Monday, 4 June 2018

पीडित महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मविमने विविध योजनांचा लाभ द्या -अश्विन मुदगल

                          * जिल्हा महिला सल्लागार समितीची बैठक
                                                   * भरोसा सेलमध्ये दाखल प्रकरणांची आढावा
                          * मनोधैर्य योजनेंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करा

        नागपूर, दि. 04 : महिलांचे विशेषत: घरगुती हिंसाचारात बळी पडलेल्या पीडित महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात सर्वसमोवशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प संचालक श्री. चव्हाण, जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती पुष्पा वाघाडे, ज्येष्ठ समाजसेविका डॉ. सीमाताई साखरे, रुबिना पटेल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे धनराज काळे, श्रीमती नंदा भोरे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी विजयसिंग परदेशी यावेळी उपस्थित होते.
        महिलांच्या सक्षमीकरणासोबतच त्यांच्या आर्थिक विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी इतर विभागांच्या समन्वयाने त्यांच्यापर्यंत पोहचविण्याची सूचना करताना ‍जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की,  तृतीयपंथींयासाठी असलेल्या योजना व सुविधा याबाबत यापुढे सामाजिक न्याय विभाग, जिल्हा परिषद समाज कल्याण तसेच महानगरपालिका व नगरपालिकांनी यापुढे राबवयाच्या असून त्यासाठी आवश्यक तरतूद करावी.
            मनोधैर्य योजनेंतर्गत 10 लाख रुपयांचा निधी पीडित महिलेला देण्याची तरतूद असून ही योजना विधी सेवा प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आली आहे. विधी सेवा प्राधिकरणाने प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा तात्काळ निपटारा करावा, अशी सूचना करताना अपंग, महिला व बालकांसाठी असलेल्या 25 योजनांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधीची तरतूद करावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
            पीडित महिलांच्या पुनर्वसनासह आर्थिक सक्षमीकरण करताना सामाजिक संस्थांतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. अशा संस्थांना नियमितपणे अनुदान देण्यात यावे. तसेच राज्य शासनाने यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना डॉ. सीमाताई साखरे यांनी यावेळी केली.
            नागपूर जिल्ह्यासाठी बाल कल्याण समितीची नियुक्ती झाली असून बाल गृहातील मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी भरोसासेलमध्ये दाखल होणाऱ्या प्रकरणांची माहिती, तृतीय पंथांच्या स्वच्छता गृहांची निर्मिती, दत्तक पालक योजना तसेच महिला, बालक व अपंगांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती  सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याबाबतही बैठकतीत चर्चा करण्यात आली.
            प्रारंभी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातर्फे जिल्ह्यात सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती यावेळी दिली.
****

No comments:

Post a Comment