Wednesday, 11 December 2019

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये भागभांडवलापोटी देण्याचा निर्णय

शासनाने महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  यामुळे महामार्गासाठीच्या कर्जावरील व्याज 2500 कोटी  रुपये इतक्या रकमेने कमी होईल.  तसेच 16500 कोटी रुपयांच्या कर्जासाठी हमी देण्याची गरज पडणार नाही.  या अनुषंगाने महामार्गाच्या मंजूर वित्तीय आराखड्यातील बदलास मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची सुधारित किंमत 55 हजार 335 कोटी रुपये इतकी असून या प्रकल्पासाठी आतापर्यंत 24 हजार 500 कोटी रुपये इतक्या रकमेचे कर्ज विशेष उद्देशवाहन (NMSCEW Ltd.) यांना मंजूर झाले आहे.  सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 3500 कोटी रुपयेराज्यातील सार्वजनिक उपक्रमांनी 5500 कोटी रुपयेगौण खनिजांच्या शुल्कांच्या माफीपोटी (रॉयल्टी) 2414 कोटीबांधकाम कालावधीतील कर्जावरील व्याजापोटी 6396 कोटी आणि जागेच्या किंमतीपोटी 9525 कोटी रुपये असे 27 हजार 335 कोटी रुपये हे शासनाचे भागभांडवल आहे.
जितके कर्ज कमी तितकी या प्रकल्पाची आर्थिक सुसाध्यता राहील यासाठी शासनाने 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय घेतला.
-----०-----

No comments:

Post a Comment