नागपूर दि.26 : समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, वंचितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक नागरिकाने सामाजिक न्यायाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडीटोरियम येथे आज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त ‘सामाजिक न्याय दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार प्रकाश गजभिये, डॉ. मिलिंद माने, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, समाज कल्याण सभापती दीपक गेडाम, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त विजय वाकुलकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती सुकेशनी तेलगोटे तसेच समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी एका द्रष्ट्या राजाची भूमिका निभावली. रयतेतील शेतकरी, कामकरी, दलित, वंचित घटकांसाठी विविध योजना राबविल्या. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी धरणे, विहिरी, कालवे निर्माण केलीत. दलितांना आरक्षण सुरू केले. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळावी यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचितांमध्ये स्वाभिमान जागविला. त्यांच्यापुढे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श होता. प्रत्येक नागरिकाने आपल्या डोळ्यासमोर महान व्यक्तींचा आदर्श ठेवून समाज परिवर्तनासाठी विधायक कार्य करावे. कारण लोक सहभागाशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होऊ शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड यांनी प्रास्ताविकेत सामाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांची भाषणे झालीत.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना धनादेशाचे तर अस्थिव्यंग असणाऱ्या दिव्यांगांना बॅटरी सायकलचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी दीप प्रज्वलन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती विजया रायसने तर आभार विजय वाकुलकर यांनी मानले.
****
No comments:
Post a Comment