Saturday, 6 January 2018

झिरो माईल्स येथे भूमि अभिलेख विभागाचा इतिहास दर्शविणारे चित्र व माहिती गॅलरी - अनूप कुमार

 नागपूर, दि. 6  :   नागपूर मेट्रोद्वारा उभारण्यात येत असलेले हेरीटेज वाम प्रकल्पाचा भाग म्हणून भूमि अभिलेख विभागाचा इतिहास दर्शविणारे तसेच भारताचे ग्रेट ट्रिग्नॉमेट्रीक सर्व्हेची माहिती देणारे कायम चित्र व माहिती गॅलरी झिरो माईल्स येथे  तयार होणार आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.
भूमि अभिलेख कर्मचारी कल्याणकारी निधीद्वारे आयोजित क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2018 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी भूमि अभिलेखचे उपसंचालक बाळासाहेब काळे, कास्ट्राईबचे कृष्णा इंगळे, श्रीराम खिरेकर, नागपूर विभागातील जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक अभय जोशी, गजानन डाबेराव, पुंडलिक मेश्राम, भूषण मोहिते, दिलीप गरजे, रामेश्वर वाघ यावेळी उपस्थित होते.  
भूमि अभिलेख मोजणीच्या इतिहासावर प्रकाश टाकताना त्यानी पहिले भूमापन भगवान विष्णू यांचे वामन अवतार हे होते, असे सांगितले जाते. यावरुन भूमि अभिलेखाचा इतिहास लक्षात येतो. तसेच अकबराच्या दरबारातील तोडरमल यांनी केलेल्या मोजणीचा उल्लेख आणि जार्ज एव्हरेस्ट यांनी हिमालयातील उंच शिखर माऊन्ट एव्हरेस्टची मोजणी इत्यादी बाबतचे महत्व त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विशद केले. हाच धागा पकडून त्यांनी भूमि अभिलेख विभागातील भूमापक यांचे मोजणीतील त्यांच्या कामाचे कौतुक केले. सध्या मोजणीचे काम हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होत असून ई-मोजणी, ई-फेरफार, ई-सातबारा यामध्ये भूमि अभिलेख विभागाचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे  विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.
मोजणीबाबत लोकशाही दिनातील प्रलंबित मोजणी प्रकरण शून्यवर आणल्याबाबत भूमि अभिलेखचे उपसंचालक बाळासाहेब काळे यांचे अभिनंदन केले.
 ही स्पर्धा दोन दिवस चालणार असून उद्या रविवार दि. 7 जानेवारी रोजी विजयी खेळाडूंना बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. त्यापूर्वी उपसंचालक बाळासाहेब काळे यांनी सर्व खेळाडूंनी खिलाडीवृत्तीने आनंद घ्यावा, असे प्रास्ताविकात सांगितले. तर सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी झाल्याबद्दल कृष्णा इंगळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे आभार भूषण वैद्य यांनी मानले.
यावेळी नागपूर विभागातील कास्ट्राईब भूमि अभिलेख कर्मचारी संघटना तसेच खेळाडू, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


***   

No comments:

Post a Comment