Sunday, 7 January 2018

सक्रिय लोकसहभागातून शाश्वत विकास शक्य -विभागीय आयुक्त अनूप कुमार



* लोकराज्य मासिकाच्या स्टॉलला        उत्स्फूर्त प्रतिसाद
* विभागीय आयुक्त अनूप कुमार यांना अनुलोम सन्मित्र पुरस्कार प्रदान

 नागपूर, दि. 07: विविध योजनांच्या प्रभावीअंमलबजावणीमध्ये सक्रिय लोकसहभाग वाढल्यास शाश्वत विकास होऊ शकतो. असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.
धरमपेठ येथील म. पां. देव स्मृती विज्ञान महाविद्यालयात ‘अनुलोम’च्या वतीने पूर्व विदर्भ विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, श्रीनाथपीठाधिश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज, हेमंत ब्राम्हणकर, कांचन गडकरी, समय बन्सोड, ॲड. अजय सोमाणी, अभय देशमुख व अन्य मान्यवर उपस्थित होते.
विभागीय आयुक्त अनूप कुमार यांना अनुलोमच्या वतीने अनुलोम सन्मित्र पुरस्कार यावेळी  प्रदान करण्यात आला.
विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले, विविध शासकीय योजना, उपक्रम  जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी प्रत्येकाने यामधील दुवा बनणे गरजेचे असून यासंदर्भात अनुलोमचे कार्य स्तूत्य आहे. महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा असून अनेक समाजसुधारकांनी समाजसुधारणेचा पाया रचला. सेवाभावी वृत्तीने कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था समाजसेवेच्या, देश घडविण्याच्या प्रेरणेतून आकारास आलेल्या असतात. अशा स्वयंसेवी संस्थांना एकत्र जोडण्याचे काम आणि या संस्थांना सक्षम करण्यासाठी ‘अनुलोम’ने आयोजित केलेला विकास मेळावा नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. अशा मेळाव्यातून विचारमंथन होऊन शाश्वत विकासासाठीचा मार्ग निश्चित करता येतो. असेही अनूप कुमार यांनी सांगितले.
माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी म्हणाले, विश्वकल्याणाचे मागणे मागणारी आपली संस्कृती आहे. वैयक्तिक दु:ख बाजूला सारुन देशसेवेचे व्रत घेतलेले कार्यकर्ते सर्वांसाठीच प्रेरणादायी असतात. समाजाच्या विकासासाठी सतत समाजसेवेत कार्यरत असणे गरजेचे असून सर्वांनी आपल्या कर्तव्याचे पालन योग्यपणे केल्यास बलशाली राष्ट्राची निर्मिती होईल, असेही श्री. धर्माधिकारी यांनी सांगितले.
स्वामी जितेंद्रनाथ महाराज म्हणाले, सर्व समाजाच्या भल्यासाठी समाजसेवेचे व्रत स्वयंसेवी संस्थांनी घ्यावे. स्वयंसेवी संस्थांना सक्षम करण्याचे ‘अनुलोम’चे कार्य नक्कीच प्रशंसनीय आहे. शासन आणि स्वयंसेवी संस्थांनी परस्पर सहकार्याने कामे केल्यास शाश्वत विकासकामे घडतील असेही जितेंद्रनाथ महाराज यांनी सांगितले.
प्रास्ताविकात हेमंत ब्राम्हणकर म्हणाले, शासनाच्या विविध योजना, उपक्रम  व कार्यक्रम यांची माहिती  जनतेपर्यंत पोहचविण्याच्या मुख्य उद्देशाने अनुलोम संस्था कार्यरत आहे.
यावेळी कृषी, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ तसेच अन्य शासकीय कार्यालये व विविध स्वयंसेवी संस्था यांनी  विकासकामे व योजना यावर आधारित माहिती देणारे  स्टॉल्स उभारले होते.
                     लोकराज्य मासिकाच्या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती केंद्र व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लोकराज्य मासिकाचा स्टॉल उभारण्यात आला. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या विविध योजना, उपक्रम यासंदर्भातील माहिती जनतेपर्यंत लोकराज्य मासिकाच्या माध्यमातून प्रभावीपणे पोहचविण्यात येते, अशी प्रतिक्रिया मान्यवर तसेच वाचकांनी नोंदवली. लोकराज्य, महाराष्ट्र अहेड ही मासिके तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली महाराष्ट्र वार्षिकी व महामानव ही पुस्तकेही यावेळी विक्री ठेवण्यात आली होती.
यावेळी विविध स्वयंसेवी संस्थांचे, बचत गटांचे, कृषी गटांचे प्रतिनिधी, ‘अनुलोम’चे उपविभाग जनसेवक, 36 भाग जनसेवक, वस्तिमित्र व स्थानमित्र उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात स्वयंसेवी संस्था बांधणीसंदर्भातील सविस्तर माहिती सहाय्यक धर्मादाय आयुक्त आभा कोल्हे यांनी दिली.
सूत्रसंचालन विनय मोडक यांनी केले. आभार समय बन्सोड यांनी मानले.
*** ** 

No comments:

Post a Comment