Monday, 11 May 2026

विभागीय लोकशाही दिनात नव्याने एक तक्रार दाखल


नागपूर, दि.११ : विभागीय लोकशाही दिनात आज गोंदिया जिल्ह्यातील गावठाण जमीन अधिग्रहणासंदर्भातील तक्रार नव्याने दाखल झाली. या प्रकरणात गोंदिया जिल्हाधिकारी यांचा अहवाल मागविण्यात आला आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सह आयुक्त रोहयो अविनाश हदगल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विभागीय लोकशाही दिनात नव्याने एक तक्रार प्राप्त झाली. तसेच चंद्रपूर मनपा हद्दीतील तक्रारीबाबत मनपाकडून अहवाल प्राप्त झाला. यावेळी महिला व बालविकास, कृषी, पोलीस, जलसंपदा, कामगार, भूमी अभिलेख आदी विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. 

                        


गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील पोस्ट अंजोरा अंतर्गत येणाऱ्या भाजेपार गावातील दोन नागरिकांची जमीन गावठाण प्रयोजनासाठी अधिग्रहीत करण्यात आली असून यामुळे ते भूमिहीन झाल्याने शासनाने ही जमीन त्यांना परत करावी अशी तक्रार त्यांनी केली आहे. या प्रकरणी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविण्याचे निर्देश सह आयुक्त अविनाश हदगल यांनी दिले. 

विभागीय लोकशाही दिनात यापूर्वी 13 ऑक्टोबर 2025 रोजीची चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील एक तक्रार प्राप्त झाली होती. महापालिकेच्या जागेवर अवैध बांधकाम करून अनधिकृतपणे रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आल्याच्या तक्रारीबाबत मनपाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आज मनपाकडून या प्रकरणात कार्यवाही अहवाल सादर करण्यात आला.

00000



 

No comments:

Post a Comment