मुंबई, दि .2: चित्रपट, नाटक
व मालिकेबद्दल सर्व सामान्यांच्या नजरेत झळाळी असली तरी, त्यामागील
वास्तव म्हणजे तेथे काम करणारे कामगार हे सामान्य व्यक्ती असून, इतर क्षेत्रातील कामगारांप्रमाणे चित्रपट, नाटक व
मालिकेतील कामगारांचे हक्क अबाधित ठेवणे कामगार विभागाची जबाबदारी आहे, त्यानुसार असंघटित कामगार मंडळामध्ये त्यांचा समावेश करून त्यांच्या
हक्कांसाठी त्वरित समिती स्थापन करणार असल्याची ग्वाही कामगारमंत्री श्री.संभाजी
पाटील निलंगेकर यांनी दिली.
चित्रपट, नाटक व
मालिकेमध्ये काम करणाऱ्या कामगारांना न्याय मिळण्याबाबत त्यांच्या प्रश्नासंदर्भात
चित्रपट व नाटक कलाकार व कामगार यांच्या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे कामगारमंत्री निलंगेकर यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा विरोधी
पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, कलाकार सुशांत सिंग, सुरेश गुप्ता, शिवांगी मेहरा, स्विटी
वालीया, अशिमा चौहान, नागमा मोरारजी
उपस्थित होते.
या उद्योगामध्ये बॅक स्टेज
आर्टिस्ट, तंत्रज्ञ कारागीर, सहायक, स्पॉट
बॉय, अशी विविध कामे करणाऱ्या कामगारांचे कामाचे तास निश्चित
नाहीत, जादा कामाचे वेतन दिले जात नाही, कामाच्या ठिकाणी सोयीसुविधा मिळत नाही, चित्रीकरणाच्या
ठिकाणी आग लागणे, अपघात होणे असे प्रकार घडतात, त्याबाबत कोणतीही सुरक्षा साधने नाहीत, प्रवास भत्ता
मिळत नाही. अशा विविध तक्रारी व समस्या या शिष्टमंडळाच्या होत्या त्यावर त्वरित
कार्यवाही करण्यासाठी समिती गठीत करून या कामगारांचे प्रश्न त्वरित सोडवले जाणार
असे श्री. निलंगेकर म्हणाले.
या उद्योगांची व्याप्ती पाहता
या समितीच्या माध्यमातून वेगळी योजना या कामगारांसाठी आखली जाणार आहे. यात संबंधित
क्षेत्रातील, कलाकार, कामगार, तंत्रज्ञ,
मालक, निर्देशक, शासकीय
अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
पुढे श्री.निलंगेकर म्हणाले,
असंघटित कामगार मंडळात या कामगारांचा समावेश झाल्यास या अंतर्गत येणाऱ्या सर्व
योजनांचा लाभ या कामगारांना देता येईल त्यामुळे इतर क्षेत्रातील कामगारांप्रमाणे
शासनाच्या सर्व सुविधा या कामगारांना सुद्धा घेता येतील.
करमणूक उद्योगामध्ये
प्रामुख्याने मालिका,
सिने व नाट्य निर्मितीचे काम केले जाते. हा व्यवसाय संपूर्ण भारतभर
चालतो. महाराष्ट्र व मुंबईमध्ये हा उद्योग केंद्रित झाला आहे. तथापि कोल्हापूर,
पुणे व इतर बाह्य ठिकाणी चित्रीकरणाची कामे चालतात. त्याअनुषंगाने
या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रभर कलाकार व कामगार यांची संख्या सुमारे 12 लाख आहे.
०००


No comments:
Post a Comment