Monday, 9 February 2026

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांची निवड


 

 मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्हा परिषद कार्यालयाने विविध 7 निकषांवर सरस कामगिरी करत 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम मूल्यमापनात एकूण 200 मधून 172.25 गुण मिळवत राज्यातील 34 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी सर्वोत्तम पाच मध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड आज समाज माध्यमाद्वारे जाहीर केली.

     150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन करण्यात आले व मुख्यमंत्री फडणवीस यांनी 26 जानेवारी 2026 रोजी विजेत्या कार्यालयांची नावे जाहीर केली होती. जिल्हा परिषद कार्यालयांचा निकाल निवडणूक आचार संहितेमुळे राखून ठेवण्यात आला होता हा निकाल आज जाहीर झाला आहे.

                             मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवड  जाहीर करताना अतिशय आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त करत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या चमुचे अभिनंदन केले आहे.

                      सर्वंकष 7 मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी

    कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, ए आय व ब्लॉकचेनचा शासकीय कामकाजात वापर आणि जीआयएस चा कामात वापर अशा एकूण ७ सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड करण्यात आली.

 

 

                    हे मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले राज्यात अव्वल

 

       ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालयांमध्ये पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी (196.25 गुण) पहिल्या क्रमांकावर, सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी (195गुण) दुसऱ्या,ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारी (176.25 गुण) तिसऱ्या, नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी (172.25 गुण) चौथ्या तर नाशिक मुख्य कार्यकारी अधिकारी (165.758 गुण) पाचव्या स्थानावर आहेत.

       सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या  सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल.

                                                     ०००००

No comments:

Post a Comment