Tuesday, 27 January 2026

नागपुरला वैद्यकीय व वेलनेस पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी चर्चा महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत विभागीय यंत्रणांमध्ये समन्वयासाठी बैठक

 

 

नागपूर, दि.27 : महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत नागपुरला उच्च दर्जाचे वैद्यकीय व वेलनेस पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी विभागस्तरीय यंत्रणांमध्ये धोरणात्मक समन्वय, प्रशासकीय सुलभता, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि आंतरविभागीय समन्वयाकरिता विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी                     डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महास्ट्राईड, महाराष्ट्र वैद्यकीय पर्यटन सेवा लिमिटेड, पर्यटन विभाग, कौशल्य विकास विभाग आदिंच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वैद्यकीय  क्षेत्रातील  शासकीय व खाजगी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत नागपूर मध्ये असलेली विद्यमान वैद्यकीय सुविधा, हॉस्पिटल्सद्वारे परदेशी विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारे वैद्यकीय अभ्यासक्रम, परदेशातून उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांसाठी लागणारी आवश्यक सुविधा, हॉस्पिटल्स व रुग्णांकरिता सुलभ नियमावली तयार करणे, नर्सिंग महाविद्यालयांची गुणात्मक सुधारणा करणे, औषध निर्माण क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्रातील आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी उपचार पद्धती, आवश्यक कुशल मनुष्यबळ आदिंविषयांवर सविस्तर चर्चा झाली.

नागपुरला वैद्यकीय व वेलनेस पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याकरिता आवश्यक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करणे, परदेशी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करणे, परदेशी विद्यार्थ्यांना नागपुरमधील हॉस्पिटल्समध्ये इन्ट्रन्सीप देणे, वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घ्यावा आदी सूचना यावेळी विभागीय आयुक्त बिदरी यांनी केल्या. वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी नागपुरातील वैद्यकीय क्षेत्राची बलस्थाने व अडचणी मांडल्या. तत्पूर्वी, महाराष्ट्र वैद्यकीय पर्यटन सेवा लिमिटेडच्यावतीने सादरीकरण करण्यात आले, तर महास्ट्राईडचे विभागीय आयुक्त कार्यालयातील समन्वयक अजय कुमार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

राज्यशासनाद्वारे जागतिक बँकेच्या सहकार्याने जिल्हयांच्या सक्षम विकासासाठी संस्थात्मक क्षमता विकसित करण्याकरिता महास्ट्राईड प्रकल्प राबविण्यात येत आहे. या माध्यमातून नागपूर शहरातील सक्षम आरोग्यसेवा परिसंस्था, कुशल वैद्यकीय मनुष्यबळ, शैक्षणिक संस्था आणि भक्कम दळणवळण व्यवस्था आदिंचा लाभ घेवून महाराष्ट्र वैद्यकीय पर्यटन सेवा लिमिटेडच्या साहाय्याने नागपुरला वैद्यकीय व वेलनेस पर्यंटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने ही पहिली बैठक आयोजित करण्यात आली.

 

00000


No comments:

Post a Comment