अहमदनगर
जिल्ह्यातील नितीन आगे हत्या प्रकरण
मुंबई, दि. 5: खर्डा (जि.
अहमदनगर) येथील नितीन आगे या युवकाच्या हत्येप्रकरणी 13 साक्षीदार
फितूर झाल्याने या प्रकरणातील 9 आरोपी निर्दोष सुटले आहेत. याबाबत
राज्य सरकार अतिशय गंभीर असून फितूर साक्षीदारांवर कारवाई होण्यासाठी अहमदनगर सत्र
न्यायालयात दाद मागणार आहे. तसेच या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात
येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
खर्डा या
कर्जत तालुक्यातील गावात नितीन आगे या 17 वर्षीय युवकाची
हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील 9 संशयितांची अहमदनगर
न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. 26 पैकी 13 साक्षीदार फितूर
झाल्याने सबळ पुराव्याअभावी त्याचा निकालावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे आढळून आले
आहे. या पार्श्वभूमीवर नितीन यांचे वडील राजू आगे यांनी दि. 4 डिसेंबर
मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी श्री. फडणवीस यांनी त्यांना न्याय मिळवून
देण्याचे आश्वासन दिले. खासदार अमर साबळे यावेळी उपस्थित होते. तेराही फितूर
साक्षीदारांच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी राज्य सरकार सत्र न्यायालयात दाद
मागणार असून त्याबाबतचा प्रस्तावही विधि व न्याय विभागाकडून सादर करण्यात येत आहे.
तसेच सत्र न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात आव्हान
देणार असून त्याबाबतची कार्यवाहीदेखील सुरु आहे.
-----000-----
No comments:
Post a Comment