नागपूर, दि. 22 : दिनदयाल अंत्योदय योजना, शहर अभियान कक्ष, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्या शनिवार दि. 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
नगर परिषद कामठी येथे सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत आयोजित मेळाव्याचा शहराअंतर्गत वास्तव्य करणारे दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना व अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्यांक, अपंग व महिला यांना लाभ होईल. रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी रोजगार व स्वयंरोजगार संदर्भात मार्गदर्शन करतील.
रोजगार मेळाव्यात नवीन कौशल्य प्रशिक्षणाबाबत माहिती तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना उपलब्ध होणाऱ्या रोजगाराचे समुपदेशन व रोजगार उपलब्धता करण्याबाबत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना, जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,अटल पेंशन योजना, वैयक्तीक कर्ज, गट व्यवसाय कर्ज व महिला बचतगट कर्ज इत्यादी संदर्भात माहिती व सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी शहर अभियान कक्ष व्यवस्थापक, विशाल गजभिये व प्रदिप तांबे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन कामठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment