- विद्यार्थ्यांनी शिबीराचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
नागपूर दि.7 : दहावी व बारावीच्या निकालानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू केंद्रात विविध प्रमाणपत्र तयार करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून शहरातील विविध शाळा व महाविद्यालयात उद्या शुक्रवार दिनांक 8 जूनपासून शिबिर आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या शिबिरामधून प्रमाणपत्र तयार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले शपथपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, वय, अधिवास, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र या शिबिरामध्ये तयार करून देण्याची सुविधा आहे. सकाळी 10 ते 5 या वेळात पुढील दिलेल्या शाळा व महाविद्यालयात आयोजित शिबिरामध्ये प्रमाणपत्र दिनांक 8, 9 व 10 या तीन दिवसात उपलब्ध होणार आहे. यामध्ये मोहननगर येथिल सेंट जॉन हायस्कूल, दीक्षाभूमी येथील आंबेडकर कॉलेज, अयोध्यानगर येथील गजानन विद्यालय , जगनाडे चौकातील केशवनगर विद्यालय तसेच महाल येथील दादासाहेब धनवटेनगर विद्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सेतू केंद्रामार्फत दुसरे शिबीर दिनांक 15 ते 17 जूनपर्यंत तीन दिवस पाच शाळा तसेच महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये जरीपटका येथील महात्मा गांधी सेंटेनियर हायस्कूल, रामनगर येथील भरत विद्यालय, स्नेहनगर येथील संताजी महाविद्यालय तसेच मेडिकल चौकातील पंडीत बच्छराज व्यास विद्यालय व हसनबाग येथील राजेंद्र हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे.
तीसरे शिबीर 23 व 24 जून रोजी जवाहरनगर येथील इंदिरा गांधी हायस्कूल, हिवरीनगर येथील जिंगलबेल कॉन्व्हेंट गांधीबाग येथील झुनझुनलाला कन्या विद्यालय, रविनगर येथील सीपी ऍन्ड बेरॉर महाविद्यालय तसेच काटोल रोड येथील तिडके महाविद्यालय येथे शिबिराचे आयोजन केले आहे.
*****
No comments:
Post a Comment