यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यातील दळणवळण क्षेत्रात मोठे बदल करण्यासाठी आजचे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. सुलभ, सुयोग्य तसेच पर्यावरणपूरक दळणवळण व शाश्वत वाहतूक व्यवस्था वाढविण्यावर राज्य शासनाचा भर आहे. त्यासाठी प्रदुषणमुक्त अशा विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या वापराचे धोरण (ई व्हेइकल पॉलिसी) तयार केली आहे. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात देशात होत असलेले मोठे बदल स्वीकारण्यासाठी राज्याने पुढाकार घेतला असून आम्ही वेगाने पुढे जाऊ. आता ही सुरुवात असून आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे.
राज्यातील विशेषतः मुंबई, पुणे व नागपूर सारख्या महानगरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई व्हेइकल) वापर वाढविण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार आहे. तसेच शासकीय कार्यालयांसाठी विजेवर चालणारी वाहने वापरण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
सन 2030 पर्यंत सर्व वाहने विजेवर चालणारी वाहने आणणार- डॉ. हर्षवर्धन
राज्य शासनाने पर्यावर वाचविण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल अभिनंदन करून केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले, विजेवर चालणारी वाहने व त्यासाठीची सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला आहे. सन 2030 पर्यंत सर्व वाहने ही विजेवर चालणारी आणण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत आहे. मिशन इनोव्हेशन अंतर्गत केंद्र शासनाने विविध संशोधनावर मोठा भर दिला असून त्यासाठी विविध विद्यापीठे व संस्थांची प्रोत्साहन दिले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांची आवश्यकता आहे. ही वाहने स्वस्त, सहज परवडणारी असून या वाहनांसाठी वीजपुरवठाही सुलभपणे करण्यात येणार आहे.
पर्यावरण वाचविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ व केंद्र शासन मोहीम राबविण्यात येत असून सर्वांनी पर्यावरण वाचविणे हे आपले नैतिक कर्तव्य मानून यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. हर्षवर्धन यांनी केले.
विजेवर चालणाऱ्या वाहनांमुळे रोजगार संधी वाढणार - इरिक सोल्हेम
संयुक्त राष्ट्र संघ- पर्यावरणचे कार्यकारी संचालक इरिक सोल्हेम म्हणाले, प्रदूषणापासून देश व पर्यावरणाच्या रक्षणासाठी याप्रकारची पावले उचलणे आवश्यक ठरणार आहे. यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने पुढाकार घेतला आहे. वीजेवर चालणारी वाहने ही पुढील काळाची आवश्यकता ठरणार असून ती स्वस्त व पर्यावरणपूरक आहेत. यामुळे या क्षेत्रात रोजगार संधी व आर्थिक भरभराट होणार आहे.
यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी पर्यावरण रक्षणासाठी महिंद्रा कंपनी नेहमीच सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक प्रविर सिन्हा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांनी केला विजेवर चालणाऱ्या बसमधून मंत्रालय ते गेट वे प्रवास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंत्रालयात उभारण्यात आलेल्या ई चार्जिंग सेंटरचे उद्घाटन केले. त्यानंतर मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री महोदयांनी वीजेवर चालणाऱ्या बेस्टच्या बसमधून मंत्रालय ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावर प्रवास केला. यावेळी आमदार राज पुरोहित, संयुक्त राष्ट्र संघ- पर्यावरणचे कार्यकारी संचालक इरिक सोल्हेम, महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा आदींनी या बसमधून प्रवास केला.
000