नागपूर, दि. 9 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर व
रामटेक लोकसभा मतदारसंघात घेण्यात येणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत
तयारी पूर्ण केली आहे. ही लोकसभा निवडणूक अधिक पारदर्शक व शांततामय वातावरणात
घेण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना पूर्ण
करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन
मुदगल यांनी दिली.
नागपूर व रामटेक लोकसभेच्या निवडणुकीसाठी गुरुवार
दिनांक 11 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या मतदानाच्या प्रक्रियेसंदर्भात
जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी विविध राजकीय पक्षांच्या
प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन निवडणूक यंत्रणेतर्फे करण्यात आलेल्या विविध
व्यवस्थेसंदर्भातील माहिती दिली.
यावेळी अखिल भारतीय मानवता पक्षाच्या श्रीमती वनिता
जितेंद्र राऊत, प्रो. डॉ.नथ्थुराम लोखंडे, ॲड. डॉ.सुरेश माने, राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी राजेश शर्मा, दीपक लक्ष्मणराव मस्के, संजय घोष, सुनील
सुर्यभान कवाडे, भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी श्रीकांत भुई, जनअधिकार पक्षाचे
प्रफुल्ल भांगे आदी उपस्थित होते.
लोकसभेसाठी घेण्यात येणाऱ्या मतदानासंदर्भात माहिती
देतांना जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी नागपूर व रामटेक लोकसभा मतदार
संघातील सर्व मतदान केंद्रावर सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळात मतदानाची प्रक्रिया
पारडण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी 6 वाजता विविध राजकीय पक्षांच्या पोलींग
एजंटच्या उपस्थितीत मॉकपूलची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. यासाठी इलेक्ट्रॉनिक्स
मतदान यंत्रावर 50 मत टाकून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सकाळी 7 वाजेपासून
मतदानाला सुरुवात होईल.
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात फौजदारी
प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अ लागू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.
निवडणूक नि:पक्ष निर्भय व न्यायवातावरणात सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असून कोणतीही
अनूचित घटना घडू नये तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये म्हणून मतदाना केंद्राच्या
ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाय योजण्यात आले
असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात सहपोलिस आयुक्त
रविंद्र कदम यांनी कलम 44 लागू करण्याचे आदेशही जारी केले आहे.
मतदानाच्या दिवशी म्हणजे 11 एप्रिल रोजी शहरातील
कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रामध्ये मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतराच्या
आतील कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी जागेमध्ये प्रचार करता येणार नाही. अथवा
मतासाठी अभियाचना करता येणार नाही. निवडणुकीच्यावेळी मत देण्याबद्दल मन वळवता
येणार नाही. तसेच मतदानाकेंद्रामध्ये किंवा त्याच्या प्रवेशद्वाराजवळ अथवा
आसपासच्या भागातील कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी जागेमध्ये ध्वनीवर्धक किंवा
ध्वनीक्षेप करणारे उपकरण वापरण्यास बंदी राहणार आहे. या परिसरात आरडाओरड किंवा
बेशिस्तपणे वागता येणार नाही.
मतदानकेंद्रापासून 100 मीटर त्रिजेच्या परिसरात
निवडणुकीच्या कामानिमित्त शासकीय वाहन वगळून इतर कोणतेही वाहन आणता येणार नाही.
मतदान केंद्रावरील कामावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा येत
असेल तर तो अपराध समजण्यात येईल. मतदारांना ने-आण करण्यासाठी अनधिकृतपणे वाहनाचा
वापर करता येणार नाही. असे केल्यास लोकप्रतिनिधी अधिनियमानुसार शिक्षेस पात्र
राहील. मतदान केंद्रापासून 200 मीटर अंतराच्या परिसरात मंडप उभारण्यास तसेच
उमेदवारांच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांना बसण्यासाठी टेबल व खुर्च्या लावण्यास
या आदेशान्वये मनाई करण्यात आले असल्याचेही अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले आहे.
*****
No comments:
Post a Comment