नागपूर, दि. 05 : राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती व डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता या दोन्ही शासनाच्या महत्वकांक्षी योजना आहेत. या योजनांची महाविद्यालयांनी प्रभावी अंमलबजावणी करुन एकही पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती व डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनासंदर्भात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
बैठकीला तंत्रशिक्षण सहसंचालक गुलाबराव ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, डॉ. एस. आर. कुकडपवार, शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे,शिक्षण सहसंचालक, सर्व अभियांत्रिकी, आर्कीटेक्ट, उच्च शिक्षण संस्थाचे प्राचार्य, शिक्षण व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती व डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाहभत्ता या योजनांच्या अंमबजावणीसाठी गठीत 7 सदस्यीय समिती दर 15 दिवसांनी महाविद्यालयीन कामकाजाचा आढावा घेणार आहे. या दोन्ही योजना महाविद्यालयांनी प्रभावीपणे राबवावी. टाळा-टाळ करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.
या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक महाविद्यालयाने दर्शनी भागात लावावे. लावलेल्या फलकाचे छायाचित्र काढून अहवालासोबत जोडावे. महाविद्यालयांमध्ये शिबीरांचे आयोजन करुन योजनांविषयी माहितीपत्रक वितरित करावेत तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला या योजनेच्या लाभासाठी लागणारी कागदपत्रांची माहिती उपलब्ध करुन द्यावी, त्यासाठी चित्रिकरणाचे सादरीकरण दाखवावे. या दोन्ही योजना ऑनलाईन होणार आहेत. विद्यार्थ्यांचे अर्ज आता ऑनलाईन भरावे लागणार आहे, त्यासाठी आपले सरकार केंद्रांची मदत घ्यावी. या योजनांबाबत काही अडचणी येत असतील तर त्या निश्चित सोडविल्या जातील. योजनेची अंमलबजावणी करताना एकही पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
*****
No comments:
Post a Comment