मुंबई, दि.8 : राज्यात शासनाने
मोठ्याप्रमाणावर हमी भावाने तूर खरेदी केली आहे. शासनाच्या विविध विभागांना
आवश्यक असलेली तूरडाळ मागणी आणि प्राप्त खरेदी दर याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार
करून मंत्रिमंडळासमोर ठेवावा, असे निर्देश पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिले.
तूर भरडई व पुरवठा
याबाबतची आढावा बैठक पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात
आयोजित करण्यात आली होती. आदिवासी विकास विभाग, महिला
व बालकल्याण विभाग, गृह विभाग, अन्न व
नागरी पुरवठा विभाग यांची तूरडाळीची मोठी मागणी आहे. या विभागांकडून खरेदी केल्या
जाणा-या दराचा आणि मागणीचा प्रस्ताव संबंधित विभागांनी तात्काळ तयार करावाआणि ज्या
विभागाची मागणी आहे त्या विभागाचे एकत्रित प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवावेत,
असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील स्थानिक गोदाम
आणि मिलर मधून जिल्ह्याच्याच ठिकाणी तूरडाळ उपलब्ध करून देण्यात यावी. त्याठिकाणी
पुरवठा करण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी. तसेच मार्केटिंग फेडरेशनने सप्लाय
कॉन्ट्रक्टरला सांगून उपलब्ध तूरडाळ पुरवठा करण्यास सांगावे,अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी दिल्या.
सर्वसामान्यांना कमी दरात चांगल्या दर्जाची तूरडाळ मिळावी यासाठीसुध्दा
शासनाकडून राज्यातील सर्व रेशन दुकानांवर प्रती महिना, प्रती शिधापत्रिकाधारकाला 1 किलो तूरडाळ उपलब्ध करून
देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. या प्रस्तावावर चर्चा करून 1 किलो
पॅकींगमध्ये तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. देशमुख
यांनी सांगितले.
या बैठकीला मार्केटिंग फेडरेशन, अन्न
व नागरी पुरवठा विभाग, आदिवासी विकास विभाग, गृह विभाग,महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी
उपस्थित होते.
००००

No comments:
Post a Comment