Tuesday, 9 April 2019

लोकराज्यचा निवडणूक विशेषांक सर्वांसाठी मार्गदर्शक -अश्विन मुदगल



* लोकराज्य निवडणूक अंकाचे आज विमोचन
* मतदानासाठी नागपूर सज्ज

नागपूर, दि. 9 : मतदान करण्याची जनजागृती करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेतील संबंधित  विस्तृत माहिती असलेला लोकराज्यचा राष्ट्रीय महोत्सव मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज हा लोकसभा निवडणूक विशेषांक उमेदवारासोबतच सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी  तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या लोकराज्यच्या लोकसभा निवडणूक या विशेषांकाचे विमोचन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, रामटेक लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांच्या उपस्थितीत झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील मतदानासाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजना आढावा घेण्यात आला. यावेळी लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन  करण्यात आले. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील मतदान प्रक्रियेसंदर्भातील विविधांगी माहिती लोकराज्यच्या विशेषांकाच्या माध्यमातून जनतेसाठी एकत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक अधिक पारदर्शक व शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जय्यत तयारी केली आहे.
मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेसंबंधी विविध गोष्टींची विस्तृत माहिती या अंकात देण्यात आली आहे. मतदार नोंदणी केलेली कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आयोगातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी  स्वीप मोहीम जिल्ह्यात व राज्यात यशस्वी राबविण्यात आली आहे. यासोबतच दिव्यांगांनाही आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष सुविधा निर्माण केल्या आहेत.
समाज माध्यमाबाबत निवडणूक काळात घ्यावयाची खबरदारी, निवडणुकांचे बदलते तंत्र, निवडणुकीतील परिवर्तन यूग, निवडणूक खर्चांवर नियंत्रण आदी अभ्यासपूर्ण लेखांचा या अंकात समावेश करण्यात आला आहे. सुलभ संदर्भासाठी 2009, 2017 च्या निवडणुकीच्या आकडेवारीचा समावेश अभ्यासक व पत्रकारांना सुलभ संर्दभासाठी  उपयुक्त ठरणार आहे.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी स्वागत करुन लोकराज्यच्या राष्ट्रीय महोत्सव मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज या लोकसभा निवडणूक 2019 च्या विशेषांकाबद्दल माहिती दिली.
*****

No comments:

Post a Comment