Tuesday, 18 August 2026
पेंच प्रकल्पामुळे १ लक्ष हेक्टरवर कृषी क्रांती
पेंच प्रकल्पामुळे १ लक्ष हेक्टरवर कृषी क्रांती
ग्रामीण भागातील जनतेच्या उपजीविकेचा मुख्य स्रोत शेती आहे. शेतीला सिंचनाची जोड मिळाली तरच शेती किफायतशीर होऊ शकते. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता निर्माण करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढविली तर प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येऊ शकते. शाश्वत सिंचनामुळे शेतकरी पारंपरिक पिकांव्यतिरिक्त नगदी आणि फळ पिके घेऊ लागले आहेत. ही किमया पेंच सिंचन प्रकल्पाच्या निर्मितीमुळे सहज शक्य झाली आहे. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील सुमारे १ लक्ष ४ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रावर पेंच सिंचन प्रकल्पामुळे कृषी क्रांती शक्य झाली आहे.
गोदावरी खोऱ्याच्या वैनगंगा उपखोऱ्यातील पेंच नदीवर तोतलाडोह व पेंच पाटबंधारे प्रकल्प नवेगाव खैरी पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाची साठवणूक क्षमता 230 दक्षलक्ष घनमिटर असून संकल्पीय उपयुक्त साठा 141.74 द.ल.घ.मी आहे. राज्यातील पूर्ण निर्मित सिंचन क्षमता करणारा हा पहिलाच प्रकल्प असून, उजव्या व डाव्या कालव्याद्वारे नागपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लक्ष ४ हजार ४७६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे.
रामटेक, पारशिवनी, मौदा, कामठी व सावनेर या तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील भंडारा व मोहाडी तालुक्यात धान हे प्रमुख पीक आहे. धानासाठी आवश्यक असलेले मुबलक पाणी उपलब्ध नसल्यामुळे तसेच अनश्चित व अपुऱ्या पावसामुळे तसेच दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन शेतीवर त्याचा प्रतिकुल परिणाम होत होता. पेंच सिंचन प्रकल्पामुळे रब्बी व खरीप हंगामातील सर्वच पिकांना या सिंचनाचा लाभ झाला आहे. सिंचनामुळे शेतीची उत्पादकता वाढत असून आर्थिक स्वंयपूर्णता निर्माण झाली आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या राहणीमानात अमूलाग्र बदल झाला असून शेती ही जीवनदायनी ठरत आहे.
पेंच सिंचन प्रकल्पामुळे नागपूर व भंडारा जिल्ह्यातील पारंपरिक पिकांसोबतच ऊस, धान, लांब धाग्याचा कापूस, रब्बी पिके, उन्हाळी पि तसेच फळबागासह रोख नगदी पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रकल्पाच्या उजव्या कालव्याद्वारे २७ हजार ३०० हेक्टर क्षेत्र, तर डाव्या कालव्याद्वारे ७३ हजार ९००० हेक्टर क्षेत्र तसेच दुबार पिकांतर्गत ३ हजार २७६ हेक्टर अशा १ लक्ष ४ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रावर सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. सिंचन प्रकल्पाची निर्मिती करतांना प्रस्तावित केलेल्या प्रकल्पीय सिंचन क्षमता पूर्ण करणारा हा प्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पाची अद्यायवत किंमत १ हजार ६८५ कोटी ८८ लक्ष रू. असली तरी या प्रकल्पामुळे निर्माण झालेली सिंचन क्षमता ही प्रकल्पाच्या किमतीपेक्षा जास्तच आहे. मागील तीन दशकांपासून शेतकऱ्यांना या सिंचन प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे.
2/-
.2.
सिंचनासोबतच जलविद्युत निर्मिती
पेंच नदीवर तोतलाडोह येथे मुख्य धरण असून या प्रकल्पाचे बांधकाम १९८९ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. तोतलाडोह येथे पेंच जलविद्युत मुख्य धरण असून या प्रकल्पात १ हजार २४१ द.ल.घ.मी. एवढी साठण क्षमता असून उपयुक्त १ हजार १६ द.ल.घ.मी जलसाठा आहे. या प्रकल्पातून विद्युत निर्मिती झाल्यानंतर ३३ कि.मी अंतरावर नवेगाव खैरी येथे दुसऱ्या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता २३० द.ल.घ.मी असून संकल्पीय उपयुक्त साठा १४१.७४ द.ल.घ.मी आहे. या व्यतिरिक्त रामटेक जवळील खिंडसी जलाशयाचा पेंच प्रकल्पांतर्गत समावेश करण्यात आला असून येथे १०३ द.ल.घ.मी उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे.
पेंच प्रकल्पाचा उजव्या मुख्य कालव्याची लांबी ४८.५० कि.मी. असून या कालव्यातून प्रती सेकंद २८.४० घ.मी. पाण्याची वहन क्षमता आहे. या कालव्यामुळे नागपूर जिल्ह्यातील ३० हजार ५०० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ झाला आहे. याव्यतिरिक्त नागपूर शहरास पिण्यासाठी पाणी, कोराडी औष्णिक विद्युत केंद्रास वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा होत आहे. पेंच डाव्या मुख्य कालव्याची लांबी ३२.८५ कि.मी असून वहन क्षमता ९० घ.मी आहे. या कालव्याद्वारे नागपूर जिल्ह्यातील ५२ हजार ५०० हेक्टर व भंडारा जिल्ह्यातील २१ हजार ४०० हेक्टर अशा ७३ हजार ९००० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होत आहे.
शेतीला सिंचनाची जोड मिळाल्यामुळे परिवर्तनाची सुरवात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीला शाश्वत सिंचनासाठी जलयुक्त शिवारसह विविध उपक्रम राबविले असून राज्यातील सिंचन प्रकल्पामुळे उपलब्ध असलेला जलसाठा सिंचनासाठी जास्तीत जास्त कसा वापरता येईल यासाठी विशेष योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. पेंच नदीवर बांधण्यात आलेल्या सिंचन प्रकल्पाच्या प्रकल्पीय सिंचन क्षमता व प्रत्यक्ष निर्मित सिंचन क्षमता पूर्ण करणारा हा प्रकल्प ठरला आहे. नागपूर व भंडारा जिल्ह्यातील कृषी क्रांतीला चालना देणारा या प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला सुद्धा चालना मिळून सर्वसामान्य जनेतत आमूलाग्र बदल घडत आहे.
अनिल गडेकर
नागपूर
००००
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment