Saturday, 18 November 2017

कालिदास समारोहाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कविवर्य सुरेश भट सभागृह रसिकांनी हाऊसफुल्ल
                नागपूर दि. 18 :  विदर्भाच्या सांस्कृतिक वैभव असलेल्या कालिदास महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नागपूरकर रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. यावर्षीचा कालिदास समारोहाचा आजच्या दुसऱ्या दिवशीचा पूर्वार्ध श्रीमती आस्था गोस्वामी यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताने गाजविला.  
कविवर्य सुरेश भट सभागृहात कविकुलगुरु कालिदास यांच्या ऋतुसंहारवर आधारित या महोत्सवाचे कालिदास समारोह आयोजन समितीमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि नागपूर महानगरपालिका यांच्यातर्फे सुरेश भट सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सुरेश भट सभागृह रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हाऊसफुल्ल झाले.   
            रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात कालिदास समारोहाचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी  महापौर नंदाताई जिचकार, विभागीय आयुक्त अनूप कुमारमहानगरपालिका आयुक्त अश्विन मुदगल,  पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम् आणि संजय कोलते यांची उपस्थिती होती.  
         मन वृंदावन या कार्यक्रमाअंतर्गत श्रीमती आस्था गोस्वामी यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने सुरुवात झाली. यावेळी श्रीमती आस्था गोस्वामी यांनी कान्हा रे सदा बसंत राग वृंदावन भावाची प्रस्तुती केली. त्यामध्ये त्यांनी नमन नमन बसंत वृंदावन आणि ब्रज भाषेतील प्यारे पिया दो खेलत”  ही रचना सादर केली. तसेच शेवटी वृंदावनमधील प्रचलित भजन आली मोहे लागे वृंदावन हे भजन प्रस्तूत केले. त्याला नागपूरकर रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उदंड प्रतिसाद दिला.
शेवटी महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आणि मनरेगा आयुक्त संजय कोलते  यांनी श्रीमती आस्था गोस्वामी आणि चमूचे स्वागत केले. या महोत्सवाच्या आयोजनासाठी नागपूर महानगरपालिकेसोबतच पर्यटन विकास महामंडळ व कालिदास महोत्सव आयोजन समिती यांनी अत्यंत भव्य पद्धतीने या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

आजचे कार्यक्रम
महोत्सवात 19 नोव्हेंबर 2017 रोजी कालिदास समारोहाचा शेवटचा दिवस असून, ऋतूचक्र या कार्यक्रमाअंतर्गत पं. सतिश व्यास आणि पं. रोणू मुजूमदार यांच्यातील संतूर व बासरी वादनाची जुगलबंदी रंगणार आहे. तर वसंतरास या कार्यक्रमाअंतर्गत बिन्दु जुनेजा आणि त्यांचा समूह, भोपाल हे समूह ओडिशी नृत्य सादर करणार आहेत. शेवटी ऋतूरंगया कार्यक्रमांअंतर्गंत पं. संजीव अभ्यंकर आणि श्रीमती अश्विनी भिडे- देशपांडे यांच्यातील शास्त्रीय गायनाची जुगलबंदी नागपूरकर रसिकांना अनुभवता येणार आहे. 
****

No comments:

Post a Comment