Wednesday, 26 August 2026

र्व प्रकल्प निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्वक पूर्ण करा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्वक पूर्ण करा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले नागपूर विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा घेतला आढावा रस्ते, पूल, वृक्ष लागवड आणि महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीवर असणार विशेष लक्ष नागपूर,- नागपूर विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींच्या कामांना गती देऊन ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री( सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत. नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयात आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहाही जिल्ह्यांतील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस मुख्य अभियंता संभाजी माने, अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांच्यासह संबंधित जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. या बैठकीत रस्ते, पूल, खड्डे दुरुस्ती, इमारती, हायब्रीड ॲन्युईटी, नाबार्ड, केंद्रीय मार्ग निधी, पूरहानी, वृक्ष लागवड आणि विविध महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विभागातील सर्व प्रमुख प्रकल्प, राष्ट्रीय व राज्य महामार्ग, ग्रामीण रस्ते, जोडणी आणि प्रशासकीय इमारतींच्या बांधकामाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. ज्या प्रकल्पांचे काम संथ गतीने सुरू आहे, त्या कामांना गती देऊन कंत्राटदारांनी वेळेची मर्यादा पाळावी, असे त्यांनी निर्देश दिले. नागपूर प्रादेशिक विभागाच्या कार्यक्षेत्रात सहा जिल्ह्यांमध्ये रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे आहे. विभागाच्या ३१ मार्च २०२६ अखेरच्या आकडेवारीनुसार एकूण रस्त्यांची लांबी ३८,२७९.१७ किलोमीटर नोंदविण्यात आली आहे. या कार्यक्षेत्रात ४४७ मोठे पूल, २,१४४ लहान पूल आणि २,५९१ मोऱ्या आहेत. जिल्हानिहाय पाहता नागपूरमध्ये १३०, भंडाऱ्यात १८, गोंदियात ३४, वर्ध्यात ५४, चंद्रपुरात ९४ आणि गडचिरोलीत ११७ मोठे पूल आहेत. वृक्षलागवड टप्पा-२ अंतर्गत नागपूर प्रादेशिक विभागाला ४८,६४१ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून ३४,२०५ वृक्षांची लागवड झाली आहे. पावसामुळे वाहतूक खंडित झालेल्या रस्त्यांची माहितीही बैठकीत मांडण्यात आली. बैठकीत १५ कोटींपेक्षा अधिक किमतीच्या इमारतींची कामे, अर्थसंकल्पीय कामे, केंद्रीय मार्ग निधी, अमृतकाल रस्ते विकास योजना, मायनिंग कॉरिडॉर, एआयआयबी प्रकल्प तसेच प्रलंबित देयके आणि अन्य महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेण्यात आला. विभागातील रिक्त पदांची सद्यस्थिती, नागपूर शहरातील मानेवाडा चौक व म्हाळगीनगर चौक येथील उड्डाणपूल आणि त्यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाची सद्यस्थितीही बैठकीत मांडण्यात आली. तसेच चंद्रपूर येथील एसएनडीटी महिला विद्यापीठ प्रकल्प, नागपूर येथील महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, वारंगा टप्पा-२ , कल्याणेश्वर मंदिर विकास आणि अन्य महत्त्वाच्या इमारत प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीत सहा जिल्ह्यांतील सार्वजनिक बांधकामांच्या प्रगतीचा एकत्रित आढावा घेत रस्ते दुरुस्ती, वृक्ष लागवड, पूल व इमारतींची कामे आणि सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. नागपुरातील 'सारथी' आणि 'स्पोर्ट्स हब'च्या कामाची पाहणी नागपुरात प्रस्तावित असलेल्या विभागीय छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या ('सारथी') बांधकामाची तसेच नागपूर स्पोर्टस हबची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या बहुप्रतीक्षित दोन्ही प्रकल्पाचे बांधकाम दर्जेदार आणि ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण व्हावे, या दृष्टीने त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. पाहणीदरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दोन्ही इमारतीचा आराखडा, उपलब्ध जागा, प्रस्तावित सोयी-सुविधा आणि बांधकामाची सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती घेतली. 'सारथी' संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि संशोधनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व आधुनिक सुविधा या इमारतीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच नागपूर स्पोर्टस हबच्या माध्यमातून अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या इमारतीचे बांधकाम अत्याधुनिक आणि मजबूत स्वरूपाचे असावे, यावर त्यांनी भर दिला.

No comments:

Post a Comment