Monday, 26 February 2018

दिवंगत माजी विधान परिषद सदस्यांना शोक प्रस्तावाद्वारे आदरांजली

          मुंबई, दि. 26 : दिवंगत माजी विधान परिषद  सभापती प्रा.नारायण सदाशिव फरांदे, माजी उपसभापती वसंत डावखरे, माजी वि. प. सदस्य आणि माजी राज्यमंत्री मधुकरराव किंमतकर तसेच वि. प. सदस्य चंद्रकांत जगताप यांना विधान परिषदेत शोक प्रस्तावाद्वारे आदरांजली अर्पण करण्यात आली. शोक प्रस्ताव महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला.
माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे
माजी  सभापती प्रा. ना. स. फरांदे यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामांचा उल्लेख विधानपरिषद सदस्यांनी आपल्या आदरांजली  भाषणात केला. सर्वसामान्य परिस्थितीतून वर आलेल्या प्रा. फरांदे यांनी संसदीय कार्याला शिस्त घालून दिली.  अनेक संस्थांची त्यांनी उभारणी केली. त्यांच्या संपूर्ण कुटूंबाने सामाजिक कार्याला वाहून घेतले होते. निस्वार्थी, ध्येयवादी, शांत संयमी आणि अभ्यासू अशा व्यक्तीमत्वाच्या जाण्याने समाजाची हानी झाली आहे, अशा आशयाच्या भावना सदस्यांनी व्यक्त केल्या.
माजी उपसभापती वसंत शंकर डावखरे
माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या अचानक जाण्याने आपले व्यक्तिगत नुकसान झाल्यासारखे वाटते अशा भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. अनेक वर्ष उपसभापती म्हणून कार्य केलेल्या डावखरे यांची मितभाषी, हसतमुख आणि अजातशत्रू अशी त्यांची प्रतीमा होती. त्यांना उपजत असलेली विनोदबुद्धी यामुळे अनेक कठीण परिस्थितीत त्यांनी खेळीमेळीच्या वातावरणातून मार्ग काढले. बहुआयामी अशा व्यक्तीच्या जाण्याने एक ‘वसंतपर्व’ संपले अशा भावना सभासदांनी व्यक्त केल्या.
माजी राज्यमंत्री मधुकरराव घनश्यामराव  किंमतकर
विदर्भावर मनापासून प्रेम करणारे व्यक्तीमत्व व विदर्भातील अनुशेषाचे ‘रेडी रेकनर’ अशी ओळख असलेले गाढे अभ्यासक, राजकीय वर्तुळात ‘मामा’ या टोपणनावाने लोकप्रिय असलेले अ‍ॅड. मधुकरराव यांच्याजाण्याने विदर्भभूषण व्यक्तिमत्वास राज्य मुकले आहे, अशा आशयाचे भाव विधान परिषदेतील सदस्यांनी व्यक्त केले. रामटेक मतदारसंघाचे प्रतिनीधीत्व करणारे किंमतकर यांचे माजी प्रधानमंत्री पी.व्ही नरसिंहराव यांच्यासोबत अत्यंत जिव्हाळ्याचे संबध होते.विदर्भाच्या प्रश्नासाठी झपाटल्यासारखे त्यांनी काम केले. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर, असणारे किंमतकर यांच्या जाण्याने विदर्भच नव्हे तर संपूर्ण राज्याचे नुकसान झाले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. 
माजी विधान परिषद सदस्य चंद्रकांत निवृत्ती जगताप
सर्वसामांन्यांचे नेते अशी ओळख असलेले जगताप हे ‘चंदूकाका’ या नावाने प्रत्येकाच्या मनात घर करून होते. कृषी, उद्योग, बॅंकींग या क्षेत्रात त्यांनी काम केले. पुणे येथील सासवड आणि पुरंदर भागाचा तसेच दिवे घाटाचा विकास घडविण्यात महत्वाची भूमिका निभावली. अत्यंत गरिब परिस्थितीतून आलेल्या या लोकनेत्याने आयुष्यभर माणसे जुळविली. त्यांच्या जाण्याने सर्वमान्यांचा नेता गमविला आहे, अशा शोक भावना व्यक्त करण्यात आल्या.
   या प्रस्तावावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उप सभापती माणिकराव ठाकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सदस्य सर्वश्री शरद रणपिसे, भाई जगताप,सुनील तटकरे, जयंत पाटील, किरण पावसकर, जोगेंद्र कवाडे, हेमंत टकले, श्रीमती नीलम गोऱ्हे, यांनी दिवंगत सदस्य यांच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलुंवर प्रकाश टाकून त्यांच्या विधान परिषदेतील कामकाजातील उल्लेखनीय कामागिरीला उजाळा दिला व  दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण केली.
0000

No comments:

Post a Comment