Monday, 28 May 2018

तंबाखूमुक्त मंत्रालय जनजागृती अभियानात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे -सामाजिक न्याय मंत्रीराजकुमार बडोले


मुंबई, दि. 29 : तंबाखूमुक्त मंत्रालय जनजागृती अभियानात मोठ्यासंख्येने सहभागी व्हा, असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी अधिकारी कर्मचारी यांना केले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आजपासून तीन दिवस तंबाखूमुक्त महाराष्ट्र, अभियान मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राबविण्यात येणार आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती बडोले यांनी आज एका प्रसिध्दी पत्रकामार्फत दिली आहे.
सामाजिक न्याय विभाग, आरोग्य विभाग, अन्न व औषधी प्रशासन विभाग आणि सलाम मुंबई फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 29 ते 31 मे असे तीन दिवसीय तंबाखूमुक्त महाराष्ट्र, आरोग्य संपन्न महाराष्ट्रअभियान राबविण्यात येणार आहे. अभियानाचे उद्घाटनसामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते आज 29 मे रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात येणार आहे. सदर अभियानात तंबाखू नियंत्रणावर आधारीत पोस्टर प्रदर्शन, व्यसनमुक्ती आणि समुपदेशन मार्गदर्शनात्मक स्टॉल, विविध संकल्पनावर आधारीत संदेश देणारे रांगोळी प्रदर्शन, अनेक खेळांच्या माध्यमातून तंबाखूमुक्तीचे धडे दिले जाणार आहेत. 31 मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखूमुक्त मंत्रालयासाठीशपथ दिली जाणार आहे, असेही बडोले यांनी स्पष्ट केले आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मुलांनी तयार केलेले पोस्टर, तंबाखूमुक्त शाळा मॉडेल, एल.ई.डी. स्क्रीनद्वारे तंबाखू मुक्तीची फिल्म व संदेश देण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू आणि हृदयविकार ही संकल्पना राबवण्याचे जाहीर केले आहे. याआधारावर रांगोळीच्या माध्यमातून यासंबंधीची माहिती दिली जाणार आहे.
सदर कार्यक्रमात आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, अन्न  व औषधी प्रशासन मंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहाणार असल्याचेही बडोले यांनी नमूद केले आहे.
०००००



No comments:

Post a Comment