजिटललायझेशनच्या काळामध्ये राज्यातील विशेषत: जिल्हा परिषदेच्या 62 हजार शाळा डिजिटललायझेशन करुन प्रगत झाल्या आहेत. मागील तीन वर्षात शिक्षण क्षेत्रात केलेल्या व्यवस्थेमुळे 18 व्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर प्रगती केली आहे. उत्तम शिक्षण दिले तर परिवर्तन घडू शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जगात तंत्रज्ञान बदलत आहे. त्या तंत्रज्ञानानुरुप अशी मानव संसाधन निर्माण करण्याचे आव्हान असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, बदलत्या व्यवस्थेनुरुप युवाशक्ती निर्माण करण्यासाठी शैक्षणिक बदलाचा स्वीकार आवश्यक आहे. विकासामध्ये शैक्षणिक संस्थांचे महत्वाचे योगदान असून नागपूर शहरात आंतरराष्ट्रीय संस्था सुरु झाल्या आहेत. तसेच टीसीएसचे मोठे केंद्र सुरु होत असून ऐरोस्पेस पार्क सुद्धा सुरु होत आहे. याचा लाभ घेण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करुन त्या अनुरुप शिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. हडस सारख्या संस्थाया बदलाचा स्वीकार करुन एक आधुनिक संस्था म्हणून ओळख निर्माण करतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
हडस संस्थेतर्फे निर्माण होत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाला शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सामान्य शिक्षक हे हडस प्रायमरी स्कूलचे संस्थापक होते. हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे. व्यावसायिकतेच्या दृष्टीकोनातून या शाळेची निर्मिती झाली नसून त्यामागे शिक्षणाची तसेच त्यागाची भावना आहे. आज स्पर्धेचे युग आहे. यात टिकून राहायचे असेल तर काळानुरुप परिवर्तन होणे आवश्यक आहे. सद्यास्थितीला नागपूरमध्ये 38 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे. येथे 450 कोटी रुपयांचे सिम्बॉसिस इन्स्टिट्यूटचे काम सुरु झाले आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्या येथे उद्योग सुरु करण्यासाठी समोर येत आहे. ही बाब निश्चितच स्पृहणीय आहे. योगगुरु बाबा रामदेव हे 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. नागपुरात मोठे उद्योग येत आहे. या नवनवीन उद्योग धंद्यामुळे स्थानिकांना निश्चितच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या उद्योगधंद्यामध्ये विदर्भ तसेच स्थानिकांना प्राधान्याने रोजगार प्राप्त होणार आहे. यासाठी नागपूरातील उद्योगांना सक्षम मनुष्यबळ पुरविण्यासाठी शिक्षण संस्थांनी उत्तम कौशल्ययुक्त विद्यार्थी तयार केले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षणसंस्थांनी पुढाकार घ्यावा.
मुल्य शिक्षणाबाबत बोलतांना ते म्हणाले की, शिक्षणामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासमवेत विद्यार्थ्यांना नैतिक मुल्यांचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. कारण संस्कारक्षम पिढीच कुटुंबसंस्था टिकवून ठेवू शकते. आणि कुटुंबसंस्था टिकून राहिल्या तरच समाजस्वास्थ टिकून राहील. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मुल्यांचा संस्कार रुजविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना सुप्रसिद्ध संशोधक डॉ.अनिल काकोडकर यांनी शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करतांना पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. शिक्षणापुढे आव्हाने स्वीकारतांना शिक्षणामधील बदलाचा स्वीकार करायला हवा. संपूर्ण क्षमता असलेला विद्यार्थी घडविण्यासोबतच नविन तत्रज्ञानाचा स्वीकार व बदलत्या संदर्भात शिक्षण सुद्धा अनुरुप असायला हवे. त्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करणे हे आव्हान शिक्षण संस्थांनी स्वीकारावे असेही अनिल काकोडकर यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक करतांना संस्थेचे सचिव डॉ.ए.पी.जोशी यांनी आजवर संस्थेच्या प्रगतीचा आढावा नमूद केला. ते म्हणाले, हडस शाळेने विद्यार्थी स्वावलंबी आणि बहुश्रृत व्हावा यासाठी सदैव प्रयत्न केले. आज या शाळेचे विद्यार्थी देशातीलच नव्हे तर जगातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहे. ही केवळ शिक्षणसंस्था नसून खऱ्या अर्थाने जिव्हाळ्याची कुटुंबसंस्था आहे. विजेची बचत करण्यासाठी शाळेने सौर वीजप्रकल्प सुरु करण्याबाबतचा मानसही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने उपस्थितांचे स्वागत केले. शाळेच्या प्रगतीचा आलेख दाखविणारा माहितीपट दाखविण्यात आला. ‘अमृत गाथा’ स्मरणिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पारंपारिक पद्धतीने ढोल ताश्यांच्या गजरात स्मरणिका पालखीतून सभा मंडपात आणण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
******
No comments:
Post a Comment