Tuesday, 2 October 2018

न्यायप्रक्रीयेत तंत्रज्ञानाची जोड महत्वाची - न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी




                        * कळमेश्वर येथील न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन
          नागपूर, दि 2 : न्यायालयीन प्रक्रीया जलद होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची जोड द्यावी यामुळे पक्षकार आणि वकील यांच्या वेळेची बचत होईल. असे वक्तव्य उच्च न्यायालय, मुंबई नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी  यांनी केले.  
कळमेश्वर जिल्हा नागपूर   दिवाणी न्यायाधिश (क.स्तर) व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, न्यायालयाचे नवीन इमारतीच्या कोणशिलेचे उद्याटन व अनावरण फीत कापून  त्यांनी  केले , यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी उच्च न्यायालय, मुंबई नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती आर.बी.देव, जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.बी. सावळे,  सहदिवाणी न्यायाधिश वि.व. कांबळे, कळमेश्वर तालुका वकील संघाचे  ॲड. एस.आर. कौटकर, दिवाणी न्यायाधिश डी. डी. सुर्यवंशी, बार असोसिएशनच्या सचिव जयश्री पवार यांची उपस्थिती होती.
कळमेश्वर येथे दिवाणी न्यायालय स्थापन व्हावे यासाठी 2008 पासून मागणी करण्यात येत होती परंतू आज दिवाणी न्यायालयाची प्रशस्त इमारत नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. यामुळे न्यायालयात न्याय मागण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली लागतील. यामुळे पक्षकार आणि वकील यांचे मधूर संबध प्रस्थापित होईल व न्यायदानाच्या प्रक्रीयेत पारदर्शकता येईल.  
प्रलंबित प्रकरणांची संख्या प्रचंड मोठी आहे.  वकीलांनी वेळेत अशा प्रकरणांचा निकाल लवकरात लवकर लावावा. कळमेश्वर येथील तयार झालेल्या दिवाणी न्यायालयात काम करणाऱ्या वकीलांची संख्या फार मोठी आहे. इमारतीला प्रशस्त ठेवण्याबरोबरच तुमचे विचारही प्रशस्त ठेवावे.  न्यायालयात साक्ष देणारा साक्षीदार फितूर झाला तर योग्य न्याय मिळत नाही.  यामुळे पक्षकार न्यायदानापासून वंचित राहतो असेही ते यावेळी म्हणाले.
न्यायालयात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली पेंडन्सी विशिष्ट वेळेत पूर्ण केली पाहिजे न्यायाधिश, वकील,कर्मचारी यांनी एकमेकांच्या सहकार्याने प्रलंबित असलेली पेंडन्सी लवकरात लवकर निकाली काढावी. न्यायदानाच्या पवित्र कार्यात पारदर्शकता असने महत्वाचे आहे. अनेक वकील पक्षकारांकडून घेतलेल्या प्रकरणांवर लवकर निकाल लावत नाही. परंतू आजचा पक्षकार हा सूजान नागरिक आहे यामुळे न्यायालय प्रक्रीयेमध्ये काय सूरु आहे याचा तो अभ्यास करीत असतो.  अनेकदा वकीलांना माहित नसलेल्या गोष्टी पक्षकारांना माहित असतात यामुळे वकील आणि पक्षकारांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण असने गरजेचे आहे असे मत जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.बी.सावळे यांनी व्यक्त केले. 
मार्गदर्शन करतांना न्या.आर.बी.देव  म्हणाले स्वच्छ, पारदर्शन कारभार करण्यासाठी प्रशासनाने कळमेश्वर येथे दिवाणी न्यायालयाची नवीन इमारत तयार करुन दिली यामुळे तालुकायेथील नागरिकांना न्याय मागण्यासाठी इतरत्र जावे लागनार नाही.  पंरतू प्रलंबित पेंडन्सी चा विचार करून प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावावे.  यामुळे न्याय प्रक्रीया जलद होवून होणारा विलंब कमी होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. एस.आर. कौटकर तर संचालन दीपाली विघ्ने व आभार डी.डी.सुर्यवंशी यांनी मानले. 
*****

No comments:

Post a Comment