Tuesday, 2 January 2018

शेतकरी सन्मान योजनेंतर्गंत 39440 शेतकऱ्यांना 237 कोटी रुपयांची कर्जमाफी - सचिन कुर्वे

 * सिध्‍दी - संकल्प मोहीम उपक्रम
                            * कर्जमाफीची प्रक्रिया निरंतर सुरु
                             *कुठल्याही स्वस्त धान्य दुकानात मिळणार धान्य
          नागपूर, दि.02 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 39 हजार 440 शेतकऱ्यांना आजपर्यंत 237 कोटी 29 लाख 93 हजार 691 रुपयांचा लाभ मिळाला आहे, जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थी शेतकरी सभासदांना या योजनेचा लाभ मिळेपर्यंत योजना सुरु राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सिध्दी-संकल्प मोहिम अंतर्गत माध्यम संवाद या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे माध्यमांसोबत संवाद साधत होते.  
          यावेळी जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी पी. एस. काळे, एल. जे. वार्डेकर, जिल्हा उपनिबंधक शिवाजीराव भोसले, जिल्हा लीडबँक व्यवस्थापक अय्युब खान, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.
          नागपूर जिल्हा सहकारी बँकेमार्फत शेतकरी कर्जमाफी योजनेचा 21 हजार 164 शेतकऱ्यांना 144 कोटी 62 लाख 35 हजार 367 रुपयांचा शेतक-यांना लाभ झाला असून जिल्ह्यात विविध बँकामार्फत 18 हजार 276 शेतक-यांना 92 कोटी 67 लाख 324 शेतक-यांना लाभ देण्यात आला असल्याचे सांगतांना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी  ही कर्जमाफीची प्रक्रिया निरंतर सुरु असल्याचे सांगितले.
          तसेच जिल्हा अन्नधान्य पुरवठा विभागाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण करण्यात येत असून लाभार्थ्यांची आधारबेस ओळख पटवून पात्र लाभार्थ्यांनाच नागपूर शहरात 665 रास्त भाव दुकाने कार्यरत आहेत. अंत्योदय योजनेच्या 36 हजार 673 शिधापत्रिका प्राधान्य गट योजनेच्या 2 लाख 54 हजार 549 या दोनही योजनेअंतर्गत एकूण 2 लाख 94 हजार 968 शिधा पत्रिका आहेत. त्यापैकी 98 टक्के शिधापत्रिकांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित शिधापत्रिकांची आधार नोंदणी एक महिन्यात पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आधार संलग्न करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची आधार बेस ओळख पटवून पीओएस मशिनद्वारे धान्य वितरित होत आहे.
          सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पाअंतर्गत ऑक्टोबर 2017 पासून धान्य वितरणाची नवीन पध्दत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येत आहे. या पध्दतीमुळे 100 टक्के धान्याचे वितरण हे खात्री करुनच पूर्ण करण्यात येत आहे. यामध्ये अंगठ्याचे ठसे घेऊन धान्य वितरित होत आहे. या प्रणालीमध्ये आधार ईकेवायसी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे आधार क्रमांक समाविष्ट नसणाऱ्या  नागरिकांना रास्त भाव दुकानात जाऊन आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मागील तीन महिन्यात 19 हजार 796 नागरिकांनी आधार नोंदणी केली आहे. ही प्रक्रिया पारदर्शक असून मागील तीन महिन्यांमध्ये 32 हजार 601 शिधापत्रिका धारकांनी योजनेचा लाभ घेतला आहे.
          जे लाभार्थी दुर्धर आजारामुळे धान्य उचलण्यास असमर्थ आहेत त्यांना स्वेच्छेने नॉमिनीची निवड करुन धान्य उचल करता येणार आहे. ही ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे उर्वरित अन्नधान्याचा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेत असलेले कोणतेही पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने दक्षता घेण्यात येत आहे.
          या प्रणालीमुळे तीन महिन्यात एकूण 13 हजार 863 मेट्रीक टन धान्ये वितरित झाले आहेत, तर अंदाजे 5 हजार 45. 44 मेट्रीक टन बचत झाले आहे. बचत धान्ये अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या एपीएल शिधापत्रिका धारकांचा समावेश करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच ज्यांनी तीन महिन्यापासून धान्याची उचल केली नाही अशा लाभार्थ्यांना परिमंडळ कार्यालयातर्फे नोटीस देवून या योजनेतून वगळून नवीन पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पात्र शिधा धारकांसाठी सुधारित धान्य वितरण पध्दती थेट वाहतूकीद्वारे करण्यात येत आहे.
कुठल्याही रास्त भाव दुकानातून घ्या धान्य
       सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे रास्त भाव दुकानातून धान्य घेतांना जेथे शिधापत्रिका आहे तेथूनच धान्य घेण्याऐवजी आता शहरातील कुठल्याही रास्त भाव दुकानातून धान्य घेता येणार आहे.
          आधार संलग्न शिधापत्रिका केल्यामुळे व पॉस मशिनवर रास्त भाव दुकानात जावून धान्य मिळणार आहे. ऑक्टोबरपासून ही योजना शहरात लागू झाली असून मागील तीन महिन्यात 37 हजार 741 ट्रॉन्झेक्शन झाले असून याचा लाभ 32 हजार 601 शिधापत्रिका धारकांनी घेतला आहे. शहरातील एकूण शिधापत्रिकाधारकांपैकी 6.06 टक्के नागरिकांनी या नव्या सुविधेचा लाभ घेतल्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यावेळी सांगितले.
                            प्रमाणपत्र घरपोच : 75 हजार नागरिकांना लाभ
           शासन आपल्या दारी योजने अंतर्गत जाती प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, वय, अधिवास, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, भारतीय पोस्ट सेवेद्वारे प्रमाणपत्र घरपोच उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही योजना राज्यात केवळ नागपूर येथेच राबविण्यात येत आहे. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आता नागरिकांना सेतू केंद्रात चकरा मारायची आवश्यकता नाही.
          या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थी, शेतकरी आणि इतर नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. लोकसेवा अधिनियम 2015 अंतर्गत निधारित वेळेपेक्षा कमीत कमी तीन दिवसात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे त्यामुळे या योजनेला नागरिेकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. 1 फेब्रुवारी 2017 ते 31 डिसेंबर 17 पर्यंत या योजनेतून 75 हजार 27 नागरिकांना घरपोच प्रमाणपत्र देण्यात आले आहे.


एटीएम मशिनद्वारे सातबारा वाटप
          नागपूर जिल्ह्यात एटीएम मशिनद्वारे 31 डिसेंबर 2017 पर्यंत एकूण 19 हजार 354 शेतकऱ्यांना सातबारा वाटप करण्यात आला आहे. त्यामध्ये भिवापूर 7058, उमरेड 1658, कुही 358, कामठी 1205,सावनेर 220, नागपूर ग्रामीण 1093, काटोल 413, नरखेड 2313, कळमेश्वर 218, रामटेक 396, पारशिवणी 3854, मौदा 428 आणि हिंगणा तहसिल अंतर्गत  140 सातबारा वाटप करण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
          शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना सुलभ मिळावा. लाभ मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.
          प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी स्वागत करुन माध्यम संवादा बद्दल माहिती दिली.
                                                          ****


No comments:

Post a Comment