‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी
यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादुर
साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत नागपूर येथे ७ डिसेंबर
२०२५ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या औचित्याने श्री गुरु तेग बहादुर
साहिबजी यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख…
मोगलांच्या
अनन्वीत अत्याचारामुळे कश्मीरचा सुभेदार आपला हिंदू धर्म धोक्यात आल्याने शिखांचे नववे
गुरु तेगबहादुर साहिब यांची मदत घेण्यास जातात व ‘ना पेह देना ! ना पेह सेना’ म्हणत
(घाबरायचे नाही व घाबरवयाचेही नाही) हिंदू धर्मियांना मुस्लीम होण्यापासून वाचविण्यासाठी
व त्यांचे रक्षण करण्यासाठी गुरु तेगबहादुर साहिब थेट मोगल बादशाह औरंगजेबाशी टक्कर
घेत दिल्लीकडे कुच करतात. औरंगजेब घात करून तेगबहादुरांना आग्रा येथे अटक करतात. दिल्लीला
आणून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची बळजबरी करतात. धर्मस्वाभिमानी गुरु तेगबहादुरांनी
धर्मपरिवर्तनास नकार देऊन लाल किल्ल्यासमोरील चांदणीचौकात ते बलिदान देतात. त्यांचे
हे बलिदान इतिहासात अमर होते भारतभूमीचे कवच म्हणून त्यांना ‘हिंद दी चादर’ म्हणून
ओळखले जाते. सत्य व अहिंसेचे प्रेषित असलेल्या तेगबहादुरांनी धर्मासाठी बलिदान देवून
मानवी स्वातंत्र्याचा व स्वतःस पटेल तो धर्म आचरण्याचा आदर्श भारतीयांना घालून दिला.
दिल्लीच्या चांदणी चौकातील त्यांच्या शहिदस्थळी १७८३ मध्ये सरदार बघेलसिंग यांनी त्याग,
शौर्य आणि श्रद्धेचा तेजपुंज असणाऱ्या सीसगंज गुरुद्वारा बांधला.
श्री
गुरु तेग बहादुर साहिब यांच्या सोबत अनेक समाज उभे होते विशेषत: सिकलीगर, बंजारा, लबाना,
मोह्याल, सिंधी समाजांनी या संघर्षात मोलाचे योगदान देत तेगबहादुर साहेबांनी दिलेल्या
धर्म व मानवतेच्या रक्षणाची शिकवण सर्वदूर पोचवली. भाई मतीदास,भाई सतीदास आणि भाई दयाल
गुरुजींच्या आत्मसन्मानासाठी आणि गुरु निष्ठेसाठी शहीद झाले. हे समाज सेवाभाव, साहस
आणि श्रद्धेसाठी ओळखले जातात. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला परिसरातील चांदणी चौकात
सीसगंज गुरुद्वारा सर्व भारतीयांना धर्मांतर विरोधात आवाज उठविण्याचा प्रेरणास्त्रोत
ठरला आहे. याच ठिकाणी गुरु तेगबहादुरांनी मोगलांना आपल्या प्राणांच्या आहुतीतून भारतीयांच्या
एकीचा व सद्भावनेचा संदेश दिला. २५ मे १६७५ रोजी औरंगजेबाच्या आज्ञेनुसार जल्लाद जलालुद्दीन
याने गुरु तेगबहादुरांचे शिर धडापासून वेगळे केले. आणि फतवा काढण्यात आला की, ‘जो कोणी तेगबहादुरांचे उत्तर कार्य पार
पाडेल त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे तुकडे करून दिल्लीच्या चारही दिशांच्या प्रवेशद्वारांवर
लटकविले जातील.’ अशा दहशतीच्या वातावरणामध्ये ढवळून निघालेले भारतीय मन नव्या उमेदीने
उभे राहण्यासाठी धडपडू लागले. औरंगजेबाची अवाज्ञा करून भाई जेतासिंह यांनी त्यांचे
‘शिर’आनंदसाहेब दरबार येथे शिखांचे दहावे गुरू आणि गुरू तेगबहादुरांचे पुत्र गुरू गोविंदसिंह
यांना सुपूर्द केले. आणि इकडे भाई लखीशाह बंजारा यांनी मुलगा नाथईय्याजी यांच्या मदतीने
गुरू तेगबहादुरांचे ‘धड’ दिल्लीतीलच रकाबगंज गावात आणले व आपल्या राहत्या घरात ते ठेवून
घरालाच अग्नी दिला. त्यानंतर त्याच ठिकाणी पवित्र अस्थी जमिनीत पुरल्या आज तिथेच ‘रकाबगंज
गुरूद्वारा’ उभा आहे.
सरदार बघेलसिंह यांनी १७८३ मध्ये दिल्ली सर करून
लाल किल्ल्यावर कब्जा मिळवला. आणि गुरू तेगबहादुरांच्या शहीदस्थळी सीसगंज गुरूद्वारा
बांधण्यात आला. पुढे १९३० रोजी याच गुरूद्वाऱ्याचे पुनर्निर्माण करण्यात आले. तो हाच
गुरूद्वारा स्वधर्माची ज्योत भारतीयांमध्ये तेवत ठेवण्याकरिता व धर्मांतराविरूद्ध
आवाज बुलंद करण्याचा व त्यासाठी प्रसंगी बलिदान देण्याचा संदेश देणारा सीसगंज गुरूद्वारा
मुख्य श्रद्धास्थान ठरले आहे. भल्यामोठ्या परिसरात उभारण्यात आलेल्या या गुरूद्वाऱ्यामध्ये
देश-विदेशातील सर्व धर्मीय भाविक मोठ्या श्रद्धेने मथ्था टेकण्यासाठी येतात व येथून
प्रेरणा घेतात. या गुरूद्वाऱ्यामधील ‘वृक्ष’ आणि ‘विहिर’ हे ही प्रेरणादायी आहे. या
वृक्षाच्या खालीच गुरू तेगबहादुर यांनी स्वधर्माभिमानासाठी प्राणाची आहूती दिली. शेजारी
असलेल्या विहिरीला भावीक नतमस्तक होतात. गुरू तेगबहादुर कैदेत असताना या पवित्र विहिरीतील
पाण्याचा उपयोग दिनचर्या व पिण्याकरिता करीत असत. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला परिसात
स्थित सीसगंज गुरुद्वारा हा दिगंबर जैन अतिशय क्षेत्र लालमंदिरापासून सुरु होणाऱ्या
चांदणीचौकाकडील रस्त्यावर आहे. तर संसद भवनाच्या मागील भागात रकाबगंज गुरुद्वारा स्थित
आहे.
शीख धर्मियांचे
मार्गदर्शक दहा गुरु आहेत. यापैकी दोन गुरु हे तेग बहादुरांचे आप्त आहेत. गुरु तेगबहादुर
हे शिखांचे नववे गुरू असून सहावे शीखगुरू हरगोविंद यांचे ते सर्वात धाकटे पुत्र व शिखांचे
दहावे व शेवटचे गुरू गोविंदसिंह यांचे ते पिता होत. तेगबहादुरांचा जन्म अमृतसर येथे
झाला. वयाच्या ८ व्या वर्षी कर्तारपूर येथील लालचंदजी खत्री यांची कन्या गुजरी यांच्याशी
तेगबहादुरांचा विवाह झाला. त्यांचे मूळ नाव त्यागमल होते. लहानपणीच त्यांना वैराग्य
प्राप्त झाले. गृहस्थ असूनही ते वडिलांच्या मृत्यूनंतर बकाला येथे जाऊन विरक्तवृत्तीने
राहू लागले.
शिखांचे आठवे गुरू हरकिशन यांच्या निधनानंतर
१६६४ मध्ये तेगबहादुर यांना नववे गुरू म्हणून गादीवर बसविण्यात आले. त्यांनी स्वतःसाठी
शिवालिक पर्वतराजीत एक नगर वसविले आणि तिथे आपली गादी स्थापून ते धर्मप्रचारासाठी यात्रा
करू लागले. हे नगर आनंदपूर म्हणून पुढे शिखांचे प्रसिद्ध व पवित्र क्षेत्र बनले. पाटणा
येथे त्यांचे पुत्र गोविंदसिंह याचा जन्म झाला. पुढे शिखांचे दहावे व शेवटचे गुरू गोविंदसिंह
म्हणून ते उदयास आले.
गुरु तेगबहादुरांनी आसामपासून काश्मीरपर्यंत
आपल्या धर्माचा प्रसार केला. त्यांनी विविध विषयांवर ११६ पद्ये रचली. ही पद्ये पुढे
गुरू गोविंदसिगांनी गुरु ग्रंथसाहिबात अंतर्भूत केली. यांतील ५९ पद्ये ‘शबद’ (स्तोत्रे)
आणि ५७ पद्ये ‘श्लोक’ आहेत. त्यांच्या रचनेत वैराग्य व क्षमाशील
वृत्तीचा उत्कृष्ट आविष्कार आढळतो. अहिंसा व सत्याचे प्रेषित असलेल्या तेगबहादुरांनी
धर्मासाठी प्राण त्याग करून मानवी स्वातंत्र्याचा व स्वतःस पटेल तो धर्म आचरण्याचा
आदर्श भारतीयांना घालून दिला. त्यांच्या बलिदानाने भारतीयांमध्ये जी अस्मिता निर्माण
झाली तिला इतिहासात तोड नाही. तेगबहादुर साहिब यांच्या शहिदीला ३५० वर्ष पूर्ण होत
असल्याच्या निमित्ताने यावर्षी भारतभर मोठया प्रमाणात विविध कार्यक्रम आखण्यात आले
आहेत.
शीख धर्माचे दहावे गुरू श्री गोविंद साहिबजी
यांची कर्मभूमी ही महाराष्ट्रातील श्री हुजूर साहिब नांदेड असून याठिकाणी त्यांनी सर्व
शीख बांधवांना उद्देशून, 'सब सिक्खन को हुकम हे गुरू मान्यो ग्रंथ साहिब' असा उपदेश
दिला होता. हा मानवतेचा संदेश घरोघरी पोचविण्यासाठी व श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या
त्यागाची शिकवण समाजाच्या सर्व घटकांत पोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने
आखलेल्या कार्यक्रमाची सुरुवात सर्व धर्म समाभावाची भूमी नागपूर येथे होत आहे.
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त
राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत नागपूर येथील नारा परिसरातील सुरेश चंद्र सुरी मैदानावर ७ डिसेंबर
२०२५ रोजी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची या विशेष कार्यक्रमास उपस्थिती असणार आहे. श्री गुरु
तेग बहादुर साहिबजी यांच्यावर भारतीय डाक विभागामार्फत विशेष टपाल तिकीट जारी करण्यात
येणार आहे. सिंधी आणि पंजाबी समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडविणाऱ्या ऐतिहासिक शस्त्रांची
प्रदर्शनी लावण्यात येणार आहे. शीख,सिकलीगर,बंजारा,लबाना,मोहयाल,वाल्मिकी आणि सिंधी
समाजाचे लोक एकत्र येऊन हा ऐतिहासिक समागम कार्यक्रम साजरा करणार आहेत.
श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचा धर्मरक्षण,
सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश महाराष्ट्रातील घराघरांत पोहचविण्याच्या उद्देशाने आयोजित
या विशेष कार्यक्रमाचे नागपूर नंतर नवी मुंबई येथे २१ डिसेंबर २०२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री
अमित शाह आणि २४ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या
प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होणार आहे. नागपूरसह अन्य ठिकाणी आयोजित होणाऱ्या
या कार्यक्रमातून ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या कर्तुत्व आणि विचारांचा परिचय
जनतेला होणार आहे.
रितेश मो.भुयार,
माहिती अधिकारी,
माहिती व जनसंपर्क, नागपूर.
०००००००

No comments:
Post a Comment