घनकचरा व्यवस्थापनाचे
पुणे मॉडेल उत्तम
मुंबई, दि. 4 : पर्यावरणाची
हानी कमी करण्यासाठी महानगरपालिका आणि नगरपालिकांनी कचऱ्याची योग्य पद्धतीने
विल्हेवाट लावावी. घनकचरा व्यवस्थापनाचे पुणे मॉडेल उत्तम असून कचऱ्यापासून
सेंद्रीय खत निर्मितीला प्राधान्य देण्याची सूचना पर्यावरण मंत्री रामदास कदम
यांनी मंत्रालयात केली.
ते आज पुणे महानगरपालिका क्षेत्रातील
घनकचरा व्यवस्थापन आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी प्रधान सचिव अनिल डिग्गिकर, पुणे मनपा
आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. प्रारंभी श्री. राव यांनी सादरीकरणातून पुणे
महानगरपालिकेने केलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध पद्धतीची माहिती दिली. सुरु
असलेले वीज निर्मिती प्रकल्प, कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प,
बायोगॅस प्रकल्प संदर्भात विस्तृत माहिती दिली.
श्री. कदम म्हणाले, महाराष्ट्रात
प्लास्टिक बंदी करुन प्लास्टिक उत्पादन कारखाने बंद केले आहेत. ज्या महानगरपालिका
अंतर्गत बाजार पेठेत अजुनही व्यापारी, किरकोळ विक्रेते
प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर करत असतील त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांच्याकडून
दंड वसूल करावा. कचऱ्यामध्ये प्लास्टिक येणार नाही याची काळजी घ्यावी. कचऱ्यापासून
सेंद्रीय खत निर्मितीकडे अधिक लक्ष दिल्यास ना नफा ना तोटा या पद्धतीने
शेतकऱ्यांना खत देता येईल. त्यामुळे जमीन सुपिक राहील. शेतकऱ्याचा माल अधिक
निर्यात होऊन तो आर्थिकदृष्टया सक्षम होईल. आपल्याकडच्या सर्व शहरातील कचऱ्यावर
प्रक्रिया करुन खत निर्मिती केली तर शेतकऱ्यांना पुरेल एवठे खत तयार होऊ शकते. असे
सांगून ते म्हणाले, टप्प्याटप्प्याने रासायनिक खतांचा वापर
बंद केला जाऊ शकतो. सेंद्रीय खतामुळे नागरिकांना चांगली फळे, अन्नधान्न मिळून त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊन सर्वांचे
आयुर्मान वाढेल.
पुणे महानगरपालिकेने घनकचरा
व्यवस्थापनात उत्तम काम सुरु केले असून राज्यातील महानगरपालिकांनी या ‘पुणे मनपा
मॉडेल’चा स्विकार करावा. असे सांगून त्यांनी मनपा आयुक्त
सौरभ राव यांचे अभिनंदन केले. या आढावा बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण
मंडळाचे अधिकारी, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
००००


No comments:
Post a Comment