Tuesday, 9 January 2018

लोकराज्य ‘पोलिस विशेषांक’ म्हणजे पोलिसांच्या कर्तृत्त्वाला सलामी - शिवाजी बोडखे



*लोकराज्य पोलिस विशेषांक 2018 अंकाचे विमोचन

        नागपूर, दि. 09 : महाराष्ट्र पोलीस दलाचा गौरवशाली इतिहास आहे. लोकराज्य जानेवारी 2018 चा ‘आपले पोलिस,आपली अस्मिता’ हा अंक म्हणजे पोलिसांच्या कर्तृत्त्वाला सलामी होय, असे गौरवोद् गार सह पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी काढले.
            पोलिस आयुक्त कार्यालयात आज लोकराज्य ‘आपले पोलिस, आपली अस्मिता’ जानेवारी 2018 अंकाचे विमोचन सह पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
            यावेळी पोलिस उपायुक्त (वाहतूक) रविंद्र परदेशी, पोलिस उपायुक्त (मुख्यालय) सुहास बावचे, पोलिस उपायुक्त (आर्थिक गुन्हे) श्रीमती श्वेता खेडकर, सहाय्यक पोलिस उपायुक्त श्रीमती अश्विनी पाटील, सहाय्यक पोलिस उपायुक्त श्रीमती रिना जनबंधू, पोलिस निरीक्षक (मानवी संसाधन विभाग) अतुल सबनीस, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर तसेच पोलिस विभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
            सह पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे म्हणाले, लोकराज्यच्या ‘पोलिस विशेषांकात विपूल माहिती समाविष्ट आहे. पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राबविणे, नागरिकांची सुरक्षा तसेच सदैव तत्पर राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची माहिती यात आहे. सध्याच्या डिजिटल युगामध्ये सायबर क्राईमचे प्रमाण वाढत आहे. या गुन्ह्यांचा शोध घेणारी यंत्रणा पोलिसांनी प्रभावीपणे कार्यान्वित केली आहे. ही माहिती देखील ‘लोकराज्य’च्या अंकातून आपल्याला वाचायला मिळते. प्रत्येकाने ‘लोकराज्य पोलिस विशेषांक’ अवश्य घ्यावा तसेच युवक- युवतींना इतर भेटवस्तू देण्याऐवजी वाढदिवसाची भेट म्हणून ‘लोकराज्य’चे अंक द्यावेत. जेणेकरुन घरोघरी लोकराज्य अंकाचा  प्रचार आणि प्रसार होईल आणि यातील उपयुक्त माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. तसेच लोकराज्य अंकामध्ये  शासनाच्या विविध योजना व त्याची माहिती असल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
             माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी म्हणाले की, लोकराज्य जानेवारी 2018 ‘आपले पोलिस, आपली अस्मिता’ या अंकात सायबर गुन्हे, महिला व बाल सुरक्षा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षित वाहतूक तसेच दहशतवाद, नक्षलवादाचा बिमोड या महत्त्वपूर्ण विषयांवर उपयुक्त माहिती देण्यात आली आहे.
            जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेमध्ये बोलतांना सांगितले की, पोलिसांचे 24 तास बांधील कार्य, यामुळे नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास, पोलिसांचा नक्षलवाद्यांविरुद्ध एल्गार तसेच सक्षम आणि समर्थ पोलिसदल, पोलिस विभागात असणाऱ्या तंत्रज्ञानाची  समग्र माहिती  लोकराज्य अंकात समाविष्ट आहे. यासाठी पोलिसदलाविषयी विशेष माहिती जाणून घेण्यासाठी लोकराज्य जानेवारी 2018 ‘आपले पोलिस, आपली अस्मिता’अंकाचे वाचन करावे, असेही ते यावेळी म्हणाले.
लोकराज्य अंक सर्वत्र उपलब्ध
            शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य हे मासिक शहरातील तसेच जिल्ह्यातील बुकस्टॉलवर उपलब्ध आहे. लोकराज्य मासिकाच्या वार्षिक वर्गणीसाठी जिल्हा माहिती अधिकारी प्रशासकीय भवन क्रमांक 1, तिसरा माळा, महाराष्ट्र शासन, नागपूर दूरध्वनी क्रमांक 0172-2561979  येथे वार्षिक वर्गणी भरुन लोकराज्यचा अंक घरपोच पोस्टाद्वारे  पाठविण्याची सुविधा आहे.
            शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लोकराज्य उपयुक्त असल्यामुळे विद्यार्थी व अभ्यागतांनी वार्षिक वर्गणी भरुन अंक प्राप्त करण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले आहे.
****



No comments:

Post a Comment