Thursday, 7 February 2019

निराश्रित मुलांच्या जीवनात आम्रपाली उत्कर्ष संस्थेने फुलविला आनंद -प्रवीण दराडे

* निवासी शाळेतील वसतिगृहाचे उद्घाटन
* रामभाऊ इंगोले यांचे कार्य समाजाला आदर्श
नागपूर, दि. 7 : बहिष्कृत समाजातील निरागस मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासोबतच शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य आम्रपाली उत्कर्ष संस्थेच्या माध्यमातून रामभाऊ इंगोले सातत्याने करीत आहेत. त्यांचे हे कार्य समाजासाठी आदर्श असल्याचे प्रतिपादन एमएमआरडी येथे अप्पर आयुक्त प्रवीण दराडे यांनी केले.
पाचगांव परिसरातील आम्रपाली उत्कर्ष संस्थामार्फत सुरु करण्यात आलेल्या नवीन बेसाई निवासी पाठशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन प्रवीण दराडे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त श्रीमती पल्लवी दराडे, श्रीमती प्रतिभा अश्विन मुदगल, पॉवरग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या पश्चिम क्षेत्राचे कार्यपालक निर्देशक डॉ. व्ही. के. खरे, नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता श्री. गुज्जलवार, लुपीन इंडियाचे श्री. देशमुख तसेच आम्रपाली उत्कर्ष संस्थेचे प्रमुख रामभाऊ इंगोले आदी उपस्थित होते.
पॉवरग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून गरजू व निराश्रित मुलांसाठी निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी वसतिगृहाची निर्मिती करण्यात आली असून बांधकामाला नागपूर सुधार प्रन्यासतर्फे सहकार्य करण्यात आले असल्याचे सांगताना एमएमआरडी येथे अप्पर आयुक्त प्रवीण दराडे म्हणाले की, सामाजिक भावनेतून निरागस व निराश्रित मुलांसाठी ही संस्था सातत्याने काम करीत आहे. या संस्थेच्या विकासासोबतच मुलांसाठी चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा सातत्याने प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेवून चांगली प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
पॉवरग्रीड कार्पोरेशनचे कार्यकारी निर्देश डॉ. व्ही. के. खरे यांनी सामाजिक बांधिलकी जपताना निराश्रित व गरजवंत मुलांच्या वसतिगृहासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी या पदावर असताना प्रवीण दराडे यांनी या संस्थेच्या कार्याची माहिती दिली होती. संस्थेसाठी भविष्यात आणखी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी दिली.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त श्रीमती पल्लवी दराडे यांनी समाजातील वंचितांसाठी सामाजिक बांधिलकीतून मदत करण्याची भूमिका सातत्याने स्वीकारतांनाच निरागस बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. येथील मुलांसाठी सुंदर वास्तू तयार झाली असून त्यासोबत चांगले शिक्षण देवून आयुष्यात मोठे होण्याचा संकल्प करावा व यासाठी खूप अभ्यास करा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. 
विमलाश्रमच्या माध्यमातून गरीब व निराश्रित मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. ही संस्था कुठलेही शासकीय अनुदान घेत नसल्यामुळे विविध उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावित, अशी अपेक्षा व्यक्त करताना श्रीमती प्रतिभा मुदगल म्हणाल्या की, मुलांसोबत भावनिक नाते निर्माण करताना त्यांच्यामध्ये कौशल्य विकसित करुन त्यांना आर्थिक निर्भर करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रारंभी नवीन बेसाई निवासी पाठशाळेच्या वसतिगृहाचे उद्घाटन तसेच सर्व सुविधा असलेल्या स्वयपाकगृहाचे लोकार्पण श्री. प्रवीण दराडे व श्रीमती पल्लवी दराडे यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक श्रीमती सुलोचना जाधव यांनी तर आभार श्रीमती कुंदा पाचुंदे यांनी मानले. यावेळी डॉ. चद्देवार व सौ. चद्देवार यांचा शाल व श्रीफळ देवून गौरव करण्यात आला. स्वागत रमेश भुते व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
****

No comments:

Post a Comment