Thursday, 3 January 2019

न्या. धर्माधिकारी एक श्रेष्ठ मानवतावादी - राज्यपाल



मुंबई, दि. 3 : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक श्रेष्ठ मानवतावादी व सच्चे गांधीवादी व्यक्तित्व गमावले असल्याचे दु:ख राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी व्यक्त केले आहे.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत घराण्यात जन्मलेल्या धर्माधिकारी यांच्यावर लहान वयातच महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव पडला. मुंबई उच्च न्यायालयात एक आदरणीय न्यायाधीश म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. आपल्या न्यायालयीन कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय दिले.  न्या. धर्माधिकारी एक प्रभावी वक्ते आणि उत्तम लेखक होते.  ते ग्रामविकास, श्रमिक प्रतिष्ठा व खादीचे खंदे पुरस्कर्ते होते. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या गांधी जयंतीच्या दिवशी ते राजभवन येथे महात्मा गांधींच्या तत्वज्ञानावर बोलले होते. त्यांच्या चिरंतन स्मृतींना मी अभिवादन करतो तसेच त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.   
००००

No comments:

Post a Comment